आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाळी : पुरूषाच्या नजरेतून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

२१ मे ते २८ मे हा मासिक पाळी सुरक्षा सप्ताह. या विषयात पुरूषांचा सहभाग वाढण्यासाठी अनेक स्तरांवरून प्रयत्न सुरू आहेत. मासिक पाळीचा आई, पत्नी आणि मुलगी असा अनुभव सांगतो आहे एक संवेदनशील पुरूष...

 

माझ्या चिमुरडीनं खेळण्याच्या नादात  सॅनिटरी पॅड हातात घेतलं. याचं डायपर करता येईल का, असं विचारलं. न रागावता तिच्या चिमुकल्या मनाचं कौतुक केलं. तिच्या आयडियाची दाद दिली. पाळीबद्दल समजावून सांगायचं वय नसल्यामुळे खेळायला पाठवून दिलं. 


मला माझं बालपण आठवलं. कधी दिवसा, रात्री बेरात्री कावळा शिवला सांगून आईचं अंथरूण गच्चीवर असायचं. अर्ध्या रात्री कावळा येतो कुठून आणि शिवतो कसा हे काही केल्या कळायचं नाही. पण ते चार-पाच दिवस आईचं जेवण, ताट, कपडे सगळं स्वतंत्र ठेवलेलं असायचं. तिला न शिवण्याची सक्त ताकीद असे आम्हाला.  
नववीला शाळेत असताना व्हिस्परची जाहिरात पाहिली होती. ‘उन दिनो में गिलापन सोख ले’चा अर्थ कळला नव्हता. १९९५-९६ साल होतं ते. संस्कृती रक्षक अशा जाहिराती कौटुंबिक कार्यक्रमातून बाद करण्याची मागणी करायचे.बरं, फक्त दूरदर्शन असल्यानं चॅनल बदलायला वाव नव्हता.


आई आजारी असल्यानं ४ दिवस हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होती. तेव्हा पहिल्यांदा मी पॅड आणून दिले. दुकानदाराला पॅड मागितले तर कागदात गुंडाळून दिले. ते पाकिट फोडून पाहिल्यावर पहिल्यांदा सॅनिटरी पॅड कसे असतात ते कळले.


होमिओपॅथिकचं शिक्षण घेत असताना विद्यार्थिदशेत मासिक पाळीतले हार्मोनल बदल, मानसिक स्थितीतले बदल, चिडचिडेपणा, उदासीनता, पोटदुखी, रक्तस्राव, clots जाणे, कमी जाणे वगैरे गोष्टी आम्ही विद्यार्थी म्हणून विचारायचो, पण पुरुष असल्याने ही माहिती व्यवस्थित मिळाली नव्हती. त्यामुळे हा पाया कच्चा होता. मासिक पाळीत बाजूला बसण्यावरून आईसोबत खटके उडायचे. घरातील वडीलधाऱ्यांचे एकतर्फी कर्मकांड, स्वतःच्या सोयीनुसार लावलेला वैज्ञानिक संदर्भ मला कधीच पटला नाही. नंतरच्या काळात शिवाशिव वगैरे प्रकरण बंद झाले. शिवाय आईने पाळी लांबवण्याच्या गोळ्या बंद केल्या हीसुद्धा चांगली गोष्ट घडली.


२००६ मध्ये माझे लग्न झाल्यावर बायकोच्या पाळीदरम्यानही बाजूला बसण्यावरून पुन्हा वादविवाद. ‘आम्ही बसलो तर तुम्ही का नाही’ टाइपचे संवादही ऐकवून झाले. आई आणि बायको या कात्रीत मीसुद्धा अडकलो होतो. पण माझ्या विचारांवर मी ठाम होतो. मग या प्रसंगातून इलाज म्हणून आमच्या बेडरूममध्ये वेगळी चटई दिखावा म्हणून का होईना अंथरली गेली.


१२ वर्षांच्या वैद्यकीय प्रॅक्टिसमध्ये अनेक रुग्णांनी पाळी लांबवण्याच्या गोळ्यांबद्दल विचारले. मी ठाम नकार देऊन ‘निसर्ग नियमाविरुद्ध कोणत्याच कृत्यासाठी होमिओपॅथिकमध्ये गोळी नाही’ म्हणत स्पष्ट नकार दिलेला आहे.  आज परिस्थिती बदलली आहे. मी, माझी बायको, आमचे कुटुंब पाळीतील विटाळ मानत नाही.स्टोअर्समधून पॅड आणताना मी पॅडची क्वालिटी, दर्जा, ऑफर स्वतः पाहतो. मुख्य म्हणजे हे पॅड कागदात गुंडाळून आणत नाही. यात माझी आईदेखील साथ देते. या विषयावर बोलताना मला आता आई एकटं पडू देत नाही. परिस्थिती बदलते आहे. डॉ. अनिल अवचट सरांच्या पुस्तकात पाळीत स्त्रियांची चिडचिड वाढते म्हणून ऐकले होते. आताशा जरा बायकोची  काळजी घेतो. मी सुरुवात स्वत:पासून केली आहे. तुमचं काय...? 

बातम्या आणखी आहेत...