आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खिडकीतून दिसणाऱ्या, न दिसणाऱ्या सर्वांना…

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण दिवसागणिक जुने होत असताना, आपल्या जुन्या-पुराण्या मतांना चिकटून राहत असताना भिंतीवरली कॅलेंडरं बदलून काय नवं होईल? आपण वयानं वाढत जातो, आपली समज वाढत जाते तसं जग आपल्याला नव्यानं कळू लागतं. हे नवं कळणं, नवं आकलन स्वीकारण्याचं धाडस आपण अनेकदा दाखवत नाही. आपण बदलत जाणं, काळानुरूप मानवी जगणं अधिक सुंदर करणारे विचार आपण आत्मसात करत जाणं, हे आपल्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपण आपल्या कॉम्प्युटरचे रिफ्रेशचे बटण न चुकता दाबत राहतो, पण आपलं काय? या एस्कलेटरसारख्या सतत सरकत्या आणि वेगाने बदलत्या काळात आपल्यालाही रिफ्रेश व्हायला हवं. 'जुने जाऊ द्या मरणालागुनी,' असं म्हणत या नव्या माणसाला, नव्या जगाला मिठीत घ्यायला हवं. आपल्या मनातील अंधाराला, साचून राहिलेल्या द्वेषाला तिलांजली द्यायला हवी....

माझ्या खिडकीतून दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या तुम्हा सर्वांना, 
मी कधीचा या खिडकीत बसलोय आणि दिसणारं सारं टिपून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे सारं पाहताना नवजात बाळासारखे राहावेत माझे डोळे म्हणून जिवापाड अट्टहास करतोय. प्रत्येक वेळी तो अट्टहास यशस्वी होतोच असं नाही. खरं म्हणजे, आपल्यापैकी प्रत्येकाला खिडकीतील सीट मिळावी, असं अगदी लहानपणापासून वाटत असतं, मग ती एसटी असो की रेल्वे नाही तर अगदी विमान. पण माणसांनी खचाखच भरलेल्या या जगात प्रत्येकवेळी प्रत्येकाला खिडकी मिळतेच असे नाही. खिडकी मूठभरांना मिळते, अनेक जण मिळेल त्या सीटवर बसलेले असतात, अनेकांना तर सीटच मिळत नाही. कुणी उभे असतात, कुणी लेकुरवाळी पायरीवरच फतकल मारून बसते, एखादी पाठदुखीने आणि गुडघ्याने त्रस्त असलेली म्हातारी सीटांच्या दोन रांगांमधे बसते. उभा असलेला एखादा आपल्याकडे रागाने तर एखादा केविलवाणे नजरेने पाहत असतो. या नजरा झेलतही आपली सीट न सोडण्याइतके आपणही निगरगट्ट असतो. काही जणांची तर गाडीच चुकलेली असते. कुणी धावत्या गाडीमागे धावत असतात, कुणी शांतपणे, कुणी वैतागलेल्या अवतारात दुसऱ्या गाडीची वाट पाहत रस्त्यावर युगानुयुगे उभे असतात. कधीपासून प्रवास करतोय आपण, ही आजची गोष्ट थोडीच आहे. चालत राह्यलोय आपण, वाहनं बदलली आपली, वेग वाढला आपला दिवसागणिक, पण आपलं चालणं अखंड सुरू आहे. 

मीही पुढे पुढे सरकत राहतो. एखाद्या सिनेमातील  मोन्ताज पाहावा, तसं अनेक दृश्यं नजरेसमोरून जाऊ लागतात. माझ्या शहरात मेट्रोचं कामं सुरू आहे. शहराची दूरदूरची टोकं जोडण्याचं कामं सुरू आहे. फाटलेल्या सदऱ्याला म्हातारीनं टाके घालत शिवत राहावं तसं हे मजूर हे शहर शिवताहेत. वर पाह्यलं तर नजर फिरावी इतक्या उंचावर कष्टाची कामं करताहेत. सिमेंटच्या उंचच उंच खांबावर चढताहेत उतरताहेत. मला गावच्या पाण्याच्या टाकीचं काम करताना पडून गतप्राण झालेला बिहारी मजूर आठवतो आणि त्याच्यासाठी रडणारी ती एसटी कॅन्टीनवाली नवऱ्यानं टाकलेली संगी आठवते. उगीच डोळे ओले होतात. हरघडी मरणाला स्पर्श करत ही मंडळी काम करत राहतात. कुठून कुठून आले असतील हे लोक माझ्या शहरात, मी त्यांच्या मळक्या कपड्यांकडे पाहत राहतो. काहीच अंदाज येत नाही. काही जण लोकांना त्यांच्या निव्वळ कपड्यांवरून ओळखतात. मला फक्त त्यांची भूक समजते, ती ओळखीची वाटते, माझ्या नात्यातली वाटते.  किती जणांचा घाम गळतोय इथल्या मातीत! शहरातल्या या निर्दय सिमेंटरोडना काही मिनिटानंतर आठवण तरी राहील का या घामाची? मला थांबवता येईल का हे स्वतःशीच निरर्थक बोलणं? कानात हेडफोन खुपसून समोरच्या देखण्या बाईकडं बघत बसलो तर किती सुखाचा होईल हा प्रवास, पण मी पुन्हा बाहेर पाहतो. 

विद्यापीठाबाहेर पोरं मशाल मोर्चा घेऊन निघालीत. मशालीमुळं मला रात्र नीट दिसतेय. रात्रीच्या डोळ्यांत डोळे घालून पाहणं शक्य झालंय. पन्नासेक उन्हाळे-पावसाळे पाहून झाल्यावर आपल्याला काहीच नीट दिसत नाही. पडद्यावर तीच ती साठवून ठेवलेली चित्रं पुन्हा पुन्हा नाचू लागतात. नवं काही अपलोड होत नाही, नवं काही डाऊनलोड करायचं म्हटलं तर स्पेस संपत चाललीय. मला या पोरांशी बोलावं वाटतं. माझ्या चष्म्याचा नंबर कितीदा तपासून घ्यायचा? मला या पोरांचे डोळे उसने घ्यावेसे वाटतात, त्यांच्या उरात पेटलेली मशाल मला माझ्या हातात घ्यावी वाटते. पण मग थांबायला वेळ नाही असली काही तरी शेंबडी कारणं सांगत मी पुढं सरकतो. मी पुढं चाललोय की मागं? माझ्या शहरात उभ्या राहिलेल्या काळ्याकभिन्न भिंती मला स्वच्छ दिसतात, पण या पोरांना त्या दिसत नाहीत का, की या भिंती ओलांडून जाण्याची जादू गवसलीय त्यांना, सुपरमॅनसारखी! मी माझा चष्मा पुन्हा पुन्हा पुसत राहतो. ही पोरं आभासी आहेत की या भिंती? 

खिडकी फक्त बसची, ट्रेनची आणि विमानाची कुठं असते? ही खिडकी नाही मिळाली तरी आपल्या दोन खिडक्या तर आहेतच. ज्यातून आपण सारं जग पाहत असतो. सारं जग तर कुणालाच नाही पाहता येत. सगळं जग मावेल इतकी मोठी हार्डडिस्क कुणाचीच नसते, पण आपण जे पाह्यलं त्यावरून आपण अख्ख्या जगाची कल्पना करू लागतो. हत्ती आणि सहा आंधळ्यांसारखा भला मोठा हत्ती आपल्या समजण्याच्या मिठीत मावत नाही. पण आपल्याला ते समजत नाही, मला सगळं उमगलंय असं आपण वागत राहतो. मला आमचे गुरुजी आठवतात, कोर्टीवरून करमाळ्याला जाताना नाळे वस्तीजवळ मोठा उतार होता. त्यावरून सायकल चालवत जाताना खूप मजा यायची, सायकलला भन्नाट वेग यायचा. गुरुजी म्हणायचे, हा उतार आहे की चढ हे आपण कुठं उभा आहोत, त्यावर ठरते. तू कोर्टीवरून येतो आहेस म्हणून तुला तो उतार आवडतो, पण उलट्या दिशेने येणाऱ्या माणसाला हा चढ ऊर फुटेस्तोवर छळतो. अनेकदा आपण उभ्या असणाऱ्या स्थानानुसार आपलं दिसणं, कळणं बदलत असतं. पण इतर ठिकाणाहून हे कसं दिसेल, याचाही विचार आपल्याला करता यायला पाहिजे. 

हे कॅमेऱ्यासारखं असतं, आपल्या भवतालाला कॅमेऱ्यासारखं वेगवेगळ्या अँगलने पाहता येतं, पाहता यायला हवं. असं म्हणतात की, प्रेम करणं म्हणजे एका सत्याचा अखंड शोध असतो. पण हे सत्य एकाने पाहिलेलं नसतं, ते दोघांनी, अनेकांनी पाह्यलेलं असतं. असं एकापेक्षा अनेक डोळ्यांनी पाहताना जे गवसतं ते ‘खरंखुरं’ सत्य.. ते केवळ प्रेमाच्या रस्त्याने गवसू शकतं. तुझ्यामाझ्या गॅलरीतील फोटोंचा असा कोलाज जगणं समजावून सांगतो, जगणं समृद्ध करतो. तुमचा कॅमेरा कितीही मेगापिक्सेलचा असो ज्याच्या मागं एक मानवी हृदय आहे ते फोटो किती प्रसन्न आणि आनंददायी वाटतात. आपल्या दोन डोळ्यांच्या खिडकीतून दिसणारे हे मोन्ताज असं आतून उमटत राह्यला हवं. 
मी नळस्टॉपच्या चौकातून आत वळतो. मित्र वाट पाहतोय तिथं. खूप दिवसांनी भेटतोय तो. हॉटेल समुद्रकडं जाता जाता रस्त्यात ते तिघं भेटतात. एक फाटका गावाकडला तरुण, त्याच्या कडेला एक लहानगं आहे आणि एक पिचलेली तरुणी. ‘साहेब, रात्रीच्या जेवणापुरतं काही तरी मिळालं तर ..’ मी त्याचे पुढचे शब्द ऐकत नाही. क्षणभरात माझी नजर त्या तिघांच्या चेहऱ्यावरून फिरते. हा खरं बोलतोय की खोटं? पण हे खरंच उपाशी असतील तर .. काही कळायच्या आत ट्राफिक पोलिसाने पकडल्यावर द्यावेत तसे त्याला पैसे देतो आणि पुढं सरकतो. हॉटेलच्या दारात मित्र उभा आहे, ‘वेटिंग आहे,’ तो नाराजीने सांगतो. मी बघतो, हॉटेलच्या दारात अनेक जण वाट पाहत उभे आहेत. “ साले हे घरी स्वैपाक करतात की नाही कोण जाणे?,” आम्ही शेजारच्या हॉटेलात जाऊन कोल्ड कॉफी घेतो आणि बाहेर पडतो. तर हॉटेलचा मालक आम्हाला न्यू इयर पार्टीच्या वेगवेगळया पॅकेजची माहिती देतो. 
“अरे हो, बघता बघता नवं वर्ष आलं रे ,” मी स्वतःशीच पुटपुटतो. 

आपण मात्र दिवसागणिक जुने होत असताना, आपल्या जुन्या- पुराण्या मतांना चिकटून राहत असताना भिंतीवरली कॅलेंडरं बदलून काय नवं होईल? आपण वयानं वाढत जातो, आपली समज वाढत जाते तसं जग आपल्याला नव्यानं कळू लागतं. हे नवं कळणं, नवं आकलन स्वीकारण्याचं धाडस आपण अनेकदा दाखवत नाही. आपण बदलत जाणं, काळानुरूप मानवी जगणं अधिक सुंदर करणारे विचार आपण आत्मसात करत जाणं, हे आपल्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपण आपल्या कॉम्प्युटरचे रिफ्रेशचे बटण न चुकता दाबत राहतो पण आपलं काय? या एस्कलेटरसारख्या सतत सरकत्या आणि वेगाने बदलत्या काळात आपल्यालाही रिफ्रेश व्हायला हवं. ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी,’ असं म्हणत या नव्या माणसाला, नव्या जगाला मिठीत घ्यायला हवं. आपल्या मनातील अंधाराला, साचून राहिलेल्या द्वेषाला तिलांजली द्यायला हवी.  मला माझ्या ओळी आठवतात – 
“तुझ्या घराच्या भिंतीवर कॅलेंडर उद्या लागेल नवं,
कॅलेंडर बदललं म्हणून सांग, वर्ष कसं येईल नवं ?
तेच असतील रागलोभ, तुडुंब मनात साठलेले
तसेच असेल थंडगार, हृदयात बर्फ गोठलेले
कपाळावरील आठ्या तुझ्या, उद्यासुद्धा अशाच असतील
कशी तुझ्या अंगणात सांग, उद्या नवी फुलं हसतील ?
तूच असशील जुना जुना, तर सांग काय होईल नवं ?
कॅलेंडर बदललं म्हणून सांग, वर्ष कसं येईल नवं ? ”
कॅलेंडरसारखं असं स्वतःलाही नव्यानं छापता आलं तर, खरंखुरं नव वर्ष आपल्याही अंगणात येईल, खात्रीने !  

प्रदीप आवटे

dr.pradip.awate@gmail.com

लेखकाचा संपर्क : ९४२३३३७५५६

बातम्या आणखी आहेत...