आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बापूंचा हरवलेला चेंडू 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गौतम बुद्धाची सम्यक वाणी जणू अकादमिक चर्चेपुरती उरली आहे. हिंसक व्हिडिओ गेम्स या मुलांना अधिक आक्रमक बनवत आहेत. त्यांच्यातील कारुण्य, समभाव, मदतीची भावना उमलण्यापूर्वीच करपून जात आहे. पडद्यावर आणि अवतीभवती हिंसा इतकी व्यापून उरली आहे की आता रक्त पाहून हृदयाची गती वाढत नाही, कपाळावर घाम येत नाही, इतकी ती रोजमर्रा की चीज होऊन बसली आहे. अशा प्रसंगी नौखालीत आगीच्या वर्तुळाने वेढलेले गांधी त्यांच्या चेंडूसह नजरेसमोर येतात...


त्या दिवशी कधी नव्हे ते मी नेमका चारचाकी चालवत घरी येत होतो. पुण्यातून संध्याकाळच्या वेळी ड्राइव्ह करणे म्हणजे महाकठीण काम, पण अलीकडे या जीवघेण्या ट्रॅफिकची मलाही सवय झाली आहे. पण तेवढ्यात एका सिग्नलला होऊ नये ते झाले. एक टू व्हीलरवाला चुकीच्या बाजूने येताना, गाडीला घासला आणि तावातावाने, ‘गाडी बाजूला घे तुला तर बघतोच आता.’ असे हावभाव करू लागला. मी शांतपणे गाडी बाजूला घेतली. मी खाली उतरेपर्यंत त्याला धीर नव्हता, ड्रायव्हिंग सीटकडे येत त्याने शिव्यांची लाखोली वाहिली. माझ्या सर्व स्त्री नातेवाइकांचा उद्धार एव्हाना करून झाला होता. खरं म्हणजे, अशा शिव्यांची एक प्रचंड मोठी डिक्शनरी माझ्याकडे पण होती, पण अलीकडे मी ती अनइन्स्टॉल केली होती. मी खाली उतरलो. मी दोन्ही गाड्यांकडे पाहिले, दोन्ही गाड्यांना विशेष काही झालेले नव्हते आणि त्या कार्यकर्त्यालाही काही लागलेले नव्हते, पण तो गरम कढईतील पॉपकॉर्नसारखा तडतडत होता.
मी त्याच्या खांद्यावर हात ठेवत अगदी शांतपणे म्हणालो, ‘हे बघा, मला माझी काही चूक दिसत नाही, तुम्ही चुकीच्या बाजूनं ओव्हरटेक करताना, मला घासलात.’
‘नाय नाय तुझी चूकंय हरामखोर! कशी गाडी चालवतो तू ×××’
‘हे बघा, तुम्हाला जर असं वाटत असेल तर शेजारीच पोलिस स्टेशन आहे, आपण जाऊ तिथं, रीतसर तक्रार करू. विनाकारण शिवीगाळ कशाला करायची? तुम्हाला तुमचं बरोबर वाटणार, मला माझं!’
माझं ते शांत बोलणं ऐकून तो जाम चवताळला.
‘शेळपटावानी काय बोलतोस ××! जरा मर्दासारखा बोल की शामळू’, त्यानं माझ्या बोलण्याची नक्कल केली. आपण याची आयमाय उद्धारली तरी हा प्राणी इतक्या शांतपणे बोलतोय, हे पाहून तो खूपच भडकला होता. पण मी तितक्याच शांतपणे बोलत राह्यलो. अखेरीस त्याने हात टेकले आणि म्हणाला, ‘तुझी काशी कर. मला तुझ्याशी बोलण्यात ××भर इंटरेस्ट नाय.’


खरं म्हणजे मी, पण दोन-चार शिव्या हासडीन, मग दोघांचं अरे-तुरे होईल, गचुरं धराधारी होईल, दोन-चार बघे मधी पडतील. पण माझ्या शेळपट, शामळू, शांत बोलण्यानं ती गंमतच गेली, म्हणून तो फार नाराजीने निघून गेला आणि परतताना गाडीसोबत माझा मेंदूदेखील वीसपेक्षा अधिक आरपीएमने फिरू लागला.
अशा घटना नव्या नाहीत, अनेकदा माझ्या गाडीला तुझी गाडी घासली, म्हणून लोकांनी एकमेकांचे मुडदेदेखील पाडले आहेत. पण शांत बोलणं शामळू आणि नामर्दपणाचं वाटावं इतके समाज म्हणून आपण हिंसक होत चाललो आहोत का, माझ्या मनात विचारांची आवर्तनं सुरू झाली.


ट्रॅफिकमध्ये असे किरकोळ अपघात झाल्यावर कुणी भांडणं एक वेळ क्षम्य तरी म्हणता येईल, पण न्यूज चॅनेलवर ‘प्राइम टाइम’ला सुरू असणारे तथाकथित डिबेट म्हणजे शिवीगाळीचं डिस्टिल्ड रूप आहे. अनेक चर्चा या नळावरील भांडणापेक्षा खालच्या दर्जाच्या आणि अधिक आक्रमक असतात. म्हणून तर अशा काळात बामियांमधील बुद्धमूर्ती बॉम्ब लावून उडवल्या जातात, रामनवमीच्या मिरवणुकीत खनी शंभू सेंगरचा देखावा उभा केला जातो.
गौतम बुद्धाची सम्यक वाणी जणू अकादमिक चर्चेपुरती उरली आहे. शाळकरी मुलाने शाळेत बेछूट गोळीबार करून अनेकांचा बळी घेतल्याच्या अमेरिकन बातम्या आपण अधूनमधून ऐकत असतो. टीव्ही, सिनेमा आणि गेम्स यामुळं ही नवी पिढी हिंसेला निर्ढावत चाललेली आपण अनुभवतो आहोत. हिंसक व्हिडिओ गेम्स या मुलांना अधिक आक्रमक बनवत आहेत. त्यांच्यातील कारुण्य, समभाव, मदतीची भावना उमलण्यापूर्वीच करपून जात आहे. आज ज्यांनी पन्नाशी ओलांडली आहे, अशांना आपल्या बालपणीच्या आठवणी असतील, सिनेमा पाहताना आपल्यापैकी अनेक जण मारामारीचा प्रसंग आला की डोळे मिटून घ्यायचो आणि मारामारी संपली का याची आई-बाबा कडून खात्री करून घेतल्यावरच डोळे उघडायचो.आज अगदी निवांत पिझ्झा किंवा बर्गर खात  इवली इवली पोरं, कमाल हिंसक प्रसंग निर्विकार मनानं पाहताना मी पाहतो, तेव्हा माझ्या काळजाचे पाणी पाणी होते. एका मानसशास्त्रीय अभ्यासात मुलांना तीन प्रकारचे फोटो दाखवण्यात आले. 


पहिल्या गटातील फोटो हे सुखद आणि आनंददायी कौटुंबिक, सामाजिक क्षणांचे होते, तर दुसऱ्या गटातील फोटो नकारात्मक पण हिंसक नव्हते, म्हणजे कॅन्सरची गाठ असलेला रुग्ण किंवा अशा प्रकारचे! तिसऱ्या गटातील फोटो हिंसक होते, चाकूहल्ला किंवा त्या प्रकारचे! जी मुले खूप मोठ्या प्रमाणावर हिंसक व्हिडिओ गेम्स खेळत होती त्या गटातील मुलांच्या मेंदूत सुखद आणि हिंसक प्रकारचे फोटो पाहून एकसारख्या लहरी निर्माण झाल्या होत्या. म्हणजे, या मुलांसाठी हिंसक आणि सुखद भावना एकसारख्या होत्या. व्हिडिओ गेम्स पाहता पाहता, आपली भावी पिढी त्या गेम्समधील एक पात्र होऊ  लागली आहे. पडद्यावर आणि अवतीभवती हिंसा इतकी व्यापून उरली आहे की आता रक्त पाहून हृदयाची गती वाढत नाही, कपाळावर घाम येत नाही, इतकी ती रोजमर्रा की चीज होऊन बसली आहे. परवा, गांधी पुण्यतिथीला गांधींच्या पुतळ्याला गोळ्या मारून त्यातून वाहणारे रक्त दाखवणारा आणि गांधी हत्येचा, गांधींच्या खुन्याचा जयजयकार करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आणि हे सारे आठवले. जणू हा लाइव्ह व्हिडिओ गेम होता, आपल्याच राष्ट्रपित्याच्या हत्येचा! आपण सगळे या गेम्समधील प्यादी होऊ लागले आहोत. उद्या तो पुतळा जिवंत माणूस असू शकेल आणि त्याच्यावर गोळी झाडणारा तुमच्या-माझ्या रक्ताचा गोळा असू शकेल, कुणी सांगावं? आज या बंदुका खोट्या आहेत, वाहणारं रक्त खोटं आहे, पण हे सारं कधी खरंखुरं होईल, कोणी सांगावं? आणि त्या वेळी आपण कुठं असू? प्रत्येक वेळी बंदूक आपल्याच हाती कशी असेल, आपण गोळी झेलणारेही असू शकू. आपण कोणत्या रक्तरंजित वळणावर येऊन उभे ठाकलो आहोत दोस्त! आपण आपल्या जगण्यातील अवघी कोवळीक करपून टाकतो आहोत. माणसं एखाद्या कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या मालासारखी एकसारखी नसतात, त्यांना वेगळे रंग, रूप, विचार असतात, हे साधं सत्य विसरून चाललो आहोत का आपण ? 


मग गांधी आठवतात, आठवतात नौखालीतील विस्मृतीत गेलेले क्षण. फाळणीचा काळ आहे, नौखाली रक्तानं माखली आहे. गांधी एकटे बेचिराख होणाऱ्या नौखालीत माणूस शोधत फिरताहेत. एका गावात पोहोचतात. गाव मुस्लिमबहुल आहे. गावात खूप खूनखराबा झालाय, दोन्ही बाजूंची असंख्य माणसं कापली गेलीत. गांधीजींना तरीही आशा आहे, हे गाव जोडता येईल. ते गावातल्या शाळेच्या पटांगणात उभे आहेत, लोकांना सर्वधर्म प्रार्थनेला येण्याचं आवाहन करताहेत, पण हिंदू-मुस्लिम दोन्ही लोक त्यांच्याकडे साशंकतेने पाहत उभे आहेत, पुढे कोणीच यायला तयार नाही. गेल्या काही दिवसांतील दंगलीने, रक्ताच्या पाटाने त्यांच्यातील भावंडभाव वाहून गेला आहे.


मग, त्या गर्दीत उभ्या असलेल्या पोरांना पाहून बापूंना आयडिया सुचते. ते जवळ पडलेला एक चेंडू हातात घेतात आणि पोरांना खुणावतात, ‘या पोरांनो खेळूया,’ पोरं क्षणभर बावरतात, पण क्षणभरच आणि मग हिंदू-मुस्लिम सारी पोरं बापूभोवती ‘चेंडू चेंडू’ करत जमा होतात आणि जवळपास अर्धा तास बापू त्या पोरांसोबत पोर होऊन खेळत राहतात. पोरं हिंदू आहेत, पोरं मुसलमान आहेत. कुणाचा बाप मारला गेलाय, कुणाचा भाऊ, कुणाची बहीण सापडत नाही, तर कुणाची आणखी कोण गायब आहे. पण सारं विसरून पोरं खेळत राहतात आणि मग बापू जमावाला उद्देशून म्हणतात, ‘अरे, तुमच्यापेक्षा तुमची पोरं अधिक हुशार आहेत, समंजस आहेत.’ जमाव शरमेने चूर आहे, खाली मान घालून बापूंच्या दिशेने चालत येतो आणि त्याच मैदानात सर्वधर्म प्रार्थनेचे सूर घुमू लागतात. एकमेकांच्या रक्ताची तहान थांबते, आग विझत जाते, माणसं माणसाला उराउरी भेटू लागतात, रक्ताचा महापूर आलेल्या गावात कोवळा उबदार सूर्य उगवतो.
माझ्यापर्यंत आलेल्या त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओत बापूजीचं रक्त सांडू लागतं, तेव्हा भरल्या डोळ्यांनी मी बापंूना नौखालीत गवसलेला तो चेंडू शोधू लागतो. नौखालीच्या, रक्तरंजित आभाळातही आपलं निरागस बाल्य जपणारा, तो चेंडू मला हवा आहे, सतत माझ्यासोबत हवा आहे.
...पण मला तो चेंडू सापडत नाही. बापूंच्या चोरीला गेलेल्या चष्म्यासारखाच हा चेंडू मला छळत राहतो. माझी रोज नव्यानं परीक्षा घेत राहतो...


प्रदीप आवटे
dr.pradip.awate@gmail.com
लेखकाचा संपर्क : ९४२३३३७५५६

बातम्या आणखी आहेत...