आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आली बघ तुझी बस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खिडकीतून बाहेर पाहत मी शहराचा मोन्ताज अनुभवत होतो आणि मग माझ्या लक्षात आले,की मघाशी याच बसस्टॉपवरून माझा कावलेला मित्र स्वारगेटला गेला असेल. बस तर त्याला मिळाली असेल, पण या बस अनाउन्सरला गवसलेला ‘झपुर्झा क्षण’ माझ्या मित्राच्या ओंजळीला चिकटला असेल का? 


‘तुला वाटतंय रे तसं! काय सोप्पं राह्यलेलं नाय आता,’ तो एकदम वैतागून सांगत होता. माझा एक शालेय वर्गमित्र मला भेटायला माझ्या ऑफिसमध्ये आला होता. आता तो एका हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करतो. पुण्यातलं त्याचं कसलंसं ट्रेनिंग संपल्यावर गावी जाता जाता मला भेटण्यासाठी तो आला होता. मी बोलता बोलता त्याला सहज म्हणालो, ‘मला तुझा खूप हेवा वाटतो यार. मला शिक्षक व्हायला खरंच खूप आवडलं असतं. मुलांसोबत शिकताना, वाढताना आपणही एका नव्या नजरेने जग पाहायला शिकतो आणि आपली नजर सतत नवी राहते, ती म्हातारी होतंच नाही.’ त्याला माझं हे बोलणं ज्याम येडच्याप वाटलं. 


‘तू काही तरी पुस्तकी बोलू नको बेऽ तसलं काय होत नसतंय. आता पोरांना अंगाला हात लावायला परवानगी नाय. आन आता कुणा XXXच्याला शिकायचं? ज्यानं त्यानं क्लास लावलेले असतात. वर्गात त्यांचं लक्षच नसतंय.’
‘अरे, तरी पण क्लासपेक्षा तू चांगलं शिकवत असशील, तर पोरं तुझ्यावर खुश होणारच की!’ 
‘इथं शिकवायला कुणाला वेळंय बाबा... संस्थाचालकाला सांभाळ, बदल्या मॅनेज कर यातच डोक्याचा भुगा होतंय.’ 
‘बाय द वे, कसलं ट्रेनिंग होतं तुझं?’
‘ब्रिटिश कौन्सिलने शिक्षकांकरता हे ट्रेनिंग घेतलं होतं.’ 


ब्रिटिश कौन्सिल हे नाव ऐकून मी हरखून गेलो. ‘भारी असणार ट्रेनिंग’, असा विचार माझ्या मनात चमकून जातो न जातो तोच माझ्या मनातलं ओळखल्यासारखं तू बोलला, ‘या ट्रेनिंगनी तर वैताग आणलाय. एक संपलं की दुसरं!’
‘पण काही तरी नवं शिकायला मिळत असेल की,’ या माझ्या वाक्यावर त्यानं एकदम कडू औषध प्यायल्यासारखी पोज दिली. एकूण तो त्याच्या नोकरीवर अगदी वैतागलेला होता, हे स्पष्ट दिसत होतं. मग मीच गमतीनं बेल वाजवून शिपायाला बोलावलं आणि म्हटलं, ‘अरे टेबल जरा पुसून घे रे. कधीपासून रडतोय हा, ओला झालाय बघ.’ शिपायाने क्रमाक्रमाने माझ्याकडे, टेबलकडे आणि त्याच्याकडे पाहिले. त्याच्या बिचाऱ्याच्या काहीच लक्षात आले नाही, तरी माझ्या म्याडगिरीची सवय असल्याने तो हसत हसत बाहेर पडला. माझा मित्र मात्र कसनुशा चेहऱ्याने, ‘करा चेष्टा आमची,’ असं म्हणत खट्टू झाला. चहा वगैरे झाल्यावर त्यानं माझा निरोप घेतला.
मीही ऑफिसनंतर आंबेडकर पुतळ्यासमोरच्या बसस्टॉपला येऊन उभा राहिलो. स्वारगेटची पाच नंबर जुनी-पुराणी बस वयोमानानं खुबे गेलेल्या म्हातारीसारखी दोन्ही बाजूंनी डुलत डुलत समोरून येताना दिसली. पुढच्याच क्षणी कानावर अगदी ओळखीचा लयदार आवाज कानावर आला, 


‘आली बघा स्वारगेट, चला, चला स्वारगेट थेट
भवानी पेठ, गंज पेठ स्वारगेट थेट!’
मध्येच कुणी तरी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर, ‘नो नो, नो नारायण पेठ!’
मी वळून बस अनाउन्स करणाऱ्या त्या कर्मचाऱ्याकडे पाहिलं. ते नेहमीचेच स्थूल गृहस्थ, अंगावर पीएमटीचा खाकी ड्रेस, थोडीशी दाढी वाढलेली. हातात माइक घेऊन मोडक्या-तोडक्या खुर्चीवर बसून ते येणारी प्रत्येक बस मुक्तछंदातील कविता वाचावी किंवा एखादं रॅप म्हणावं तसे पुकारत होते. ड्रायव्हरला त्याच स्टाइलमध्ये सांगत होते.


‘थोडी पुढं, थोडी पुढं, आता बस थोडी थांबू द्या
पब्लिकला बसू द्या. ब्रेक जरा दाबून घ्या.
हे मी रोज संध्याकाळी पाहायचो, ऐकायचो. प्रत्येक बसची घोषणा ते एका ऱ्हिदममध्ये करायचे. कोथरूड डेपो, शिवाजीनगर, हिंजवडी, चिंचवडगाव. अशी येणारी प्रत्येक बस त्यांच्या मुखातून एखाद्या कवितेसारखी प्रगट व्हायची. पुणे स्टेशनजवळचा बस स्टॉप असल्याने तिथं तोबा गर्दी असायची. ऑफिसचे वळ वागवत बाहेर पडलेले चाकरमाने, ऑफिस आणि घर अशी दुहेरी कसरत करणाऱ्या बायका, दूर गावावरून पुण्यात आलेले प्रवासी. दमलेले- भागलेले. कुणाच्या हातात ओझे, कुणाच्या मनावर ओझे, कुणाच्या कडेला लहान मूल. कुणी अंध व्यक्ती आपली पांढरी काठी सांभाळत वाट काढणारा, आपली बस शोधणारा, कुणी डोळे असूनही धडका मारत धावणारा. बस वेळेवर यायच्या नाहीत, आल्या तरी खचाखच भरलेल्या. या साऱ्यांनी कातावलेली जनता. पण ‘आली बघा कोथरूड डेपो. अपोलो, लाल महाल. शनवार वाडा, अप्पा बळवंत, अलका, डेक्कन, नळ स्टॉप, पौड रोड, कोथरूड डेपो,’ असं ठसकेबाज रॅप कानावर पडलं की, या सगळ्या थकल्या भागल्या चेहऱ्यावर क्षणभर का असेना हसू फुलायचं. जीवघेण्या उकाड्यात वाऱ्याची शांत झुळूक यावी, असं काही तरी गोड काळजाला स्पर्श करून जायचं. नक्की बस आलीय की, कुणाची गर्लफ्रेंड आलीय भेटायला, असं वाटायचं कधी कधी.  मी एकदा त्यांची ओळख करून घेण्याचाही प्रयत्न केला. ‘तुम्ही खूप छान अनाउन्स करता,’ असं काही तरी म्हणालोही, पण ते त्यांच्याच बस पुकारण्याच्या तंद्रीत होते. फारसं बोलले नाहीत. एखाद्याला वाटायचंही, ‘बस आली तर नीट सांग ना, हा फालतूचं गातोय बितोय कशाला?’ काही जणांना सारंच व्यर्थ वाटतं. मला उगीच केशवसुत आठवले, ‘व्यर्थी अधिकच अर्थ दिसे, तो ज्यास दिसे, त्या म्हणती पिसे, त्या वेडाचे बोल कसे झपुर्झा गडे झपुर्झा.’ कोणाची झपुर्झा अवस्था कुठं असेल, कोणाला ती कुठं गवसेल, कसं सांगावं!


...आणि मग मला माझा निराश, वैतागलेला हायस्कूल टीचर असणारा मित्र आठवत राहिला… बराच काळ! शिक्षकासारख्या सर्जनशील व्यवसायात त्याची घुसमट झाली होती आणि इथं तुडुंब भरलेल्या बसस्टॉपवर, चेंगराचेंगरी होणाऱ्या गर्दीत, कर्कश्श आवाज करणाऱ्या बसेसच्या ताफ्यात या इवल्याशा माणसाला, जणू कविता गवसत होती. पीएमटीमध्ये काम करणाऱ्या या माणसालाही त्याचा साहेब असणारच की... त्याचेही काही व्यापताप असणारच की. आणि असा कितीसा पगार तरी असेल? पण तो त्याचा छोटासा जॉब एन्जॉय करत होता. मी बसने माझ्या घराकडे चाललो होतो, जागा अर्थातच मिळालेली नव्हती. खिडकीतून बाहेर पाहत मी शहराचा मोन्ताज अनुभवत होतो आणि मग माझ्या लक्षात आले की मगाशी याच बसस्टॉपवरुन माझा कावलेला मित्र स्वारगेटला गेला असेल. त्यानंही हे ऐकलं असेलच की. बस तर त्याला मिळाली असेल, पण या बस अनाउन्सरला गवसलेला ‘झपुर्झा क्षण’ माझ्या मित्राच्या ओंजळीला चिकटला असेल का? आणि चिकटलाही असेल तर त्याचं मोल त्याला कळेल का? आपण प्रत्येक जण आपल्या वाट्याला आलेले काही ना काही काम करत असतो. तेच तेच काम रोज करताना त्यात येणारा तोचतोचपणाही स्वाभाविक असतो. या तोचतोचपणावर आपल्याला कल्पकतेने मात करावी लागते. कामाला नावीन्य आपण द्यायचं असतं. माझ्या कामाने मी माझ्या आणि इतरांच्या आयुष्यात क्षणभर का असेना इवलासा आनंद भरू शकतो का, असा विचार केला की  रस्ता गवसू लागतो. ‘जा पोरी जा,’ ‘जा पोरी जा,’ असं पुन्हा पुन्हा म्हणता म्हणता वेग, लय आणि तंद्रीतून झपुर्झा जन्माला येतं. जगण्याचं तरी कुठं वेगळं आहे? गोष्टी त्याच त्याच असतात पण त्या करण्याची असोशी, जुनून, पॅशन त्या रोजमर्राच्या गोष्टींना ‘झपुर्झा टच’ देते.


माझ्या गावाकडील एक प्राथमिक शिक्षक विकास काळे यांचं उदाहरण या बाबतीत बोलकं आहे. खेड्यापाड्यातील मुलांना या अवलियाने शिक्षणाची अशी काही गोडी लावली आहे की, सुरुवातीला शाळेत येताना रडणारी मुलं नंतर काळे गुरुजींच्या अंगाखांद्यावर खेळू लागतात. नव्हे नव्हे, सुटीदिवशी  शाळा बंद असतानाही, मुलं पालकांकडे शाळेत जाण्याचा हट्ट धरू लागतात. गाणी, गोष्टी, खेळ, छान छान बाल चित्रपट या साऱ्यांमुळे त्यांची शाळा आनंददायी शिक्षणाची मूर्तिमंत उदाहरण झाली आहे. गंमत म्हणजे, काळे गुरुजी कधी कोणत्या गोष्टीचा कल्पकतेने वापर करून त्याचे शैक्षणिक साधनात रूपांतर करतील, हे सांगता येत नाही. एकदा त्यांच्या वर्गात हिरवा सरडा आला आणि मुलं घाबरून गेली, तर गुरुजींनी चक्क तो सरडा आपल्या हातावर घेतला आणि मुलांना ग्रीन शॅमेलिऑनविषयी माहिती दिली. हिरवा सरडा ही दुर्मिळ प्रजाती. त्याच्याविषयी आपल्या मनात उगीच भीती असते. त्याला दात नसतात, त्यामुळे तो चावत वगैरे काहीच नाही. हे सारं कळाल्यावर पोरं धीरानं त्या सरड्याला हात लावून बघू लागली. गुरुजी लिहितात, ‘पोरांना कळेलच की यथावकाश. रंग बदलणाऱ्या सरड्यापेक्षा रंग बदलणाऱ्या माणसांपासून कसं लांब राहायचं ते...!’ सरडा पुन्हा गवतात सोडून देताना पोरं किती आणि काय काय शिकलेली असतात.


कोणत्याही व्यवसायात, कामात निरस भाग, नकोसा वाटणारा भाग खूप असतो. तुम्ही कुठेही असा, काहीही करा, पूर्णपणे आपल्या मनासारखं, हवं तसं तुम्हाला जगता येतच नाही. पण जगणं एखाद्या खाणीसारखं आहे. हजारो टन दगड-माती उपसावी, तेव्हा तुम्हाला हवंहवंसं वाटणारं मूठभर खनिज गवसतं. आपण निरर्थक वाटणारी दगड-माती उपसायचीच नाही, म्हटलं तर काही अनोखा धातू, गुंजभर सोनं हाती लागण्याची शक्यताही धूसर होत जाते. आणि या साऱ्या निरर्थकतेचीच जेव्हा कविता होते, तेव्हा त्या गुंजभर सोन्याची प्रतीक्षाही नावापुरती उरते. तिथंवर पोहोचण्याचा प्रवासच अधिक सुंदर होत जातो. इतका की, आपण कशाकरता निघालो होतो, हेही विसरायला होतं. मग चला, तर या मस्त प्रवासाला. ते बघा बसची अनाउन्समेंटदेखील झाली, ‘डोळे पुस, खुदकन हस, आली बघ तुझी बस…!’    


प्रदीप आवटे
dr.pradip.awate@gmail.com
लेखकाचा संपर्क : ९४२३३३७५५६

बातम्या आणखी आहेत...