आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमची चित्रकथी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रकथी परंपरा प्रामुख्याने कथनशैली परंपरा आहे. चित्रकथांमध्ये आणि पुराणिकांमध्ये बरेचसे साम्य असते. निरूपण, संवाद आणि गायन अशा त्रिसूत्रीतून चित्रकथी कथाकथन केले जाते. या कथनात सहजता  व  उत्स्फूर्तता असते. चित्रकथीच्या सादरीकरणाची पद्धती हरदासी कीर्तनकारासारखी असते.

 

सन १८४३ मध्ये मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या  विष्णुदास भावेंनी नाटकाच्या खेळांची प्रेरणा भागवत मेळे आणि कळसूत्री बाहुल्या यांच्याकडून घेतली. बाहुल्यांची परंपरा भारतीय लोकरंगभूमीवरील प्राचीन परंपरा असून ज्ञानेश्वरीत ‘साई खेडीया काय वर्णावे सूत्रधाराते’ असा उल्लेख आहे. काश्ठपांचलिका आणि चित्रकथी या परंपरांनी महाराष्ट्रातील लोकसंस्कृती एकेकाळी समृद्ध होती. चित्रकथांची  पिंगुळी शैली आणि पैठणी शैली आजही प्रसिद्ध आहे. पैठणी शैलीच्या खाणाखुणा अद्याप दिसत असल्या तरी ती अवशेष रूपाने उरली आहे. पिंगुळी शैलीची परंपरा मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजात आजही कायम आहे. गणपत मसगे, वसंत गंगावणे हे चित्रकथी परंपरेचे विद्यमान निर्वाहक आहेत.


चित्रकथी परंपरा ही मूलतः पुराणिक अथवा कथेकरी, हरदास कीर्तनकार यांच्यासारखी कथनपरंपरा. या कथनपरंपरेला भारतीय लोकसंस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. पश्चिम बंगालची कीर्तनीय परंपरा, कर्नाटकातील पुरंदर दास, हरिकथा, गुजरातमधील चारण, अथवा राजस्थानातील मांगणियार परंपरा या व अशा अनेक कथन परंपरा आजही अस्तित्वात आहेत. चित्रकथीत केल्या जाणाऱ्या सादरीकरणाला पोथीवाचन म्हणतात.

 

चित्रकथींचे सादरीकरण 
निरूपण, संवाद आणि गायन अशा त्रिसूत्रीतून चित्रकथी कथाकथन करतात. त्यांच्या कथनात सहजता  व  उत्स्फूर्तता असते. रामायण-महाभारत आणि पुराणांतील कथा पदबंधातून  सादर करताना ते एका पदबंधानंतर त्या पदबंधातील प्रसंगाचे निरूपण करतात. हे निरूपण करताना त्या प्रसंगातील पात्रांचे संवाद स्वतः सादर करतात व प्रसंगाचे कथन झाल्यावर पुन्हा पुढच्या पदबंधाचे गायन सुरू करतात. एकूणच चित्रकथ्यांची ही सादरीकरणाची पद्धती हरदासी कीर्तनकारासारखी असते. ग्राम संस्कृतीत ग्राम पुरोहित आणि कथेकरी होती. चित्रकथी हे लोकदीक्षित म्हणजेच  कथेकरी म्हणून सर्वज्ञात आहेत. चित्रकथीची कथनशैलीची भाषा मराठी असते. पोथी वाचण्यासाठी ज्या पद्धतीने मांडी घालून बसतात तसाच चित्रकथी बसतो. त्याच्या समोर पोथी बांधण्याची फळी असते. या फळीपुढे तो चित्रे ठेवतो. खांद्यावर वीणा, डाव्या हातात टाळ घेऊन तो उजव्या हाताने वीणा वादन करतो. वीणावादन करतानाच तो डाव्या हाताने चित्रे बदलतो. दोन चित्रांच्या मधील प्रसंगामध्ये तो एखाद्या अभंगाचे चरण गाऊन  नीतिबोध करतो.


ऋद्धी-सिद्धीसह गणेशाचे अवतरण, गणेशाचे वंदन, सरस्वतीचे आगमन, सरस्वतीकडून उपदेश आणि नंतर रामायण, महाभारतातील कथेचे कथन असे चित्रकथीचे स्वरूप असते. ऋद्धी-सिद्धीसह गणेशाचे चित्र प्रारंभी फळीवर ठेवण्यात येते तेव्हा चित्रकथी गायनाला सुरुवात करतो,


दे पायाची जोड। मोरया दे पायाची जोड।
तुजवीण कवणा। शरण मी जाऊ।
नाम तुझे बहु गोड। मोरया दे पायाची जोड।
नाना दुःखे भोगुनी सारी। विषय वासना सोड।
दे पायाची जोड। मोरया दे पायाची जोड।

 

गणेशाचे वंदन करणारे कविजन हे पात्र चित्रकथीमध्ये प्रारंभीच येते. या कविजन पात्राला गणेश आणि नंतर सरस्वती नीतिबोध करते. गणेश आणि सरस्वती यांच्या वंदनेनंतर रामायण, महाभारत, नंदीपुराण, विष्णुपुराण, काशीखंड यांपैकी एखाद्या ग्रंथामधील एखादी निवडक कथा चित्रकथी सादर करतात. उदा. रामायणातील सीतास्वयंवर ही कथा 


पत्रिका उत्तरे गेली, ब्रह्माने वाचली,
त्याने घोड्यावर ध्वजा उभारली।
राजा ब्रह्मा चालला मिरवत, 
जातो स्वयंवराला जानकीच्या लग्नाला।।

 

असे सर्व देवलोकांना आमंत्रण दिले जाते. त्यानंतर सीतेच्या विवाह   सोहळ्यातल्या विविध प्रसंगांना अनुसरून लग्नाच्या प्रसंगापर्यंतची सर्व प्रकारची पदे व संवाद चित्रकथीत सादर केली जातात. 

 

कथनशैली पुराणिकांसारखी 
चित्रकथी परंपरा ही प्रामुख्याने कथनशैलीची परंपरा असल्याने चित्रकथांमध्ये आणि पुराणिकांमध्ये बरेचसे साम्य असते. पुराणिक हरिविजय, पांडवप्रताप, काशीखंड, शिवलीलामृत नवनाथ भक्तिसार आदी ग्रंथांचे वाचन करताना प्रथम त्या पोथीतील ओवी गाऊन दाखवतात व ओवीवर निरूपण करतात. चित्रकथीही पोथीतील चित्रे दाखवतात आणि त्यावर निरूपण करतात.  चित्रकथ्यांच्या या चित्रांना पोथ्या असेच म्हणतात. चित्र दाखवल्याबरोबर चित्रकथी त्यावर गायन सुरू करतो. मग संवाद आणि निरूपणाच्या रूपात तो त्या विशिष्ट प्रसंगाचे कथन करतो. चित्रकथ्याच्या कथनशैलीमध्ये नाट्य असते. तो कथन करताना समकालीन संदर्भांचाही वापर करतो. कधीकधी लौकिक जीवनातील दाखले देत त्यांची विनोदी पद्धतीने मांडणी करतो. त्या वेळी स्थानिक बोलीभाषेचा वापर करतो. 


गणपत मसगे यांच्या चित्रकथी सादरीकरणाने आणि त्यांनी सादर केलेल्या बाहुल्यांच्या खेळातील सीता स्वयंवर कथेने कथन आणि संवाद शैलीची वेगळीच वैशिष्ट्येे वृत्तपत्र व सांस्कृतिक क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना साहाय्यभूत ठरत आहेत.  

 

 डॉ. प्रकाश खांडगे

लेखकाचा संपर्क : ९८२१९१३६००

बातम्या आणखी आहेत...