हेमलकसा / सरकारी अनास्था : डॉ. आमटेंच्या वन्यप्राणी अनाथालयाचा नवा प्रकल्प अद्यापही मंजुरीच्या प्रतीक्षेत

हेमलकसाच्या लोकबिरादरीमध्ये वसवलेली वन्यवस्ती अंधारात

रमाकांत दाणी

Aug 13,2019 09:02:00 AM IST

हेमलकसा (गडचिरोली) - ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पातील वन्यप्राणी अनाथालय (रेस्क्यू सेंटर) नव्या आणि सुरक्षित जागेत स्थानांतरित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठीचा सविस्तर अाराखडा दीड वर्षापूर्वी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाला (सेंट्रल झू अॅथॉरिटी) सादर होऊनही त्यावर कुठलाच निर्णय होत नसल्याने हा प्रकल्पच रखडला आहे.


गडचिरोली जिल्ह्यातील निसर्गसंपन्न अशा भामरागडजवळ हेमलकसा येथे डॉ. आमटे यांनी स्थानिक माडिया आदिवासींच्या कल्याणासाठी लोकबिरादरी प्रकल्पाची सुरुवात केली होती. या प्रकल्पाच्या उभारणीच्या पाठोपाठ १९७४ मध्ये वन्यप्राणी अनाथालयदेखील सुरू झाले. या अनाथालयास प्राधिकरणाने २००८ मध्ये वन्यप्राण्यांची योग्य देखभाल करण्याच्या दृष्टीने रेस्क्यू सेंटर म्हणून मान्यता दिलेली आहे. ही मान्यता पुढेही कायम राहावी यासाठी ते मोठ्या व सुरक्षित जागेत स्थानांतरित करण्याची तसेच प्राण्यांचे वास्तव्य, देखभाल, उपचार अशा सर्व प्रकारच्या सोयींसाठी पायाभूत सुविधा उभारण्याची सूचना प्राधिकरणाने लोकबिरादरी प्रकल्पास केली होती. त्यानुसार प्रकल्पाच्या अगदी शेजारीच सहा ते सात एकर जागेत नवे रेस्क्यू सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. वन्यप्राण्यांना पुरेशा नैसर्गिक वातावरणात ठेवता यावे यासाठी वैशिष्ट्यपूर्ण िपंजऱ्यांची उभारणी करण्याची योजना आहे. प्राधिकरणाच्या सूचनांचा विचार करून या प्रकल्पाचा अाराखडा तयार करण्यात आला. दीड वर्षापूर्वी हा आराखडा प्राधिकरणाला सादरही करण्यात आला. मात्र, अद्यापही प्राधिकरणाने मंजुरीबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही.


प्राधिकरणाकडून अद्याप काहीच हालचाल नाही
सध्या लोकबिरादरी प्रकल्पाची जबाबदारी डॉ. आमटे यांचे ज्येष्ठ पुत्र अनिकेत सांभाळतात. “रेस्क्यू सेंटरची मान्यता कायम राहण्यासह नव्या जागेत प्रकल्प उभारणीसाठी आराखड्याला मंजुरी मिळणे अत्यंत आवश्यक आहे. आमच्याकडून सर्वच बाबींची पूर्तता झालेली आहे. सातत्याने पाठपुरावाही सुरू आहे. मात्र, प्राधिकरणाचे अधिकारी वा सल्लागार समिती त्यावर निर्णयच घेत नाही. आराखड्यात त्रुटी आहेत की काय हेसुद्धा कळायला मार्ग नाही. त्यामुळे आम्हाला नव्या जागेत प्रकल्पावर काम सुरू करता आलेले नाही,’ अशी व्यथा अनिकेत आमटे यांनी मांडली. आराखड्यास मंजुरी मिळाल्यावर त्यावर लगेच काम सुरू करण्याचे आमचे नियोजन आहे. त्यासाठी ६ ते ७ कोटी रुपयांचा निधी लागणार असून त्याची जुळवाजुळव कशी करायची, असाही प्रश्न आमच्यापुढे राहणार असल्याचे अनिकेत यांनी सांगितले.

प्रकल्पात तब्बल ११० माणसाळलेले प्राणी
आदिवासींनी वन्यप्राण्यांची शिकार करू नये यासाठी डॉ. प्रकाश आमटे यांनी परिसरात व्यापक प्रमाणात जागृती केली. त्याचे चांगले परिणाम दिसून आले. मात्र, जंगलातून गावात भरकटलेल्या वन्यप्राण्यांची पिल्ले आदिवासी आमटेंच्या सुपूर्द करू लागले. अशा पद्धतीने लोकबिरादरी प्रकल्पात प्राण्यांची गर्दी होत गेली. सध्या प्रकल्पात ११० प्राणी असून त्यात बिबटे, अस्वले, हरण, चितळ, तडस, निलगाय, कोल्हे, मगरी, साळिंदर, रानमांजरी, मोर, माकडे, शेकरू, घोरपडींसह विविध जातींच्या सापांचेही वास्तव्य आहे. या प्राण्यांची प्रकल्पात योग्य देखभाल केली जात असून सर्वच प्राणी माणसाळले असल्याने त्यांना हाताळण्यात आमटे यांना कुठलीच अडचण जात नाही. प्रकल्पातील ही पाहुणे मंडळी पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक येथे येतात.

X
COMMENT