आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्याच आहाराकडे दुर्लक्ष नको

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात खाद्यसंस्कृतीची विविधता इतकी आहे की, दर दहा मैलावर खाद्यपदार्थ आणि त्याची चव बदलते. इतकी विविधता ही दुसऱ्या कोणत्या देशात क्वचितच असेल. पण भारतात एक गोष्ट सामाईक आहे, ती म्हणजे स्वयंपाकघरात बनणाऱ्या पदार्थ सेवनात तिचे स्थान दुय्य्म असते. जरी ती जेवण बनवत असली तरी भारतातील शहरी व ग्रामीण भागात ७० टक्के स्त्रिया या कुपोषित आहेत किंवा त्यांच्यात  अॅनिमियाचे प्रमाण हे सर्वात जास्त दिसून येते. याचं कारणं म्हणजे खाण्यापिण्याच्या बाबतीत स्त्रिया या नेहमी स्वत:कडे दुर्लक्ष करतात.  या दुर्लक्ष करण्यामागे महत्त्वाचे कारण आहे, ते म्हणजे स्त्रियांच्या आहाराबद्दल असलेली मानसिकता. त्यामुळे स्त्रियांनी आता एक खूणगाठ बांधली पाहिजे की आपल्या आहाराची आणि शरिराची काळजी आपणच घ्यायची आणि ही काळजी घेत असताना कोणतीही अपराधीपणाची भावना मनात येता कामा नये. इतकं केलं तरी खूप महत्त्वाचं पाऊल असेल. आपल्याला दिवसभर काम करावं लागतं, कुटुंबाची काळजी घ्यावी लागते यासाठी काय-काय खावे आणि काय टाळावे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. अनेक स्त्रिया या घरकामात इतक्या गुंतून जातात की त्यांची खाण्यापिण्याची काही वेळ ठरलेली नसते किंवा आहाराबद्दल नियोजन नसते. त्यामुळे सकाळी नाष्टा करणे आणि त्यात केळी, राजगिऱ्याचे लाडू, भाताची पेज, रव्याची खीर या पदार्थांचा समावेश असणे गरजेचे आहे या पदार्थांमुळे शरीराला ऊर्जा मिळते. दिवसाची सुरुवात पोषणयुक्त आहाराने होते. नाष्टा आणि दुपारचे जेवण यामध्ये खूप तासांचे अंतर ठेवू नये. मधल्या वेळेत  भाजलेले फुटाणे, शेंगदाणे, लाह्या असे हलके पदार्थ खाऊ शकता. जे‌‌‌‌वणात रोज एकाच प्रकारचे पदार्थ न खाता गव्हाची चपाती, नाचणीची भाकरी, ज्वारीची भाकरी, पालेभाज्या, पराठे, कडधान्य, थालीपीठं असे पदार्थ अालटूनपालटून खावेत. तसेच मांसाहाराचा समावेशदेखील जे‌वणात असलाच पाहिजे. चौरस आहार घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या आहारात बेकरीचे पदार्थ, पॅकबंद पदार्थ, बाटलीबंद पदार्थ, सॉस यांचा स्वयंपाकघरात व आहारात कमीत कमी समावेश असावा.  स्त्रिया नेहमीच अन्न वाया जायला नको म्हणून शिळं खातात. अनेक वेळा ज्यादा झालेलं अन्न फ्रिजमध्ये ठेवून दोन ते तीन दिवस खातात. एखाद्यावेळी शिळं खाणं ठीक आहे, पण रोज शिळं कधीच खाऊ नये. त्यामुळे जेवण बनवतानाच ते गरजेनुसार बनवा. स्वयंपाकघरात प्लास्टिकचा वापर, स्टीलच्या भांड्यात जेवण बनवणे, फ्रिजचा जास्त वापर या गोष्टी टाळाव्यात. स्त्रियांनी घरात जेवताना सर्वांसोबत जे‌वावं, मन लावून जेवण करावं. घरच्या बाईकडे सर्व घराला खाऊ घालण्याची जबाबदारी असते. अनेक बायका या घरचे सगळे व्यवस्थित जेवले  यातच समाधान मानतात. स्वत:कडे दुर्लक्ष करतात. खरं तर बाई ही प्रत्येक कुटुंबाचा आधार असते. त्यामुळे हा आधार सुदृढ राहण्यासाठी कुटुंबातील प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

लेखिकेचा संपर्क - ९६२३८९५८६६

बातम्या आणखी आहेत...