Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | dr purushottam bhapkar transfer issue

आयुक्त भापकरांची स्वघोषित निवृत्ती, पुणे येथे झालेल्या बदलीच्या जागी रुजू होण्यास नाखुश

प्रतिनिधी | Update - Feb 09, 2019, 08:12 AM IST

निवृत्तीनंतर राजकारणात संधी आली तर नाही म्हणायचे नाही, असेही त्यांनी ठरवले आहे.

 • dr purushottam bhapkar transfer issue

  औरंगाबाद - सेवानिवृत्तीला तीन आठवड्यांपेक्षाही कमी कालावधी शिल्लक असताना विभागीय आयुक्तपदावरून करण्यात आलेल्या बदलीमुळे नाराज पुरुषाेत्तम भापकर यांनी क्रीडा व युवक सेवा आयुक्तपदावर रुजू न होण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, निवृत्तीनंतर राजकारणात संधी आली तर नाही म्हणायचे नाही, असेही त्यांनी ठरवले आहे. 'दिव्य मराठी'शी अनौपचारिकपणे बोलताना त्यांनी हा मनोदय व्यक्त केला. शासकीय सेवेचा भापकर यांचा फेब्रुवारी २०१९ हा शेवटचा महिना आहे. २८ तारखेला ते निवृत्त होत असताना शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या बदलीचे आदेश आयुक्तालयात धडकले.


  त्यांच्या जागी क्रीडा व युवक सेवा आयुक्त सुनिल केंद्रेकर यांना नियुक्त करण्यात आले आहे. ते शनिवारी पदभार घेण्याची शक्यता आहे. या आदेशानंतर लगेचच डाॅ. भापकर त्यांच्यावरच लिहिलेल्या 'पुरुषोत्तम' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला उपस्थित राहिले. तिथे भाषण करताना त्यांनी आपल्या २० दिवस आधीच निवृत्ती होण्याची संधी मिळाल्याची भावना व्यक्त केली. इथले त्यांचे भाषण हे सेवा निवृत्तीचेच भाषण होते.


  राजकारणाला नकार नाही...
  या कार्यक्रमानंतर 'दिव्य मराठी'शी अनौपचारिकपणे बोलताना त्यांनी आपण नव्या पदावर निवृत्त न होण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. नव्या जागी (पुणे) रुजू होण्यासाठी आपल्याला आठ दिवस मिळतीलच. त्यानंतर दोन आठवडेही शिल्लक राहत नाहीत. त्यामुळे त्या पदावर जाण्यात अर्थ नाही, असे ते म्हणाले. निवृत्तीनंतर आपण औरंगाबाद शहरातच स्थायिक होणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 'आता कोणतीही भूमिका सांगा, ती जबाबदारीने पार पाडेन', या त्यांच्याच भाषणातील संदर्भ देऊन त्यांना राजकारणाविषयी विचारले तेव्हा, राजकारणात जायलाही आपला नकार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत पुरुषोत्तम भापकर हे कोणत्या पक्षाचे उमेदवार असतील, ही नवी चर्चा सुरू हाेणार आहे.


  केंद्रेकर नवे विभागीय आयुक्त
  भापकरांच्या जागी सुनील केंद्रेकर यांना नियुक्त करण्यात आले असून ते शनिवारी पदभार घेण्याची शक्यता आहे.

Trending