Magazine / तिच्या मनातलं जाणून घ्यायचं राहिलं...

लेकरानं काहीच न सांगताही त्याच्या मनातलं सगळं काही जाणणारी आई. पण ...

प्रा. डॉ. पुष्पलता जाधव - बावस्कर

Jun 25,2019 12:18:00 AM IST

लेकरानं काहीच न सांगताही त्याच्या मनातलं सगळं काही जाणणारी आई. पण आपल्यापैकी किती जण आईच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याचा कधी प्रयत्न करत असतील...?

माझी आई अनुसया नारायण जाधव. १९६० सालातल्या आठव्या इयत्तेपर्यंत शिकलेली. आमचे घर कायम नातेवाइकांनी भरलेले असायचे. याचं श्रेय अर्थातच आईला. बाबांची नोकरी फिरतीची. फक्त शनिवार – रविवार ते घरी यायचे. अशा परिस्थितीत आईनं संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पार पाडली. आम्ही चार भांवडे. एक भाऊ इंजिनिअर, दुसरा व्यवसायात, बहीण आयुर्वेदिक डॉक्टर, मी वरिष्ठ प्राध्यापक. मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, म्हणून आई - बाब धडपडत. बहिणी शिक्षण घेत असताना घरांतील जबाबदारी आईने आमच्यावर कधी टाकली नाही. त्यामुळे घरी आलेल्या नातेवाइकांनी याबद्दल तक्रार केली की ती म्हणायची, घरातली कामे मुलींना आयुष्यभर करायची आहेत. परंतु शिक्षणाची संधी एकदा गेली तर परत येणार नाही. अशा प्रगल्भ विचारांची, सात्त्विक, प्रेमळ, अंथाग करुणेचा सागर असलेली माझी आई. आईच्या या भूमिकेमुळे बाबा आमच्या शिक्षणंबद्दल, संस्काराबद्दल, घरातील पोषक वातावरणाबद्दल निर्धास्त असायचे. बाबांच्या पगारामध्ये कुटुंबाचा खर्च चालणं अवघड होतं. परंतु आई जबाबदाऱ्या सहज पार पाडायची. आम्हा भावंडांपर्यत आर्थिक चणचण कधी आली नाही.


मी १९९२ ला देवगिरी महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून रुजू झाले.तेव्हा तिला आनंदाने गहिवरून आले. तेव्हापासून ती प्रत्येक वर्षी अगदी ती जाईपर्यंत एक ऑगस्ट म्हणजे नोकरीची रुजू दिनांक, मला नवीन साडी खरेदी करुन द्यायची व तो दिवस अगदी घरात गोडधोड जेवण करून, बुद्धवंदना म्हणून साजरी करायची.
लग्नानंतर मी औरंगाबादलाच होते. इतर भावंडंही आपापल्या गावी होती. मोठ्या भावाच्या लग्नानंतर तो वेगळा राहायला लागला. त्यामुळे घर एकदमच रिकामे झाले. आईची ती दररोजची धावपळ, प्रत्येकाचं जबाबदारीने, मन लावून काम करणे यात कुठे तरी खंड पडला. खरं तर तिने या सर्व गोष्टींतून हळूहळू मुक्त झाल्यामुळे स्वत:कडे लक्ष देऊन खूप आनंदाने जीवन जगणे गरजेचे होते. परंतु तिने चिंता करायला सुरुवात केली. तिला मधुमेह, उच्च रक्तदाब जडला. ती अजूनच खचून गेली. इतर कुठल्याही आईप्रमाणे कुटुब हा माझ्याही आईचा आत्मा होता. दुर्दैवानं कुटुंबातील कुरबुरीमुळे भावांचं वेगळं होणं तिच्या खूपच मनाला लागलं होतं. माझं सासर औरंगाबादेतच असल्यानं आईनं माझ्या घरी येऊन एक दिवस राहावं असं मला खूप वाटायचं. माझी ही इच्छा मी तिला अनेकदा बोलून दाखवली होती. आग्रह केला होता. पण ती आली नाही. कदाचित ती दोन दिवस घरी आली असती तर आमच्या गप्पा झाल्या असत्या. ती माझ्याशी मनमोकळं बोलली असती असं वाटतं. पण कुटुंबातल्या अडचणींची कहाणी मनात ठेवून, त्यापायी जडलेल्या आजारातच आईनं जगाचा निरोप घेतला. शेवटी तिला आम्हाला काही सांगायचे होते का? हे राहूनच गेले... आईनं केलेले संस्कार नेहमीच आमच्याबरोबर राहतील. आईसारखेच समाजहितासाठी आमच्याकडून सत्कार्य घडावे, हीच खरी आईला आदरांजली ठरेल.

X
COMMENT