Home | Magazine | Rasik | Dr Rahul Hande writes about writer Ruskin Bond

बालकथाविश्वाचा जादूगार

प्रा.डॉ. राहुल रा. हांडे | Update - Apr 14, 2019, 12:14 AM IST

निसर्गाचा अखंड सहवास लाभल्यानेच त्यांच्या साहित्यात निकोपता आणि निर्मळता कायम प्रतिबिंबित होत आली आहे

 • Dr Rahul Hande writes about writer Ruskin Bond


  हिमालयातला निसर्ग, तिथलं लोकजीवन, तिथली माणसं, त्यांचे अनुभव अशा सर्व अंगानी रस्किन बाँड यांचे साहित्य समृद्ध आहे. निसर्गाचा अखंड सहवास लाभल्यानेच त्यांच्या साहित्यात निकोपता आणि निर्मळता कायम प्रतिबिंबित होत आली आहे...


  रस्किन बाँड हे नाव काही मराठी वाचकांना अपरिचित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्किन बाँड हे सुप्रसिद्ध अँग्लो-इंडियन लेखक आहेत. देशाच्या स्वातंत्र्यानंतर अँग्लो-इंडियन समाजाचे देशाच्या विकासात मोठे योगदान राहिले आहे. स्वातंत्र्यानंतर भारतातच राहिलेल्या ब्रिटिश लोकांना किंवा माता-पिता यांच्यापैकी एक जण ब्रिटिश असणाऱ्या भारतीयांना ‘अँग्लो-इंडियन’ असे संबोधले जात असले, तरी या समाजाने भारतीय समाज, साहित्य, कला आणि संस्कृती यांवर मोठा प्रभाव टाकला आहे. त्यापैकीच रस्किन बाँड हे एक आहेत. त्यांची जडणघडण हिमालयाच्या कुशीत झाली.डेेहराडूनसारख्या निसर्गरम्य परिसरात संपूर्ण जीवन व्यतित केलेले रस्किन बाँड हे केवळ नावानेच ब्रिटिश आहेत. त्यांच्या ठायी असलेल्या अस्सल भारतीयत्वाचा प्रत्यय आपल्याला त्यांच्या साहित्याचा आस्वाद घेताना आल्याशिवाय राहत नाही.


  १९ मे १९३४ रोजी हिमाचल प्रदेशातील कसौली येथे जन्मलेले बाँड, आईने एका पंजाबी भारतीयाशी विवाह केल्यानंतर आपल्या वडिलांसमवेत राहू लागले. वडील रॉयल एअरफोर्समध्ये कार्यरत होते. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर वयाच्या दहाव्या वर्षी ते आपल्या आजीच्या घरी डेहराडूनला गेले. वडिलांचा प्रभाव आणि स्मृती मात्र त्यांच्या सोबत कायम राहिल्या. वयाच्या सोळाव्या वर्षी आपली पहिली लघुकथा लिहिली. तिला पारितोषिकही मिळाले. तेव्हापासून आजपर्यंत त्यांची लेखणी अखंडपणे कार्यरत आहे. आपल्या तारुण्यात बाँड आपल्या मावशीकडे इंग्लंडला दोन वर्षे राहिले. आपल्या पहिल्या कादंबरीच्या लेखनाला त्यांनी तिथेच सुरुवात केली. त्यांचे मन मात्र हिमालयाच्या परिसरात घोटाळत राहिल्याने, ते इंगलंडमध्ये रमले नाहीत. ते भारतात परतले. भारतात परतल्यावर त्यांनी विविध नियतकालिकांमधून मुक्त लेखन केले. तसेच काही नियतकालिकांचे संपादनदेखील केले. मोठ्यांबरोबरच लहान मुलांसाठी विपुल साहित्यनिर्मिती केली. त्यांच्या बालसाहित्याने एकूणच भारतीय बालसाहित्याचे दालन समृद्ध केले आहे. आजवर त्यांच्या कथा-कादंबऱ्यांवर नामवंत दिग्दर्शकांनी ‘द ब्लू अम्ब्रेला'सारखे चित्रपटही तयार केले आहेत. त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना ‘साहित्य अकादमी', ‘पद्मश्री ', ‘पद्मभूषण' अशा सन्मानांनी गौरविण्यात आले आहे.


  रस्किन बाँड यांचे बाल कथाविश्व म्हणजे निसर्ग आणि लहान मुलं यांच्यातील समरसतेचे एक अनोखे जगच म्हणावे लागेल. निसर्गासमोर ठामपणे उभे राहणारे आणि निसर्गाकडून ठामपणा घेणारे बालमन या कथांमध्ये आपल्याला सदैव जाणवते. रस्किन बाँड यांच्या बालकथांमध्ये आपल्याला निसर्गसन्मुखता आणि आशावाद ओसंडून वाहताना दिसतो. त्यांच्या बालकथांचे सर्वसाधारणपणे साहसकथा (वणव्यातील वाट, बिबट्या आणि चंद्र, शहामृगाच्या तावडीत, सीता आणि नदी, बोगद्यातील वाघ, गरुडाची नजर इ.) वियोगकथा (देहऱ्याच्या घरी, अंतयात्रा इ.), निसर्ग वा सृजनकथा (चेरीचे झाड, वृक्षवल्लींचा सोयरा इ.), गूढकथा (मांजराचे डोळे, फलाट क्रमांक ८ आदी) आणि विनोदीकथा (टिमोथी, माझे सखे सोबती... काही लहान काही मोठे, माकडलीला आदी) असे वर्गीकरण करता येते.


  बाँड यांच्या बालकथांचा आस्वाद घेताना एक गोष्ट नेहमी जाणवते,ती म्हणजे आपल्या वडिलांबद्दल वाटणारे तीव्र प्रेम आणि आकर्षण. त्यांच्या संपूर्ण बालकथा विश्वात त्यांचे वडील कायम कळत-नकळतपणे अवती-भोवती वावरताना जाणवतात. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सखोल व अमीट ठसा बाँड यांच्या नेणीवेत रुजलेला आणि बहरलेला दिसतो. आईने केलेला पुनर्विवाह, तिचा फारसा सहवास न मिळणे आणि प्रेम न लाभणे, यामुळे मुलगा-आई या नात्यात एक दुरावा, रुक्षपणा आणि पूर्वग्रहदूषितता दिसून येते. उलटपक्षी बाँड वडिलांच्या सहवासासाठी-प्रेमासाठी कायम झुरत आहेत,असे जाणवते. ‘जावाहून सुटका’सारख्या कथेतील मुलगा आणि वडील या नात्यातील घट्ट वीण एक अविस्मरणीय अनुभव देते.


  एखाद्या मुलाचा आपल्या पित्यावर असणारा दुर्दम्य विश्वास या कथेत दिसून येतो. ‘बोगद्यातील वाघ’ ही कथा प्रचंड गरिबीमुळे लहान मुलाला समजणारी जीवन वास्तवाची अपरिहार्यता तर दर्शवितेच; परंतु आपल्या वडिलांना सर्वशक्तिमान मानणारी बालमानसिकता देखील तेवढ्याच प्रकर्षाने दर्शविते. ‘अंतयात्रा’सारख्या कथेत, ‘जो माणूस एकटा उभा राहू शकतो, तोच सगळ्यात ताकदवान असतो.’ हे जीवनाचे महान आशावादी तत्त्वज्ञान सांगणारे वडील दिसतात. त्याचवेळी ज्याच्यावर सर्व भावविश्व उभे होते, त्या पित्याच्या अकाली निधनाने आलेले पोरकेपण हृदय पिळवटून टाकणारे ठरते.


  मानवी सृजनशीलतेतील आनंद हा बाँड यांच्या बालकथांचा एक अत्यंत महत्वाचा विशेष सांगता येतो. त्यांची ‘चेरीचे झाड’ ही कथा वाचताना याचा प्रत्यय येतो. हिमालयातील एका दुर्गम खेड्यातील छोटा मुलगा आपल्या आजोबांकडे शिकत असतो. शाळेतून येताना विकत घेतलेल्या चेरीची एक बी तो अंगणात लावतो. बीपासून ते चेरीचा मोठा वृक्ष होईपर्यंतचा हा सृजन-सोहळा तो आपल्या निसर्गप्रेमी आजोबांच्या सहवासात अनुभवतो. चेरीचे मोठे होणे आणि त्याचे मोठे होणे यातील भावबंध, सहजपणे जीवन, विस्तार व सृजनशीलता यांचा अन्योन्य संबंध येथे व्यक्त होतो. निसर्गातील उगम-विकास-लय हे तत्व अत्यंत सहजपणे येथे व्यक्त होते. निर्मिकाच्या भूमिकेतून वृक्षाचा झालेला विस्तार पाहून हा मुलगा आपली अनुभूती व्यक्त करताना म्हणतो, ‘मला वाटतं. आपण देव असल्यासारखं वाटणं असंच असेल का?’


  दुर्दम्य आशावाद आणि सत्शील माणसं बाँड यांच्या कथेचा एक अविभाज्य भागच म्हणावा लागतील. प्रत्येक संकटात आणि समस्येत कोणीना-कोणी चांगला माणूस आपल्याला सहाय्य करण्यास पुढे येत असतो. यावर रस्किन बाँड यांचा गाढ विश्वास ‘सीता आणि नदी’ या कथेतील एका निवेदनातून स्पष्ट होतो. या कथेत बाँड म्हणतात,’ त्या वेळी तिला एक सत्य माहीत नव्हतं की, आपल्या आयुष्यावर प्रभाव पाडणाऱ्या अशा काही व्यक्ती आणि घटना असतात की, ज्या आपल्या आयुष्याला काही क्षणच स्पर्शून मग आपल्या वाटेने निघून जातात.’ ‘गरुडाची नजर’ सारख्या कथेतील आजोबा संकटात केवळ शस्त्र हातात असून चालत नाही, हे सागंताना म्हणतात, ‘ती काठी महत्वाची नाहीये, ती कोण हातात धरतं, ती व्यक्ती महत्त्वाची असते.’ या विधानात दुर्दम्य आत्मविश्वास आणि आशावाद यांचे जीवनातील महत्व अधोरेखित होते. यामुळेच रस्किन बाँड यांच्या कथेतील लहान मुले पोरके आहेत, गरीब आहेत, कोणत्याही सोयी-सुविधांपासून वंचित असलेल्या दुर्गम भागातील आहेत; परंतु लाचार व हतबल नाहीत. मग तो ‘बिबट्या आणि चंद्र’मधील विष्णू असो की ‘सीता आणि नदी’ मधील सीता आणि विजय असो की ‘बोगद्यातील वाघ’मधील तेंबू असो या प्रत्येकांत पोरकेपणाशी, गरिबीशी, निसर्गाशी लढण्याचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि सुंदर उद्याविषयीचा आशावाद ओतप्रोत भरलेला दिसतो.


  टिमोथी, माझे सखे सोबती. काही लहान काही मोठे, माकडलीला इ. कथांमध्ये पशु-पक्षी आणि माणूस यांच्यातील भावबंधांचे दर्शन तर होतेच; परंतु प्राण्यांच्या सवयी, स्वभाव व त्यांचा घरातील-मानवी वस्तीतील वावर यातून निर्माण होणारी परिस्थिती आणि त्यातून निर्माण होणारा विनोद रस्किन बाँड यांनी नेमकेपणाने टिपलेला दिसतो. ‘टिमोथी’ कथेत लखनौच्या झूमध्ये टिमोथी समजून दुसऱ्याच वाघाला हात लावणाऱ्या आजोबांची अवस्था किंवा ‘माझे सखे सोबती... काही लहान काही मोठे’ कथेतील पाळलेल्या सापांमुळे मावशीची होणारी फजिती किंवा ‘शहामृगाच्या तावडीत’ सापडलेले आजोबांची अवस्था असे निखळ विनोद यातून निर्माण होतात. पशु-पक्षी वा निसर्ग यांचाशी संवाद साधताना आणि जवळीक करताना याची जबरदस्त आवड असणारे एक आजोबा मात्र कायम कथेत असतातच. एवढेच काय, तर या आजोबांमुळेच हे शक्य होते. रस्किन बाँड यांच्या ‘फलाट क्रमांक ८’ सारख्या गूढकथांना करुणेची किनार दिसून येते. केवळ भय वा रोमांच निर्माण करणे, हा या कथांचा उद्देश कधीच नसतो. ‘फलाट क्रमांक ८’ कथेत बाँड यांच्या जीवनातील आईची पोकळी वाचकाला अस्वस्थ केल्याशिवाय राहत नाही.


  भावनाशीलता आणि संवेदनशीलता यांचा एक समान व अतूट धागा रस्किन बॉड यांच्या सर्वच बालकथांचा व्यवछेदक विशेष सांगता येतो. हा बालकथाविश्वाचा जादूगार आपल्या कथांमधून निसर्ग आणि मानव यांच्यातील विविधांगी नात्याच्या अनोख्या छटा हळूवारपणे उलगडत जातो. त्यांच्या या बालकथा संपूर्ण कुटुंबाने सामूहिक वाचन कराव्या अशा ठरतात. यामुळे ज्या निरागसतेची आणि भावनाशीलतेची आस रस्किन बॉड यांची बालकथा धरते, ती सहजतेने आजच्या पाल्यांमध्ये रुजल्याशिवाय राहणार नाही...

  प्रा.डॉ. राहुल रा. हांडे
  handerahul85@gmail.com
  लेखकाचा संपर्क : ८३०८१५५०८६

Trending