Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | dr rana news in marathi

बोगस कराराच्या आधारे डॉ. राणाने उचलला 17 लाखांचा पहिला हप्ता, चौकशीत खुलासा

रवी गाडेकर | Update - Mar 06, 2019, 10:58 AM IST

शासनाच्या ईएसआयसी हॉस्पिटल्सशी डॉ. सूरज राणाने बनावट करार करून कामगारांवर वर्षभर सशुल्क उपचार करून ७२ लाख रुपयांवर डल्ला

 • dr rana news in marathi

  औरंगाबाद - शासनाच्या ईएसआयसी हॉस्पिटल्सशी डॉ. सूरज राणाने बनावट करार करून कामगारांवर वर्षभर सशुल्क उपचार करून ७२ लाख रुपयांवर डल्ला मारला. राणाची बोगसगिरी “दिव्य मराठी’ने समोर आल्यानंतर शासनाने सर्व बिले थांबवली होते. दरम्यान या प्रकरणी सुरू करण्यात आलेल्या स्वतंत्र चौकशीत डॉ. राणाने वैद्यकीय अधीक्षक व संचालकांशी हात मिळवणी करून प्रथम तीन महिन्यांचा १७ लाखांचा हप्ता उचलल्याची माहिती समोर आली आहे. हा पैसा साहित्य आणि पुरवठ्याच्या निधीतून दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
  “दिव्य मराठी’ने केलेल्या स्टिंगनंतर डॉ. सूरज राणाचे अनेक कारनामे उघड झाले आहेत. त्याचे रांजणगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर संजीवनी हॉस्पिटल २००५ पासून कार्यरत होते. या रुग्णालयाच्या आधारे ईएसआयसीच्या तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक व संचालकाशी संगनमत करून अनधिकृत करार केला होता.


  बोगस कराराच्या आधारे २०१०-११ साली राणाने कामगारांच्या उपचाराच्या ७२ लाखांवर डल्ला मारल्याची बाब “दिव्य मराठी’ने उघड केली. याची गांभीर्याने दखल घेत मुंबई ईएसआयसी आयुक्तांनी बिले थांबवून स्वतंत्र चौकशी सुरू केली होती. पैसे मिळवण्यासाठी राणाने राजकीय अस्त्र वापरत सुरुवातीला मार्च २०१८ मध्ये काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवर व नंतर स्थानिक आमदार संजय शिरसाट यांच्यामार्फत ८ जून २०१८ रोजी थेट आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्यामार्फत प्रयत्न केले. मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही.


  बोगस कराराच्या आधारे १७ लाख उचलले : राणाने ईएसआयसीचे संचालक डॉ. के.एस. सबनीस व वैद्यकीय अधीक्षक अण्णा म्हस्के यांच्याशी हात मिळवणी करत कामगारांवर वर्षभर केलेल्या उपचारापोटी ७३ लाखांची बिले सादर केली होती. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी मुंबई आयुक्तांनी लावल्यानंतर अनेक धक्कादायक बाकी समोर आल्या आहेत. राणाने संचालक व वैद्यकीय अधीक्षक यांच्या मदतीने सुरुवातीच्या ३ महिन्यांचे १७ लाखाचे बिल उचलल्याचेही समोर आले आहे.


  साहित्य आणि पुरवठ्याच्या निधीवर डल्ला : सेकंडरी केअर हॉस्पिटल्सशी रीतसर करार केल्यानंतर कामगारांच्या कुटुंबीयांवर मोफत उपचार केले जातात. या उपचाराचे पैसे हॉस्पिटलला देण्यासाठी शासनाचे आरोग्य विभाग स्वतंत्र निधी उपलब्ध करून देते असते. मात्र संजीवनी रुग्णालयाचे अधिकृत टायअप नसल्याने शासनाने कोणताच स्वतंत्र निधी औरंगाबादच्या ईएसआयसी रुग्णालयाला दिला नव्हता. असे असताना संचालकांनी राणाला हॉस्पिटलमध्ये खरेदी करण्यासाठी दिलेल्या साहित्य आणि पुरवठ्याच्या निधीतून पैसे देण्याचे परस्पर आदेश दिले होते. या आदेशावर डोळे झाकून तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक अण्णा म्हस्के यांनी अंमलबजावणी करून राणाला १७ लाखांचे बिल अदा केले.


  मला आदेश होते
  डॉ. राणाचे हॉस्पिटल रीतसर टायअप केले होते. यानुसार राणाने सेवा दिली होती. या रुग्णसेवेच्या पैशांची मागणी झाली होती. त्यानुसार आम्ही मुंबई कार्यालयाला पत्र व्यवहार केला. वरिष्ठांनी आदेश दिल्यानंतरच मी पैसे अदा करण्याचा निर्णय घेतला. यात माझी काय चूक आहे. -डॉ. अण्णा म्हस्के, तत्कालीन अधीक्षक, ईएसआयसी रुग्णालय.


  चुकीच्या हेडखाली बिल दिले
  टायअप नसताना डॉ. राणाच्या संजीवनी रुग्णालयाला पहिला हप्ता अदा करण्यात आला आहे. निधी नसताना चुकीच्या हेडमधून पैसे अदा करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी योग्य कारवाई केली जाईल. -डॉ. जी.एस. ढवळे, साहाय्यक संचालक, ईएसआयसी, मुंबई

Trending