आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाघूर : नव्या सांस्कृतिक ऊर्जेचे आविष्करण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. रणधीर शिंदे
 

'वाघूर'च्या या वर्षीच्या अंकात नेहमीप्रमाणे दणकट असा लेखन ऐवज आहे. कथा, व्यक्तीचित्रे, संस्मरणे व ललितलेखन असा ऐवज आहे. कविता विभागात जवळपास ८२ कवी-कवयित्रीच्या कवितांचा समावेश आहे. विशेष म्हणजे रूढ पारंपरिक कवींपेक्षा सकस कविता लिहिणाऱ्या कवितेचा यात समावेश आहे.
 
शतकभराहून अधिक काळ लाभलेल्या दिवाळी अंक परंपरेला मराठीत विशेष स्थान आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक भरण पोषण करण्याचे काहीएक काम एका अर्थाने दिवाळी अंकातील लेखनाने केले आहे. काळाच्या ओघात दिवाळी अंकाचे स्वरूप पालटत आले आहे. आजच्या ई-दिवाळी अंकाच्या उपस्थितीबरोबर आजही रूढ दिवाळी अंक मोठ्या प्रमाणात निघतात. महाराष्ट्रातील मध्यमवर्गाच्या बौद्धिक आणि सांस्कृतिक वाटचालीशी दिवाळी अंकांचा जवळचा संबंध आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षात काही कल्पक आणि उपक्रमशील नव्या दृष्टीचे अंक निघत आहेत. ‘भवताल’सारखा पर्यावरण विषयक अंक असो किंवा 'अक्षरलिपी’, 'शब्द शिवार', 'अक्षरदान,' 'पृथा', 'वसा' या अंकांनी आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच वाघूरने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

गेल्या काही वर्षात दिवाळी अंकातील लेखन स्वरूप देखील बदलले आहे. समाजवाढीच्या अपेक्षांच्या बदलत्या जाणिवांचे प्रतिबिंब दिवाळी अंकातील लेखनात पाहायला मिळते. पर्यटन, धार्मिक, आहार, पर्यावरण, चित्रपटविषयक अशा विषयांना प्राधान्य मिळत आहे. तसेच गेल्या काही वर्षात निव्वळ वाङ्मयीन ऐवज असणारे अंक खूप होते. तो भाग अलीकडे आक्रसलेला आहे. 'मौज,' 'हंस' ललित' 'दीपावली, 'पद्मगंधा' या अंकाबरोबर 'मुक्त शब्द', 'ऋतुरंग', 'परिवर्तनाचा वाटसरू', 'युगांतर', 'इत्यादी', 'साधना', अशा वेगळ्या धाटणीचे अंकही निघतात. मात्र पारंपरिक अंकात ज्याप्रमाणे कथा, कविता, ललित असा वाङ्मयविषयक मजकूर विपुल लेखन ऐवज असतो ते प्रमाण अलीकडे या अंकातून घटले आहे.

वाघूरचा हा पाचवा दिवाळी अंक. पहिल्या अंकापासून काही वेगळ्या लेखन दिशांचा शोध नामदेव कोळी यांनी घेतला आहे. भालचंद्र नेमाडे, मंटो या लेखकांवरील व सैराट चित्रपटावरील पुरवणी तसेच गेल्या वर्षीचा नदी विशेषांक विशेष चर्चिला गेला. तसेच या अंकाच्या वितरण आणि प्रसारासाठी तो समाजमाध्यमांचाही तितकाच प्रभावी वापर केला आहे. वाघूर'च्या या वर्षीच्या अंकात नेहमीप्रमाणे दणकट असा लेखन ऐवज आहे. कथा, व्यक्तीचित्रे, संस्मरणे व ललितलेखन असा ऐवज आहे. कविता विभागात जवळपास ८२ कवी-कवयित्रीच्या कवितांचा समावेश आहे. विशेष म्हणजे रूढ पारंपरिक कवींपेक्षा सकस कविता लिहिणाऱ्या कवितेचा यात समावेश आहे. वसंत आबाजी डहाके, नितीन वाघ, रवींद्र चावरेकर, प्रवीण बांदेकर, अजय कांडर, योगिनी सातारकर- पांडे  ते योजना यादव या कवींच्या कविता यात आहेत. समकालीन मराठी कवितेचा नकाशा समजून घ्यायला तो महत्त्वाचा आहे.

याशिवाय या अंकातील उललेखनीय बाब म्हणजे 'आगामी मराठी कादंबरी' हा लेखन विभाग. जवळपास पंधरा कादंबरीकरांच्या कादंबरीचे अंश या लेखन विभागात समाविष्ट आहेत. राहुल बनसोडे, अनिल साबळे, प्रसाद कुमठेकर, महेश लोंढे, प्रतीक पुरी, राकेश वानखेडे, प्रणव सखदेव, नवनाथ गोरे ते शिल्पा कांबळे अशा कादंबरीकारांचे लेखन यात आहे. या विभागाचे संपादन डॉ. दत्ता घोलप यांनी 'गोष्ट हरवण्याचा काळ' अशा शब्दात केला आहे.

महानगर, ग्रामीण, स्त्रीवादी, आदिवासी ऊसतोड कामगार, ते परिघावरील समाजदर्शने त्यामधून व्यक्त झाली आहेत. आधुनिकोत्तर ते प्रयोगशीलतेच्या खुणा सांगणाऱ्या नव्या मराठी कादंबरीचे सूतोवाच या लेखकांच्या कादंबरीत आहेत. मराठीतील सुपरहिरो कादंबरीचे तसेच कालांतराने दाखवणाऱ्या पुराणकालीन समाजचित्रणाचे स्वरूप त्यामध्ये आहे. मराठी समाजाच्या नव्या घडणीचा कलादर्शक फलक या कादंबरीकांच्या लेखनात आहे. अद्भुत, फँटसी ते वास्तववादाची रूपे तीमधून व्यक्त झाली आहेत. नवी गोष्ट रचण्याच्या काळाचे अनेक परीघ या लेखनात आहेत. भविष्यातील मराठी कादंबरीच्या दिशांचा वेध या नव्या कादंबरीच्या अंशदर्शनातून व्यक्त झाला आहे. नव्या मराठी कादंबरीचा माहोल समजून घ्यायला हा विभाग महत्वाचा आहे. त्यामुळे नव्या वाङ्मयीन शक्यतांचा खुला संच आणि भविष्यातील मराठी वाङ्मयाच्या चाहूलखुणांचा पट वाघूरच्या अंकात समाविष्ट आहे. उद्याच्या कादंबरीचा पट त्यामधून ध्वनीत झाला आहे. तसेच आधुनिक काळातील गद्य आणि भाषाभान देखील त्यामधून प्रकट झालेले आहे. नव्या समाज दर्शनाबरोबर वेगवेगळ्या प्रदेशातील समाजबोलीनी नटलेला प्रदेश या कादंबरीत आहे. कादंबरी कथनशक्यतांचा बहुरूपी ऐवज या कादंबरीरुपात आहे. कादंबरी हे त्या त्या समाजाचे एका अर्थाने  विश्वरुपदर्शन असते त्या अर्थाने उद्याच्या मराठी समाजाचे कथन या कादंबरीत विसावलेले आहे. त्यामुळे मराठीतील नव्या दमाच्या कादंबरीकरांचे विश्वभान समजून घ्यायला हा अंक महतत्वाचा आहे. हरेक काळातील सांस्कृतिक भान वर्धमान करणाऱ्या अशा अंकांचे नेहमीच स्वागत करायला हवे.