आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काश्मिरी काव्य-दूत!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अगा शाहीद अली. काश्मिरात जन्मलेला परंतु, कायमस्वरूपी मायभूमीपासून दुरावलेला, दुखावलेला कविमनाचा हा भारतीय प्रज्ञावंत. त्याच्या कवितांनी, गझलांनी जगभरातल्या संवेदनशील मनांना हाक दिली. परंतु, मायदेशातच तो दुर्लक्षित राहिला.  ४ फेब्रुवारी ही त्याची जन्मतिथी. त्यानिमित्ताने त्याच्या काव्यप्रतिभेचा वेध घेणारा हा लेख...


प्रसंग पहिला. ‘मला आठवते, लहाणपणी मी एकदा वडिलांना विचारले, "मला घरात एक छोटेखानी हिंदु मंदिर बनवायचे आहे, मी बनवू का?’
वडील म्हणाले, "हो!’
कालांतराने मी पुन्हा वडिलांना विचारले, "मला घरात कॅथाॅलिक चर्चची प्रतीकृती बनवायची आहे, आणि त्यात येशूचे चित्र लावायचे आहे.’
वडील म्हणाले, "हो!’
नंतर माझ्या आईने मला भगवान श्रीकृष्णाची एक छोटी मूर्ती आणून दिली आणि मंदिर बनवण्यास सांगितले. मी तिथे पूजा करत असे.
प्रसंग दुसरा. बार्सिलोना विमानतळावर विमानात चढत असतानाच एका महिला सुरक्षाकर्मीने एका व्यक्तीला अडवले आणि म्हणाली, "तुमचा व्यवसाय काय आहे?’
"मी कवी आहे!’ व्यक्ती उत्तरली.
"तुम्ही स्पेनमध्ये काय करत होतात?’
"कविता लिहित होतो.’
‘इतर प्रवाशांंना धोकादायक ठरेल, असे काही तुमच्याकडे आहे का?’
दोन्ही हात छातीवर ठेऊन, त्या व्यक्तीने उत्तर दिले, "हो, आहे. माझे बंडखोर हृदय!’
वरील दोन्ही प्रसंग हे, अगा शाहीद अली या काश्मिरी-अमेरिकन-काश्मिरी या इंग्रजी भाषेतून लिहिणाऱ्या कवीबद्दलचे आहेत. या दोन प्रसांगामधे साधारणत: पस्तीस ते चाळीस वर्षांचे अंतर असावे. वरील दोन प्रसंग ठळकपणे दोन दृष्टिकोन व्यक्त करतात, जे या तीन चार दशकात अमूलाग्रपणे बदलले आहेत. तीन- चार दशकापूर्वी बोथट असणाऱ्या धार्मिक भावनांनी आज किती टोकदार स्वरूप धारण केले आहे. अशा विद्वेषी वातावरणात सहवास्तव्याची आणि एकोप्याची गरज  मांडणाऱ्या कवीचे स्मरण समयोचित ठरावे असेच आहे. जगभरातील अनेक नामवंत विद्यापीठाच्या आणि भारतातील जवळपास सर्वच विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असणारा हा कवी सर्वसामान्यांना मात्र अजूनही तितकासा परिचित नाही.


४ फेब्रुवारी १९४९ हा अगा शाहिद अलींचा जन्मदिन. भौतिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असणारे हे कुटूंब मुळचे, काश्मिरी. अगा शाहिद अलींची आजी ही काश्मीर खोऱ्यातून मॅट्रिक झालेली पहिली स्त्री होती. त्यांचे वडील अगा अश्रफ अली, हे नामवंत शिक्षणतज्ज्ञ होते, आणि शाळा तपासनीस म्हणून त्यांनी अलौकिक असा ठसा उमटवला. प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ विजय धर यांनी एकदा जाहीरपणे, अगा अश्रफ अली आणि बक्षी गुलाम मुहम्मद या दोन  शिक्षणतज्ज्ञांनी काश्मिरी मुस्लिम समुदायात केलेल्या अविस्मरणीय योगदानाची स्तुती केली आहे. असा समृद्ध शैक्षणिक आणि सांस्कृतिक वारसा लाभल्यामुळे शाहिद अलींना साहित्याची आवड लहाणपणीच निर्माण झाली. बहुभाषिक असलेल्या या कुटुंबात पुश्तु, हिंदी, उर्दू, अरेबिक, इंग्रजी अशा भाषांचा मुक्तसंचार होता. परिणामी, वयाच्या बाराव्या वर्षापासूनच शाहीद अली यांच्या कविता लेखनाचा प्रवास सुरू झाला. शाहीद अलींच्या बाराव्या वर्षीच त्यांचे कुटुंब अमेरिकेत काही काळासाठी स्थलांतरित झाले. पुढील तीन वर्षे शाहीद अली अमेरिकेत होते. भारतात परतल्यानंतर त्यांचे शिक्षण श्रीनगर व दिल्ली विद्यापीठात पूर्ण झाले. आणि पीचडी संशोधनासाठी ते पुन्हा अमेरिकेत परतले. भारत आणि अमेरिकेतील वास्तव्याबद्दल त्यांनी 'लँड' शीर्षकाच्या गझलमध्ये म्हटले आहे की -
If home is found on both sides of the globe,
Home is of course here- and always a missed land. 
( घर तर दोन्ही ध्रुवावर आहे. परंतु नाही ती फक्त मातृभूमी!)


शाहीद अलींना त्यांची ओळख काश्मिरी अमेरिकन अशी करून दिलेली आवडत नसे, काश्मिरी - अमेरिकन - काश्मिरी अशीच ओळख सांगण्यात यावी, असा त्यांचा आग्रह असे. एखादी एसटी त्याच डेपोतून निघून मुक्कामी त्याच डेपोत परतावी,  तसे शाहीद अलींचे मन मुक्कामासाठी काश्मीरकडेच धाव घेत होते. परंतु ज्या नंदनवनाची त्यांना आस होती, तेच नंतरच्या काळात शापित बनणार होते!  कुमारवयातच फैज अहमद फैज या प्रख्यात कवीचा आणि बेगम अख्तर यांच्या गायनाचा त्यांच्यावर पडलेला प्रभाव आयुष्यभर टिकून राहिला. पुढे ‘इन मेमरी ऑफ बेगम अख्तर' हा कवितासंग्रह काव्यलेखनाच्या सुरूवातीच्या टप्यात  प्रकाशित झाला. १९९२ मध्ये फैजच्या कविता इंग्रजीत अनुवादित करून त्यांनी फैजला श्रद्धांजली अर्पण केली.


काश्मीर प्रश्न हा स्वातंत्र्योत्तर काळामधला सर्वात जास्त चिघळलेला आणि त्याच्यासाठी मोठी किंमत मोजावी लागलेला एक अनुत्तरित प्रश्न राहिला आहे. गझल सांगते की,
"वक्त हर जख्म को हर गम को मिटा देता है,
वक्त के साथ ये सदमा भी गुजर जायेगा।’
परंतु, ही गोष्ट काश्मीर प्रश्नाला मात्र लागु पडलेली नाही. काश्मीर प्रश्नावर तोडगा दृष्टिक्षेपात नाही आणि दोन्ही बाजूचे राज्यकर्ते ‘सदमा' विसरू द्यायला तयार नाहीत. अगा शाहिद अलींसारख्या एका संवेदनशील मनस्वी कवीला शेवटच्या श्वासापर्यंत ही खंत वाटत होती. स्वत:च्या मातृभुमीवरील प्रेम त्यांनी 'द ब्लेस्ड वर्ड: अ प्रोलाॅग' या कवितेतून व्यक्त केले आहे. काळाच्या ओघात काश्मीर हा शब्द कसा बदलत गेला आहे, हे त्यांनी मांडले आहे.
"Let me cry out in that void, say it as I can. I write on the void: Kashmir, Kaschmir, Cashmere, Qashmir, Cashmere, Cashmere, Kashmere, Cachemire, Cushmeer, Cachmiere, Casimir. Or Cauchemar in a sea of stories? Or: Kacmir, Kaschemir, Kachmire, Kasmir. Kerseymere?’


आयुष्याचा मोठा काळ अमेरिकेत व्यतीत केलेल्या या कवीला प्रत्येक उन्हाळ्यात काश्मिरात आल्यानंतर बदलत जाणारी परिस्थिती जाणवायची. नव्वदच्या दशकात बाबरी पतनानंतर हा बदल तीव्र झाला.  ‘द हाफ इंच हिमालयाज' या कवितासंग्रहातील ‘पोस्टकार्ड फ्राॅम काश्मीर' या कवितेत, हे बदलणारे वातावरण अधोरेखित झाले आहे. ".... When I return, the colors won't be so brilliant, the Jhelum's so clean,so ultramarine.’ 
झेलम नदीचे स्फटिकजल रक्तरंजित झाल्याचा हा उल्लेख अस्वस्थ करतो. शेजारील राष्ट्राकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया त्याचबरोबर देशांतर्गत पसरत चाललेले विद्वेषाचे वातावरण असा दुहेरी ताण एका मानवतावादी कवीला अस्वस्थ करणारा होता. शाहीद अलींच्या कवितेचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची कविता संपूर्ण जगात काश्मीरसारख्या अशांत असणाऱ्या प्रदेशांनाही कवेत घेते. पॅलेस्टाइन, इस्राइल, सिरिया अशा अशांत प्रदेशाचा सातत्याने येणारा संदर्भ कवीची संवेदनशीलता आणि वैश्विकता स्पष्ट करतो. मातृभुमी विषयी ही तळमळ अधिक असणे स्वाभाविकच आहे. 


काश्मीर खोऱ्यातील  हिंदु पंडितांचे होणारे समूह विस्थापन हा कवीला जबर मानसिक धक्का होता. हिंदु आणि मुस्लिम अशा दोन्ही संस्कृतींचा गर्द सावलीत वाढलेल्या कवीला पंडितांशिवाय काश्मीर खोरे ही कल्पनाच असह्य होती. अमिताव घोष या नुकतेच ज्ञानपीठ पारीतोषिक जाहीर झालेल्या लेखकाशी बोलताना ही वेदना त्यांनी प्रकट केली आहे. स्थानिक पंडितांची खाद्यसंस्कृती हा त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. सगळे पंडित काश्मीर खोरे सोडून गेले आहेत आणि त्याचबरोबर त्यांचे खासियत असलेले पदार्थ लुप्त झाले आहेत, हे वारंवार पडणारे भीतीदायक स्वप्न त्यांनी अमिताव घोष यांना सांगितले आहे. ‘द कंट्री विदाऊट पोस्ट आॅफीस' या कवितासंग्रहात ही वेदना मुखर झाली आहे. काश्मिरी पंडितांना उद्देशून कवी म्हणतो.
"You needed me. You needed to perfect me:
In your absence you polished me into Enemy. Your history gets in the way of my memory’
काश्मिरी पंडितांशिवाय जीवनाला अपूर्ण मानणारा आणि  सहवास्तव्याची गरज ठासून मांडणारा, हा कवी दुर्लक्षितच राहिला आहे.


अगा शाहीद अलींचे सर्व भारतीयांना अभिमान वाटावे, असे योगदान गझल या काव्यप्रकाराच्या संदर्भात आहे. आज गझल या काव्यप्रकाराबद्दल व्यापक जागृती झालेली आहे. देशभर अनेक प्रमाण भाषेबरोबरच स्थानिक बोलीभाषेतूनही गझल मोठ्याप्रमाणात लिहिली जात आहे. महाराष्ट्रातील प्रमुख वर्तमानपत्रातूनही गझल विषयक सदरे चालवली गेली आहेत. भीमराव पांचाळेंनी गझल लेखनाच्या कार्यशाळा घेऊन नवोदित गझल लेखकांना मार्गदर्शन केले आहे. या काव्यप्रकाराला शाहीद अलींचे तिहेरी योगदान लाभले आहे. एक उर्दू गझलचा इंग्रजी भाषेत अनुवाद. दोन थेट इंग्रजीतच गझल लेखन आणि तीन म्हणजे, इंग्रजी गझलचा व्यापक प्रसार! शाहीद अलींनी लेखनाच्या सुरूवातीच्या टप्यात फैज अहमद फैजच्या गझल इंग्रजीत अनुवादीत करून गझलेला आंतराष्ट्रीय वाचकापर्यंत पोहचवल्याच परंतु, आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी थेट इंग्रजी भाषेतच गझल लिहून गझल या काव्यप्रकाराला इंग्रजीत प्रस्थापित केले. त्यांचा ‘काॅल मी इस्माइल टुनाईट' हा इंग्रजी गझलेचा संग्रह प्रसिद्ध आहे. ब्रेन ट्युमरचे निदान झाल्यांनतर प्रकाशित झालेला हा गझलसंग्रह आहे. 


मृत्युचे अटळपण माहीत असलेल्या कवीची ही निरोपाची कविता आहे. उर्दु गझलेची सर्व वैशिष्ट्ये इंग्रजी गझल मिरवताना, इथे आढळून येते. किर्रर अंधाऱ्या रात्री अकस्मात एखादा काजवा चमकून जावा, तसे या कवितेमधेली एखादी ओळ चमकून जाते. मनाचा कोपरान््कोपरा उजळून जाते. ‘नाॅट आॅल, ओन्ली अ फ्यु रिटर्न' या गझलेत कवी म्हणतो "Just a few return from dust, disguised as roses..." स्वत: चे गझललेखन एवढ्यावरच न थांबता गझल या कविता प्रकाराचा व्यापक प्रसार त्यांनी केला. अमेरिकेतील मेसॅच्युसेट्स विद्यापीठात क्रिएटिव्ह रायटर्स फॅकल्टी या विभागाचे अधिष्ठाता म्हणून त्यांची कारकीर्द विशेष गाजली. जगभरातून आलेल्या सृजनशील लेखनाची आवड असणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना गझल या कविता प्रकाराची ओळख करून, देऊन थेट इंग्रजीत गझल लिहिण्यास त्यांनी प्रोत्साहीत केले. त्यांनी अमेरिकेतील दोनशे कवींना एकत्र बोलावून त्यांची गझल या कविता प्रकारावर कार्यशाळा घेऊन गझलबाबत व्यापक प्रबोधन केले. या दोनशे कविंकडून सातत्याने पाठपुरावा आणि मार्गदर्शन करून प्रत्येकी दोन गझल लिहून घेऊन त्यातील निवडक इंग्रजी गझलांचा समावेश असणारा "रॅव्हिशिंग डीसयुनीटिज: रीयल गझल्स इन इंग्लिश" नावाचा पहिला थेट इंग्रजीत लिहिलेला गझलसंग्रह संपादित केला. गझलेचा मूळ ढाचा इंग्रजीतसुद्धा तसाच राहिला पाहिजे, हा शाहिद अलींचा आग्रह होता. परंतु एका भुमीवरचे रोपटे नवख्या भूमीवर वाढताना काही बदल संभवतच असतो. गझलेला शीर्षक नसते, आणि इंग्रजी वाचकाला ह शीर्षकाशिवाय कविता हे अडचणीचे ठरते किंवा गझलसंग्रहात गझल ओळखायची कशी, हा प्रश्न उपस्थित होतो, हे लक्षात घेऊन गझलचा ‘मतला' (गझलच्या पहिल्या शेरच्या दोन्ही ओळीतच्या शेवटी येणारा समान शब्द) हेच शीर्षक शाहीद अलींनी वापरण्याचा पायंडा पाडला. 


गझल ही समर्पीत केलेली नसते, परंतु गझल समर्पीत करण्याचीही प्रथा अगा शाहीद अलींनी सुरू केलेली आढळून येते. शाहीद अलींच्या अनेक कविता आणि गझल आप्तेष्ठांना समर्पीत आहेत. ' द कंट्री विदाऊट अ पोस्ट आॅफीस' नावाची कविता ही जेम्स मेरील या त्यांच्यावर अमीट असा प्रभाव पाडणाऱ्या अमेरिकन कविला समर्पीत केली आहे. अनेक गझलांच्या सुरूवातीला अतिशय समर्पक असणाऱ्या दुसऱ्या कविच्या कवितेतील एखाद दुसरी ओळ वापरलेलीही आढळून येते. मेहमूद दारवीश या पॅलेस्टिनी कवीच्या
Where should we go after the last frontiors?
Where should the birds fly after the last sky?

या अतिशय समर्पक असणाऱ्या  ओळी 'गझल' असे शीर्षक असलेल्या गझलच्या सुरूवातीला वापरलेल्या आहेत. भारतीय आणि अमेरिकन अशा दोन्ही संस्कृतीचा अनुभव असल्यामुळे त्यांची कविता पाश्चात्यांना भारतीय संस्कृतीची आणि भारतीयांना पाश्चात्य संस्कृतीची ओळख करून देते. त्यांच्या कवितेत असणारे संदर्भ वाचकाला स्तिमीत केल्याशिवाय रहात नाहीत. 


सन २००० मध्ये अगा शाहीद अलींनाही ब्रेन ट्युमरचे निदान झाले. याच जीवघेण्या आजारानेच त्यांच्या आईचाही मृत्यु झाला होता. अविवाहित असणाऱ्या शाहीद अलींच्या अतीव मातृप्रेमामुळेच आईची वेदना अनुभवण्यासाठीच जणू काही आईचा आजार वाट्याला आला असावा, असेच या दुर्देवी योगायोगाच्या  बाबतीत म्हणता येईल. २५ एप्रिल २००१ चा एक प्रसंग लेखक अमिताव घोष यांनी सांगितला आहे. फोनवर बोलताना अचानक शाहीद अलींना अंधारी येते. ते म्हणतात, मित्रा, मला काहीच दिसत नाही. बोलणे थांबते. काही वेळानंतर शाहीद अली अमिताव घोषांना म्हणतात, आशा करतो की हा मृत्यु नसावा!
त्यानंतर  ५ मे २००१ चे अमिताव घोषांबरोबरचे दुसरे संभाषण. त्याचदिवशी एक महत्वाचा मेडिकल रिपोर्ट येणार होता, अमिताव घोषांना काळजी वाटत असल्यामुळे, ते सातत्याने शाहीद अलींना संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. सकाळी संपर्क झाला. शाहीद अलींनी स्वत: सांगितले की  काही आशादायक नाही. शरीर उपचारांना प्रतिसाद देत नसल्यामुळे, डाॅक्टरांनी उपचार थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. एक वर्ष किंवा त्याहून कमी कालावधी हातात असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले आहे. अमिताव घोषांनी हताशपणे विचारले, "शाहीद आता तू काय करणार आहेस?’


"मी काश्मीरला परत जायचं ठरवले आहे. मला तिथेच मरायचं आहे!’ शाहीद अली उत्तरले. अनेकदा हीच भावना शाहीद अलींच्या अनेक कवितांतून व्यक्त झाली होती.  मातृभुमीची कायमच असणारी ओढ अगा शाहीद अलींच्या अखेरच्या दिवसात तीव्र झाली होती. अखेरचा श्वास मातृभुमीतच घ्यावा, ही त्यांची आंतरिक इच्छा होती, परंतु जीवघेणा आजार, अमेरिकेत सुरु असलेले उपचार, काश्मिरची चिघळलेली परिस्थिती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, आपल्या मृत्युपश्चात भावंडाना होणारा त्रास, जो आईच्या बाबतीत सर्वांनी अनुभवलेलाच होता, याचा विचार करून शेवटच्या काही दिवसात केवळ नाईलाज म्हणून त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले. मातृभुमीत प्राण त्यागण्याची इच्छा अधुरीच राहिली.’
I will die, in autumn,in Kashmir,
And the shadowed routine of each vein 
will almost be news...."
आयुष्यभर स्थलांतरितांची वेदना कवितेतून प्रकट करणाऱ्या कवीने स्वत:वर एकाकीपणा लादून घेतला. अमिताव घोषांनी एकदा अनौपचारीक गप्पांच्या ओघात शाहीद अलींना काश्मीर समस्येवर उपाय विचारला होता. भारताचा अविभाज्य भाग ठेऊन काश्मीरला जास्तीत जास्त स्वायत्तता प्रदान करणे हाच काश्मीर समस्येवर उपाय होऊ शकतो, असे वैयक्तिक मत त्यांनी नोंदवले होते. दहशतवाद हा हिंदु किंवा मुस्लिम असत नाही. तो जितका काश्मिरी पंडितांना विस्थापित करतो, तितकाच तो एका मुस्लिम कविलाही मातृभुमीत परतू देत नाही, हेच कटु वास्तव आहे. ८ डिसेंबर २००१ रोजी अगा शाहीद अलींनी जगाचा निरोप घेतला.  काश्मीरच्या सौंदर्याची मोहिनी असणाऱ्या शाहीद अलींच्या समाधीवरही "काश्मिरी - अमेरिकन पोएट' एवढे दोनच शब्द कोरलेले आहेत. "We shall meet again in Srinagar" हे स्वप्न आता कधीच पूर्ण होणारे नाही...

 

प्रा. डाॅ. रविकिरण माळी
talktoravikiran@gmail.com
लेखक संपर्क : ९०११६०१५४१

(लेखक डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथे इंग्रजी विभागात सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत आहेत)

बातम्या आणखी आहेत...