आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कालजयी ‘गॉडफादर’!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘दी गॉडफादर’ हे शब्द उच्चारले की, साहित्यप्रेमींना इटालियन-अमेरिकन कादंबरीकार मारिओ पुझो आ‌ठवतो आणि चोखंदळ चित्रपटप्रेमींना फ्रान्सिस फोर्ड कपोलाने दिग्दर्शित केेलेली चित्तथरारक चित्रत्रयी आठवते. केवळ परिस्थितीच्या रेट्यातून पुझोने घाईघाईत एक बाड प्रकाशकाकडे सोपवलं आणि सफरीवर निघून गेला. परत आला तेव्हा अमेरिकन माफिया गँगचं अंतरंग उलगडणाऱ्या कादंबरीवर वाचकांच्या उड्या पडल्या होत्या. पुढे कपोलाने मार्लन ब्रँडो, रॉबर्ट डी निरो आणि अल पचिनो यांना प्रमुख भूमिकांत घेऊन कादंबरीला पडद्यावर जिवंत केलं आणि त्यातला ‘ट्रु टू लाइफ’अभिनय, काळजाचा ठोका चुकवणारं पार्श्वसंगीत आणि सर्जनशील संकलन जगभरच्या सिनेरसिकांना वेड लावत राहिलं. कादंबरीची पारायणं झाली.  सिनेमे पुन:पुन्हा बघितले गेले.  चित्रपट निर्मितीविषयक अभ्यासक्रमाचा भागही बनले. अशी ही लोकप्रिय साहित्यातली ‘क्लासिक’ गणली गेलेली कादंबरी पहिल्यांदा प्रकाशित झाली १० मार्च १९६९ रोजी. म्हणजेच आज या  कादंबरीच्या प्रकाशनाचा सुवर्णमहोत्सवी क्षण. त्यानिमित्त साहित्यकृती आणि त्यावर आधारित चित्रत्रयीच्या पैलूंवर प्रकाशझोत टाकणारे हे खास लेख...


मारिओ पुझोची ‘गाॅडफादर’ ही कादंबरी प्रकाशित झाली. कादंबरीच्या प्रकाशनानंतर अवघ्या काही दिवसांत पुझो यांच्याशी एका गँगस्टरने संपर्क साधला आणि ते कोणत्या माफिया टोळीशी संलग्न आहेत, अशी विचारणा केली. एखाद्या लेखकाला यापेक्षा मोठे पारितोषिक काय असू शकते? ‘गाॅडफादर’मधील गुन्हेगारी विश्वाचे यथार्थ वर्णन केवळ एक गुन्हेगारी विश्वाचा प्रत्यक्ष अनुभव असणाराच (इनसायडर) करू शकतो त्यामुळे कोणीतरी माफिया टोळीच्या प्रमुखाने पैसे देऊन ही कादंबरी लेखकाकडून लिहून घेतली असावी, अशी अफवाही त्या काळी जोरात होती. 


वयाच्या पंचेचाळिसाव्या वर्षी आर्थिक विवंचनेत दिवस कंठणाऱ्या पुझोला एका निर्णायक यशाची तीव्र गरज असताना, एका उन्मनी अवस्थेत त्याने ही कादंबरी लिहून हातावेगळी केली. ‘जी. पी. पुटनॅम्स सन्स’ या प्रकाशनाने बाजारात आणलेल्या प्रस्तुत कादंबरीने पहिल्या दोन वर्षांतच नऊ लाख प्रतींच्या विक्रीचा उच्चांक नोंदवला. त्यानंतर आजपर्यंत तीस दशलक्षहून अधिक प्रतींची विक्री झालेली  ‘गाॅडफादर’ ही अमेरिकेच्या सर्वकालिक सर्वश्रेष्ठ दहा कादंबऱ्यांत नक्कीच स्थान पटकावेल, इतकी तिची लोकप्रियता अफाट राहिली आहे. 
दुसऱ्या महायुद्धानंतरच्या १९४५-१९५५ या कालखंडातल्या न्यूयाॅर्कच्या पार्श्वभूमीवर कादंबरीतील कथानक आकार घेते. ‘गाॅडफादर’चे कथानक एका कुटुंबावर, त्यातही व्हिटो कार्लिआॅने (‘गाॅडफादर’) आणि त्याच्या तीन मुलांपैकी धाकटा मायकेल कार्लिआॅने या दोन व्यक्तीवर आधारलेले आहे.  व्हिटो  पाचपैकी सगळ्यांत तगड्या  माफिया टोळीचा  प्रमुख आहे. कादंबरीची सुरुवात डाॅनच्या कोनी नावाच्या मुलीच्या विवाह सोहळ्याने होते. पासष्टीच्या वयाचा डाॅन एकाच वेळी आलेल्या पाहुणे मंडळीचे स्वागत करत आहे, त्याचबरोबर डाॅनकडे तक्रार घेऊन आलेल्या लोकांच्या गाठीभेटींचा सिलसिला सुरू आहे. अमेरिगो बोनासेरा त्याच्या मुलीला काही तरुणांनी केलेल्या मारहाणीची तक्रार घेऊन आलेला आहे. अमेरिगोने एका समंजस नागरिकासारखा कोर्टाचा दरवाजा ठोठावलाय. कोर्टाने संबंधित तरुणांना शिक्षा न करता समज देऊन सोडून दिल्यावर त्याचा न्यायावरचा विश्वास उडालाय. हा प्रसंग खूपच महत्त्वपूर्ण आहे. या प्रसंगात अमेरिगोच्या भाबडेपणाबरोबरच वाचकाच्याही भाबडेपणाचा बुरखा फाटतो. न्यायापेक्षाही अनेक बाबी समाजजीवनात आणि राजकारणात सक्रिय आहेत व त्यांचे अदृश्य हात नकळत अनेक बाबी नियंत्रित करत आहेत, हे वाचकाला कळून चुकते. कादंबरीच्या मुखपृष्ठावर कठपुतळ्या नियंत्रित करणारे हाताचे प्रतीकात्मक महत्त्व येथे स्पष्ट होते.  


त्याच दिवशी लग्नात सहभागी होण्यासाठी व डाॅनवर निष्ठा प्रकट करण्यासाठी जाॅनी फाँटेन नावाचा हाॅलीवूड स्टार आणि त्याचा मानसपुत्रच आलेला आहे. डाॅन त्याच्या कुटुंबाची आस्थेने चौकशी करतो, त्याला बाहेरख्यालीपणाबद्दल समजही देतो. इथेही डाॅनचे वेगळेपण अधोरेखित होते. डाॅन जाॅनीचा ‘गाॅडफादर’ आहे. जाॅनीला एका हाॅलीवूडपटात मुख्य भूमिका हवीय, परंतु चित्रपट निर्माता असलेला जॅक वोल्ट्झ हा त्याला चित्रपटात घ्यायला तयारच नाही. जाॅनी डाॅनकडे तक्रार करतो. डाॅन ही जबाबदारी त्याचा वकील व मानसपुत्र असलेल्या टाॅम हेगलला सोपवतो. हेगन डाॅनच्या वतीने वोल्ट्झला भेटून विनंती करतो. डाॅन कोणालाही धमकावून किंवा भीती दाखवून काम साध्य करत नाही. डाॅन आडमुठा नाही. एका कामाच्या बदल्यात दुसरे काम करण्याची तो खात्री देतो, आणि यालाही विरोध असेल तर डाॅनकडे अंतिम पर्याय शिल्लक आहे. अशा वेळी डाॅनचे सर्वात प्रसिद्ध वाक्य इथे येतेे  I am going to make him offer he can't refuse. वोल्ट्झसुद्धा काही साधा मनुष्य नाही, अमेरिकेचे अनेक सिनेटर अर्थात लोकप्रतिनिधी त्याच्या खिशात आहेत. अमेरिकी अध्यक्षाच्या सल्लागार समितीत तो आहे. डाॅनने पाठवलेला प्रस्ताव वोल्ट्झ ठोकरतो. या वोल्ट्झकडे असलेल्या खार्टुम नावाच्या अतिशय महागड्या देखण्या घोड्याचा त्याला फार अभिमान असतो. एके रात्री झोपेतून तो दचकून उठतो, त्याला झोपेच्या खोलीत पायथ्याशी वेगळी आकृती दिसते. तो लाइट लावतो व किंचाळतो, कारण त्याच्या आवडत्या खार्टुमचे शीर कापून त्याच्या बिछान्यात ठेवलेले असते.  


इथे अमेरिकेच्या अनिर्बंध स्वातंत्र्य आणि भांडवलशाहीवरही एक मार्मिक टिप्पणी आहे. जॅक वोल्ट्झ म्हणतो.' ही परिस्थिती कम्युनिझमपेक्षा दहा पट वाईट आहे!' दुसऱ्याच दिवशी त्याच्या चित्रपटातील मध्यवर्ती भूमिका जाॅनी फाँटेनला दिल्याचे, तो जाहीर करतो. डाॅनचे व्यक्तिमत्त्व अत्यंत मोजक्या शब्दांत पुझोने मांडले आहे.


डाॅन त्याच्या ताकदीचे किंवा प्रभावाचे जराही उदात्तीकरण करत नाही. शांततामय जगण्याचा तो पुरस्कर्ता आहे. कादंबरी फ्लॅशबॅक तंत्राने डाॅनच्या वाटचालीचाही आढावा घेते. इटलीतील कार्लिआॅने हे त्याचे मूळ गाव.  भांडणात कुटुंबातले सर्व जण मारले गेल्यानंतर स्वत:चा जीव वाचवून न्यूयाॅर्क शहरात आलेला, स्वभावाने अंतर्मुख असलेला व्हिटो कार्लिआॅने बेरोजगारीच्या काळात वाढलेल्या कुटुंबाचे पालणपोषन करण्यासाठी छोट्या-मोठ्या चोऱ्या आणि तस्करी आदी बाबींत सक्रिय होतो. एकदिवस फॅनुसी नावाच्या स्थानिक गुंडाचा त्याच्या हातून खून होतो आणि डाॅन बनण्याची त्याची वाटचाल सुरू होते. जागतिक साहित्यामधे घरातून पळून जाऊन नाव, पैसा, प्रसिद्धी (कोणत्याही माध्यमातून!) कमावणाऱ्या तरुणांवर खूप साहित्य लिहिले गेले आहे. एकप्रकारे  ही थीम आदिबंध (Archetype) म्हणूनच आलेली आहे.


डाॅन व्हिटो कार्लिआॅनेची व्यक्तिरेखा लेखक मारिओ पुझोने जबरदस्त ताकदीने रंगवलेली आहे. त्याच्या स्वभावाचे अनेक कंगोरे वाचकाला स्तिमित करणारे आहेत. अत्यंत धोरणी आणि कावेबाज असणारा डाॅन कुटुंबाला ( एका ठिकाणी पुझोने या कादंबरीचं वर्णन "फॅमिली नॉवेल'असंही केलं आहे.) सर्वोच्च प्राधान्य देणारा डाॅन सर्वांना समदृष्टीने जोखणारा आणि जवळचा -परका भेद न करणारा आहे. कोणत्याही परिस्थितीत शांत राहणारा डाॅन तितक्याच शांतपणे मार्गातील अडथळे दूर करणारासुद्धा आहे. कादंबरीच्या पूर्वार्धात कथानक डाॅन भोवती फिरते, मात्र नारकोटिक्सच्या व्यवसायात डाॅनने मदत करावी अशी अपेक्षा बाळगणारे डाॅनच्या नकारानंतर त्याच्या जिवावर उठतात, डाॅनवर गोळ्या झाडतात. केवळ दैव बलवत्तर म्हणून डाॅन वाचतो. विश्रांतीसाठी काही काळ व्यवसायापासून अलिप्त राहतो. डाॅनच्या तात्पुरत्या निवृत्तीच्या काळात डाॅनचा मोठा मुलगा सोनी आणि धाकटा मायकेल व्यवसाय सांभाळतात. गँगस्टर कुटुंंबापासून स्वत:ला दूर ठेवणारा आणि वेगळ्या करिअरचे स्वप्न पाहणारा धाकटा मायकेल एक दिवस डाॅनला भेटण्यासाठी हाॅस्पिटलमध्ये जातो आणि डाॅनच्या जीविताला असणारा धोका हेरतो. वेगळ्या मार्गाचे स्वप्न पाहणारा मायकेल प्रसंगावधान दाखवून डाॅनला मारण्यासाठी आतुर असणाऱ्या सोलेझ्झोला आणि त्याला सामिल असणाऱ्या मॅकलॅस्की या पोलीस अधिकाऱ्याला ठार मारतो. मायकेल अनिच्छेनेच व्यवसायात येतो आणि डाॅनचा खरा वारसदार ठरतो. मात्र, पोलिस अधिकाऱ्याला ठार मारल्यामुळे इटलीत त्याला फरार  व्हावे लागते.  तिथे गेल्यावर अपोलोनियाच्या प्रेमात पडतो आणि विवाहबद्धही होतो. कादंबरीत अनेक हिंसक प्रसंगांचं वर्णन करणाऱ्या पुझोने मायकेल आणि अपोलोनियाची प्रेमकहाणी तितक्याच अत्यंत तरल नि लाजवाब पद्धतीने पेश केली आहे. कडक उन्हाळ्यात शिळोप्याचा थंड वारा यावा, तसे हे प्रकरण आल्हाददायक अनुभुती देणारे आहे.  


न्यूयाॅर्कमध्ये डाॅन व्हिटो एका शिक्षा अटळ असणाऱ्या गुन्हेगाराला कबूल करायला लावून मायकेलच्या सुखरूप परतण्याचा मार्ग प्रशस्त करतो. मायकेलच्या परतण्याचा एक भाग म्हणून डाॅन एक शांतता प्रस्ताव इतर टोळ्यांसमोर ठेवतो. त्यावेळी सर्व टोळ्यांच्या प्रमुखांपुढे डाॅन भाषण करतो. म्हणतो,"मायकेल परत येत असताना कोणताही दगाफटका झाला अगदी "आकाशातून वीज जरी पडली, त्याचे विमान समुद्रात कोसळले, त्याचे जहाज समुद्रात गडप झाले, त्याला प्राणघातक ताप जरी आला तरी त्याला तुम्हीच कारणीभूत असाल'...या भाषणातले त्याचे शब्द कमालीचा थरार निर्माण करणारे आहेत. कादंबरीच्या शेवटी मायकेल सुखरूप न्यूयाॅर्कमध्ये परततो. पूर्वप्रेयसी के बरोबर विवाहबद्धही होतो. निवृत्त ‘गाॅडफादर’च्या मार्गदर्शनाखाली व्यवसायाच्या जबाबदाऱ्या पेलायला लागतो. बागेमध्ये नातवाबरोबर खेळत असताना डाॅनला हार्टअटॅक येतो व डाॅनचा मृत्यू होतो. मरतेसमयी जीवनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे Life is so beautiful हे अंतिम शब्द त्याच्या ओठी असतात... ‘गाॅडफादर’च्या लोकप्रियतेची कारणमीमांसा करताना जाणवते की, दुसऱ्या महायुद्धानंतर संधीच्या शोधात अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या असंख्य उपऱ्यांना व्हिटो कार्लिआॅनेच्या संघर्षात स्वत:चा संघर्ष अनुभवता आला.स्थलांतरितांच्या जीवनात कादंबरीने मोठे चैतन्य आणि आत्मविश्वास निर्माण केला. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे, मानवाच्या सुसंस्कृत असणाऱ्या बोध (conscious) मनापेक्षा असंस्कृत असणाऱ्या अबोध मनाला (unconscious) कादंबरीच्या आशयाने अधिक प्रभावित केले. ‘गाॅडफादर’मध्ये असलेली सत्ताकांक्षा, हिंसा, मत्सर सर्वांठायीच असतो, तो उघडपणे व्यक्त केला जात नाही, कादंबरीची महत्ता यातच आहे, की  हे सर्व अतिशय उघडपणे मांडले गेले आहे. लौकिक अर्थाने अभिजात साहित्यकृतीत ‘गाॅडफादर’ला स्थान नसेल, पण सामान्य वाचकांनी कादंबरीचे जे कौतुक केले आहे, ते क्वचितच एखाद्या साहित्यकृतीच्या वाट्याला आले आहे.मानवी मन आणि  गुन्हेगारी मानसिकतेचा अचूक वेध घेण्याच्या पुझोच्या अद्वितीय क्षमतेमुळे जगभरातल्या वाचक आणि प्रेक्षकांचं अफाट प्रेम लाभलेली ‘गाॅडफादर’ एक कालजयी कादंबरी ठरली आहे.

प्रा. डाॅ. रविकिरण माळी
talktoravikiran@gmail.com
लेखकाचा संपर्क : ९०११६०१५४१
(लेखक डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथे इंग्रजी विभागात सहायक प्राध्यापक या पदावर कार्यरत आहेत.)

बातम्या आणखी आहेत...