आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपेक्षित ‘स्त्री अभ्यास’ विषय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. सविता बहिरट

आपण स्त्रियांच्या हक्कासाठी व सुरक्षेसाठी कितीही कठोर कायदे केले किंवा कितीही योजना आखल्या, त्यासाठी कितीही निधी उपलब्ध करून दिला तरीही स्त्रियांचे विविध प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी गरज आहे स्त्री प्रश्नांच्या मुळाशी  असणारी कारणे शोधून काढणाऱ्या व त्यासंबंधी सैद्धांतिक बाजू मांडणाऱ्या ‘स्त्री अभ्यास’ विषयाची...
संपूर्ण जगभर आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यासाठी विविध उपक्रम आयोजित केले जातात. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा इतिहास कुणाला माहीत असो वा नसो, किमान या दिवसापुरतं का होईना स्त्रियांवर शुभेच्छांचा वर्षाव मात्र होत असतो. भारतातही विविध चळवळींच्या माध्यमातून स्त्री प्रश्नांना अधोरेखित करण्यात आले. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धापासून स्त्री शिक्षण, विधवांचे प्रश्न, बालविवाह आणि स्त्रियांचे एकूणच सामाजिक स्थान या अनुषंगाने  अनेक चळवळी उभ्या राहिल्या. कालांतराने स्त्रियांची एक शिक्षित फळी निर्माण झाली. स्त्री प्रश्नांची, सामाजिक प्रश्नांची  आणि संवेदनशीलतेची जाण  असलेल्या अनेक स्त्रियांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत, जातिअंताच्या चळवळीत तसेच कामगारांच्या चळवळीत, महागाईविरोधी आंदोलनात, जंगलतोड पर्यायाने पर्यावरण संतुलनाच्या आंदोलनात सहभाग घेतला. तसेच स्त्री शिक्षण, आरोग्य , रोजगार, वेतन, स्त्रियांवर होणारा हिंसाचार यासंदर्भातही  चळवळी  सुरूच होत्या. जागतिक पातळीवर स्त्रियांनी मतदानाच्या हक्कासाठी व गिरणी कामगार स्त्रियांच्या हक्कांसाठी मोठा संघर्ष केला.त्यामुळे अशा पद्धतीने महिला दिन साजरा होण्यामागे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर मोठा संघर्ष करावा लागलेला आहे. किमान त्या संघर्षाची आठवण तरी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने व्हावी व वर्तमान परिस्थितीत स्त्रियांचे असणारे मूलभूत व महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याचा जरी प्रयत्न शुभेच्छा देणाऱ्यांनी केला तरी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे सार्थक होईल असे वाटते.एकीकडे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा उत्साह आहे. परंतु दुसऱ्याच बाजूला स्त्रियांच्या विविध प्रश्नांचा सांगोपांग अभ्यास करणारा ‘स्त्री अभ्यास’ विषय मात्र दुर्लक्षित आहे. संयुक्त राष्ट्र संघाने जगभरात सुरू असलेल्या स्त्रियांच्या चळवळी व स्त्रियांचे प्रश्न समजून घेऊन १९७५ हे वर्ष महिला वर्ष म्हणून घोषित केले. त्याच दरम्यान भारतातही एसएनडीटी विद्यापीठात पहिल्या स्त्री अभ्यास केंद्राची स्थापना झाली. भारताच्या नवव्या पंचवार्षिक योजनेतही स्त्री अभ्यास केंद्राचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. असे असतानाही आज इतकी वर्षे उलटूनही ‘स्त्री अभ्यास’ विषय व त्या अनुषंगाने स्थापन झालेले केंद्र यांची जबाबदारी व दखल शासनाने घेतलेली नाही.उलट सुरू असलेली केंद्रे बंद करण्याचा प्रयत्न करत आहेत. 
केंद्र शासन व राज्य शासनाने स्त्रियांसाठी विविध योजना आखलेल्या आहेत व त्या सुरूही आहेत. तसेच स्त्रियांच्या हक्क आणि अधिकारांसाठी विविध कायदेही आहेत. परंतु तरीदेखील समाजातील नीतिमूल्यांची स्त्रिया व पुरुषांसाठी असणारी दुटप्पी विभागणी, सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि विविध क्षेत्रांतील स्त्रियांचे स्थान, त्यांची संख्या, लिंग गुणोत्तर, तसेच स्त्रियांवर होणाऱ्या हिंसाचाराचा आढावा घेतला तरी आपल्याला ‘स्त्री अभ्यास’ विषयाचे महत्त्व समजून येईल. आपण  स्त्रियांच्या हक्कासाठी व सुरक्षेसाठी कितीही कठोर कायदे केले किंवा कितीही योजना आखल्या, त्यासाठी कितीही निधी उपलब्ध करून दिला तरीही स्त्रियांचे विविध प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी गरज आहे स्त्री प्रश्नांच्या मुळाशी असणारी कारणे शोधून काढणाऱ्या व त्यासंबंधी सैद्धांतिक बाजू मांडणाऱ्या ‘स्त्री अभ्यास’ विषयाची...

संपर्क- ८६०५४९५७६०
 

बातम्या आणखी आहेत...