आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dr Shamsuddin Tamboli Writes About Jyoti Subhash

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

’दोस्ती जिंदाबाद'चा आवाज विसावला

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

 डॉ. शमसुद्दीन तांबोळी

मानवी शरीर हे नश्वर असतं. ते कधीतरी विसावणारच. मृत्यू ही अनिवार्य बाब असते. सर्वांनाच याला सामोरं जावं लागतं, पण आयुष्याला काही प्रयोजन देऊन त्यासाठी जगणाऱ्यांपैकी विद्याताई होत्या. 
विचार आणि वर्तन यांना विवेकबुद्धीने न्याय देणारे लोक हातावरच्या बोटावर मोजण्याइतकीच असतात. त्यांच्या आयुष्याचे प्रयोजन मानवाला मानवीय पातळीवर नेऊन त्यांना सुसंस्कृत बनवणे हाच असतो. त्यासाठी आपली वाणी, वेळ आयुष्य वेचणाऱ्या विद्याताई आज सकाळी आपल्यातून निघून गेल्या हे आपल्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांसाठीच नव्हे तर समाजातील समस्त भगिनींना चटका लावणारी घटना आहे. मानवी शरीर हे नश्वर असतं ते कधीतरी विसावणारच. मृत्यू ही अनिवार्य बाब असते. सर्वांनाच याला सामोरं जावं लागतं पण आयुष्याला काही प्रयोजन देऊन त्यासाठी जगणाऱ्यांपैकी विद्याताई होत्या. हे अनेकांना माहीत आहेच.
विद्याताई यांचे प्रसन्न व्यक्तिमत्त्व, दिलखुलास हसणे, विनय आणि बाणेदारपणा हे विद्याताईंचं वैशिष्ट्य होतं. आम्हा परिवर्तनवादी कार्यकर्त्यांना ऊर्जा देणाऱ्या विद्याताई अनेकांसाठी दीपस्तंभ होत्या. आज त्या नसल्याची जाणीव मन अस्वस्थ करते.
विद्याताईंचे जाणे हे तसे आकस्मिक नव्हते. गेल्या तीन-चार महिन्यांपासून त्या आजारीच होत्या. खासगी रुग्णालयात उपचार घेत होत्या. साधारण पंधरा-वीस दिवसांपूर्वी मुंबईहून मुमताज शेखचा फोन आला. विद्याताईंची तब्येत कशी आहे ? आम्हाला त्यांना भेटायला यायचंय. मी म्हणालो, त्या आजारी आहेत, पण मी जरा चौकशी करून सांगतो. मी गितालीताईंना फोन केला.  त्यांनी फोन घेतला नव्हता. मग मी साधना दधीच यांना फोन केला.त्यांनी सांगितलं..ताईंची तब्येत तशी बरी नाही. आता त्या कुणाला भेटत नाहीत. रुग्णालयाबाहेर तशी पाटी लावली होती....विद्याताईंनी निर्णय घेतला होता की आता मला औषधं घ्यायची नाहीत. मला धस्स झालं आणि आठवलं...विद्याताई या इच्छामरणाच्या समर्थक होत्या.त्यांनी ही भूमिका सातत्याने मांडली होती.” आपण आयुष्य जगलो. हवं तेवढी मजा घेतली. लोकांनी भरपूर प्रेम दिलं....काही केलं तरी आत्ता पूर्वीसारख आयुष्य मिळणार नाही. आयुष्याचा मोह नको...आता थांबायला पाहिजे. थांबते.” औषधं बंद झाली. प्रतिकारक्षमता कमी झाली...हळूहळू देह विसावला...आज महात्मा गांधींचा स्मृतिदिन...याच दिवशी विद्याताईनी अखेरचा श्वास घेतला.
विद्याताईंनी अनेक परिवर्तनवादी, विवेकवादी संघटनांना सोबत दिली. समतावादी संघटनांसाठी ताई या हक्काच्या मार्गदर्शक....हमीद दलवाई यांनी सात मुस्लिम महिलांचा मोर्चा काढला. या मोर्चामध्ये किती ऊर्जा होती हे विद्याताईंकडून ऐकायला मिळाले. दलवाईंनंतर मुस्लिम सत्यशोधक मंडळास ज्या स्त्रीवादी, समतावादी मान्यवर कार्यकर्त्यांनी आधार दिला त्यात विद्याताई आहेत. मेहरुन्निसा दलवाई यांनी हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूट स्थापन केली. या इन्स्टिट्यूटला कवी दिलीप चित्रे, भाई वैद्य आणि विद्याताईंनी आरंभापासून साथ दिली...
ताई म्हणायच्या, “मुस्लिम स्त्रियांबरोबरच सर्वच स्त्रियांना भाई असणारा हमीद यांचं कार्य प्रबोधनाच्या क्षेत्रात अग्रभागी आहे. आज मुस्लिम स्त्रियांच्या तुलनेत इतर स्त्रिया बऱ्याच प्रमाणात पुढे आहेत. मुस्लिम स्त्रियांना इतर स्त्रियांच्या बरोबरीला आणण्यासाठी हमीद दलवाई यांनी मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली याचा ताईंना सार्थ अभिमान होता. परंपरेच्या विरोधात विचार मांडताना प्रत्येकालाच अडचणींना सामोरं जावं लागतं. पण हमीद दलवाई यांचाा मोठेपणा यात आहे की फुले, महर्षी कर्वे,आगरकर यांनी ज्या स्वरूपाचं कार्य केलं त्या तोडीचं कार्य दलवाई यांनी केलं. रमाबाई रानडे, ताराबाई शिंदे, सावित्रीबाई फुले यांचं कार्य मुस्लिम समाजात रुजवण्यासाठी दलवाई यांनी समाजाचा विरोध स्वीकाला. याबरोबरच धर्मनिरपेक्ष एकात्म समाजाच्या निर्मितीत दलवाई यांचे योगदान देशाचे भविष्य घडवणारे असल्याने विद्याताईंना या चळवळीबद्दल आदर होता. त्यामुळेच मुस्लिम महिला परिषद, मुस्लिम महिलांचे मोर्चे यात ताई सर्वात पुढे असायच्या. शहाबानो प्रकरणाच्या वेळी  मंडळामार्फत तलाक मुक्ती मोर्चा काढला त्या वेळी सहभागी महिलांचं मनोबल वाढवण्यासाठी विद्याताई या महिलांशी मैत्री करत. २६ नोव्हेंबर २०१६ रोजी मंडळाने राष्ट्र सेवादलातील निळू फुले सभागृहात मुस्लिम महिला अधिकार परिषद आयोजित केली. या वेळी उत्तराखंड येथून सायराबानो आल्या होत्या, गाझियाबादहून नूर जहीर आल्या होत्या. या परिषदेत प्रमुख वक्ते म्हणून बोलताना विद्याताईनी स्त्रीमुक्ती या विषयावर नेमकेपणाने विचार मांडले. मिळून साऱ्याजणीत मुस्लिम महिलांच्या प्रश्नावर लेखन असलं पाहिजे याची त्या खबरदारी घेत. मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या वतीने बकरी ईदच्या दिवशी रक्तदान अभियान राबवले जाते याचा त्यांना मोठा आनंद होता...या रक्तदान कार्यक्रमाचे महत्त्व ,वेगळेपण माहीत असल्यामुळे त्या आवर्जून उपस्थित राहत...प्रबोधनाच्या चळवळीत, स्त्रीमुक्तीच्या चळवळीत सर्व समाज घटकातील लोकांचा सहभाग असावा. आपापल्या ठिकाणी होत असलेल्या या लढ्याशी त्या स्वतःला जोडून घेत.

मागच्या वर्षी अभिनेत्री दिग्दर्शिका ज्योती सुभाष यांनी नसिरुद्दीन शहा यांच्या सहभागातून “हमीद दलवाई : द अनसंग ह्युमनिस्ट “ हा लघुपट काढला याचा फार मोठा अभिमान आणि आनंद ताईंना वाटे...
तब्येत बरी नसताना, रुग्णालयात असतानाही एनआरसी, सीएएविरुद्ध चालत असलेल्या संघर्षाची माहिती घेत होत्या. मैत्री वाढवणे हा  त्यांचा स्थायीभाव होता...त्यांनी सर्व समाज घटकातील महिलांशी हा मैत्रीभाव जपला. महिला बोलल्या पाहिजेत, व्यक्त झाल्या पाहिजेत यासाठी त्या वेगवेगळ्या पद्धतीने प्रयोग करीत... ताईंनी अनेकांशी दोस्ती केली. ताहेरभाई पूनावाला, डॉ.सत्यरंजन साठे, कॉ.रा प नेने यांच्याबरोबर त्यांची खास दोस्ती होती. जणू  आज या दोस्तांना भेटण्यासाठी त्या आपल्यापासून दूरच्या प्रवासाला गेल्या आहेत. दोस्ती जिंदाबाद ही त्यांची आवडती घोषणा. डॉ.बाबा आढाव यांना फोन करून विद्याताईंची दु:खद बातमी दिली...बाबा म्हणाले, माझी बहीण गेली. चळवळीची दोस्त गेली. समतावादी चळवळीची मार्गदर्शक गेली. आज सायंकाळी पुण्यातील वैकंुठभूमीत सर्वांनी अश्रू आवरत ताईंना शेवटचा निरोप दिला. 


संपर्क : ९८२२६७९३९१