मी तर इवले इवले मूल

Apr 02,2019 10:12:00 AM IST


लहान बाळांना तेल लावून रगडून मालिश आणि नंतर अंघोळ हे जवळपास सगळ्या घरांमध्ये दिसणारं दृश्य. बाळांना अंघोळ अशी साग्रसंगीत आवश्यक नसते हे सांगणाऱ्या लेखाचा हा दुसरा भाग...

बाळाला रगडून मालिश. आणि नंतर कढत पाण्याने अंघोळ. त्यात बाळाला पायावर घेणे, बसवणे, डोक्यावरून पाणी घालणे, उलथे ठेवून घालणे, पालथे ठेवून घालणे, अशा क्रिया हौसेहौसेने केल्या जातात. हे सगळं अनावश्यक आहे आणि क्वचित धोकादायकसुद्धा.

विसळून घेणे ही बाळाला अंघोळ घालण्याची आदर्श पद्धत. करायचं असं की, टेबलावर योग्य त्या तापमानाचं पाणी एखाद्या टबमध्ये घ्यायचं आणि बाळाला त्यात हलकेच विसळून घ्यायचं. गार हवा, मग गरम पाणी, पुन्हा गार हवा अशा तापमानाच्या झोक्यांचा बाळाला त्रास होतो. तेव्हा हे लक्षात ठेवून सारं काही उरकायचं. अंघोळीनंतर तेल लावायचं. अशाने अंगात ऊब राहायला या तेलाचा उपयोग होतो.


या साऱ्या प्रकारात सर्वात अघोरी प्रकार कोणता असेल तर बाळाला धुरी देणे. रसरसत्या निखाऱ्यावर काय काय जाळून त्याचा धूर बाळाला दिला जातो. त्या धुरात काय दिव्य वायू असतील ते असोत, पण त्यात कर्बद्वीप्राणवायू आणि कर्बप्राणवायू असतातच असतात. यांनाच मराठीत कार्बन डायऑक्साइड आणि कार्बन मोनॉक्साइड म्हणतात. यातला दुसरा तर एकदा लाल पेशीत शिरला की पुन्हा निघत नाही. म्हणजे ती पेशी कायमची बाद. हा प्रकार तर पूर्णतः टाळावा.

बरेचदा बाळाची छाती फुगलेली दिसते आणि ती पिळली तर किंचितसे दूधही येते. याला डाकिणीचे दूध म्हणतात आणि हे पिळून काढणे चांगले असेही समजतात. पण अशा तऱ्हेने दूध पिळणे हानिकारक ठरते. यामुळे दुधाच्या पेशींना इजा होते आणि जर मुलगी असेल, तर तिला पुढे स्तनपानाला अडचण येते. असे दूध आईच्या संप्रेरकामुळे तयार झालेले असते. ते आपोआप, आतल्या आत जिरून जाते. पिळून काढण्याने कधी कधी तिथे इन्फेक्शन होऊन गळूदेखील उद्भवू शकते तेव्हा असे करू नये.

तान्ह्या मुलीच्या बाह्यांगातून थोडा रक्तस्राव झाल्याचंही दिसू शकतं. हाही आईच्या संप्रेरकांचा प्रताप. ह्यालाही काहीही करायची गरज नसते. हाही स्राव आपोआप थांबतो. जुजबी स्वच्छतेपलीकडे काही करावे लागत नाही. उगाच आश्चर्याचे चित्कार काढू नयेत. पदर तोंडावर धरून ‘पदर आल्याची’ अस्फुट चर्चा करू नये. ती फिजूल आहे.

बाळाच्या डोळ्यात काजळ घालणेही असेच चुकीचे आहे. शिवाय ते डायरेक्ट बचाकभर घातलेले असते. त्या काजळातून डोळे शोधावे लागतात. घरी केलेलं, चांदीच्या वाटीवर धरलेलं असलं तरीही काजळाची गरज नाहीच. काजळामुळे डोळे मोठे होत असते तर चिन्यांनी आणि जपान्यांनी आपल्याकडून कित्तीतरी काजळ आयात केलं असतं! काजळ घालणारी बोटं अस्वच्छ असली तर डोळ्याला इन्फेक्शन होतं, कधी बोट डोळ्याला लागतं, काजळीचे कण डोळा ते नाक अशा सूक्ष्म अश्रुनलिकेत अडकून ती वाट बंद होते; असे अनेक प्रकार संभवतात. दृष्ट लागू नये म्हणून हा प्रकार आवश्यक आहे म्हणे. काय काजळ तीट लावायचं ते इतरत्र लावा. पार अंगभर ठिपके ठिपके काढून बाळाचा बिबट्या करा. पण प्लीज डोळ्यात काही घालू नका.

असाच बाळाची टाळू भरणे नावाचा एक प्रकार आहे. हा करू दिला नाही तर बाळाला पाहायला आलेल्या बाईचा डायरेक्ट अपमान होतो म्हणे. लगेच तिचा पापड मोडतो. यात आलेली बाई बाळाच्या डोक्यावर तेल थापटते. तेल राहून, केस चिकटून, खवडे झाले तरी चालतील, पण टाळू भरणार म्हणजे भरणार! मुळात तेलाने असं काही होत नाही. टाळू न भरणाऱ्या इतर संस्कृती या पृथ्वीतलावर नांदत आहेत. त्यांच्या अपत्यांची टाळकी टाळू न भरताही शाबूत आहेत. बाळाची टाळू म्हणजे त्याच्या कवटीच्या हाडातील मऊ मोकळे अंतर असते. बाळाचा वाढता मेंदू मावावा म्हणून अशी सोय असते. शिवाय प्रसूतीच्या वेळी अशा लिबलिबीत लवचिक कवटीमुळे बाळाचे डोके थोडे निमुळते होते आणि सुलभतेने बाहेर येते. पुढे १८ महिन्यांपर्यंत ही जागा हाडांनी भरून जाते, चांगली टणक होते. तेल थापटून टाळू भरून येत नाही. शिवाय जर भरून येत असेल तर मग एकच का? अशी किमान अजून एक जागा असते बाळाच्या डोईस. कमी दिवसाच्या बाळाला तर अधिक असतात. त्याही भराव्यात. पण बायकांना या जागांचा पत्ता नसल्यामुळे सारा भर माथ्यावर तेल थापटण्याकडे. बिच्चाऱ्या बाकीच्या टाळू! मुकाट्याने आपोआप भरून येतात.

बाळाला भेटायला येणारेही असेच उच्छाद आणतात. मुळात भेटायची, बाळ पाहायची उत्सुकता असणे यात गैर काही नाही. माकडातही अशी वागणूक शास्त्रज्ञांनी नोंदवली आहे! पण जावं ते थोड्या दिवसांनी, जरा आई आणि बाळ स्थिरस्थावर झाल्यावर. तात्काळ भेटायला गेलं नाही तर आपलं महत्त्व कमी होईल असं काहींना वाटतं. मग दवाखान्यातच भेटायला जायचं, हात साबणाने स्वच्छ न धुताच बाळाला मांडीवर घ्यायचं, त्याला मांडीवर घेऊन डोलवायचं, त्याच्या हातात मळकी नोट ठेवायची, मग ते ती नोट तात्काळ तोंडात घालणार! अशी सगळी गंमत चालू राहते.
येणारे-जाणारे तरी किती, त्याला काही सुमारच नाही. त्या आईला ना पुरेशी विश्रांती मिळते, ना बाळाला घ्यायला वगैरे पुरेसा निवांतपणा, ना प्रायव्हसी. काही समाजात तान्ह्या बाळाला अजिबात बघायला जात नाहीत, गेले तरी हात लावत नाहीत. हे बेस्ट आहे. काही लोकांत मात्र येईल ती बाई बाळ हाताळणार, त्याला तेल लावून त्याची टाळू भरणार. वर असं काही टाळावं म्हणलं तर तिचा अपमान होणार. ‘मेलीनं मूल माझ्या मांडीवर दिलं नाही’ म्हणणार.
अशा किती गोष्टी सांगाव्यात? एक ना अनेक. शेवटी मी तर माझ्या दवाखान्यात प्रत्येक खोलीबाहेर पाटी लावून टाकली आहे...


मी तर इवले इवले मूल;
अगदी नाजूक नाजूक फूल.
भेटण्यासाठी तुम्ही आतुर;
पण डॉक्टर मात्र चिंतातुर.
बाहेरून येता कुठून कुठून;
कपडे, अंग, हात मळवून.
आत्ता भेट फक्त लांबून,
नंतर बोलावीन हाक मारून.
याने मात्र भलताच फरक पडला आहे. एरवी
येणारे यायचे, काय करायचे ते करायचे आणि
जायचे. आता येणारे येतात, काय करायचे ते
करतात आणि जाताना मला सांगून जातात,
‘डॉक्टर, तुम्ही कविता छान करता हं!’


डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई
[email protected]

X