Home | Magazine | Rasik | Dr Shantanu Abhyankar writes about Darvin thinking

डार्विनचे शाश्वत बोल!

डॉ. शंतनू अभ्यंकर | Update - Apr 14, 2019, 12:04 AM IST

डार्विनविचार, ‘झाकळुनी जळ गोड काळिमा पसरून लाटांवर’, जणू विचारडोहाच्या काठावर औदुंबर होऊन, पाय सोडूनी जळात बसला आहे

 • Dr Shantanu Abhyankar writes about Darvin thinking


  डार्विनविचार, ‘झाकळुनी जळ गोड काळिमा पसरून लाटांवर’, जणू विचारडोहाच्या काठावर औदुंबर होऊन, पाय सोडूनी जळात बसला आहे. चार्लस डार्विनने जीवशास्त्राचं विचारविश्व तर उलथेपालथे केलेच, पण मानवी प्रज्ञेच्या हरएक अविष्कारावर आपली मुद्रा उमटवली आहे. कोणत्या वैचारिक वातावरणात हे घडले आणि पुढे त्यामुळे काय बदल झाले याचा हा धावता आढावा. १९ एप्रिल रोजी येऊ घातलेल्या डार्विनच्या १३७व्या स्मृतिदिनानिमित्त...

  अनिश्चितता हीच उत्क्रांती विचारात कळीची आहे. आजूबाजूला ‘निश्चित विज्ञानाचा’ यळकोट चालू असताना अनिश्चिततेच्या पायावर आपला डोलारा उभा करण्यात डार्विनचे महात्म्य आहे...

  कोणत्याही विचारधारेचा इझम होणे हे वाईटच. ग्रंथप्रामाण्य, शब्दप्रामाण्य, व्यक्तिपूजा आणि आंधळी पंथभक्ती ही काही चांगली लक्षणे नव्हेत. शब्दाशब्दाला प्रश्न विचारणाऱ्या विज्ञाननामे विचारधारेला तर इझम म्हणजे, अब्रम्हण्यम. त्यामुळेच की काय ‘न्यूटन, आइनस्टाइन ते आले गेले, त्याविण जग का ओसचि पडले?’ अशी विज्ञानाची वृत्ती असते. पण इतके असूनही डार्विनिझम, ‘डार्विनवाद’ असा शब्दप्रयोग मधूनमधून वापरण्यात येतो. आंधळ्या डार्विन भक्तीपोटी नाही,तर डार्विन विचाराची महत्ता लक्षात यावी म्हणून.

  खरं पाहता डार्विनविचार, ‘झाकळुनी जळ गोड काळिमा पसरून लाटांवर’, जणू विचारडोहाच्या काठावर औदुंबर होऊन, पाय सोडूनी जळात बसला आहे. डार्विनने जीवशास्त्राचं विचारविश्व तर उलथेपालथे केलेच, पण मानवी प्रज्ञेच्या हरएक अविष्कारावर आपली मुद्रा उमटवली. आज जैविक उत्क्रांती, वर्तनशास्त्र, लैंगिक वर्तन, सामाजिक वर्तन, सृष्टीनिर्मिती ते अगदी आकाशगंगांच्या नवनिर्मितीपर्यंत कोणताही विचार डार्विनचे बोट धरूनच पुढे जातो. अर्थात, लेखणीच्या एका फटकाऱ्यात डार्विनने सारे बदल घडवले असे नाही. डार्विनलाही विरोधक होते, त्याच्या इतकेच विचारी आणि तगडा युक्तिवाद असणारे होते. काही विज्ञान-व्यूह आणि विचार-व्यूह होते. ते भेदून, कडव्या लढाईनंतरच डार्विनला त्याचे स्थान प्राप्त झाले. कोणत्या वैचारिक वातावरणात हे घडले आणि पुढे त्यामुळे काय बदल झाले याचा हा धावता आढावा आहे.


  डार्विनच्या मूळ सिद्धांतातही आज बदल झाले आहेत; मूलभूत नाही पण तपशीलात आहेत. गेल्या शतकात, जनुकशास्त्र आणि सजीवांचे एकमेकांशी असलेल्या जनुकीय नातेसंबंधानुसार वर्गीकरण, असा समसमा संयोग जुळून येताच डार्विन विचाराने निर्विवाद बाजी मारली आहे. तेव्हा मी डार्विनने केले/सांगितले, असे म्हणतो तेव्हा आजचा उत्क्रांतीविचारही अभिप्रेत आहे, हे लक्षात असो द्यावे.
  डार्विन म्हटले की, माकडापासून माणूस झाला असं सांगणारा एक दाढीवाला आजोबा एवढेच चित्र आपल्या डोळ्यासमोर येते. मुळात माणूस हा माकडापासून निर्माण झाला, असे डार्विनने कुठेच म्हटलेले नाही. त्यांनी असे दाखवून दिले की मानव आणि मर्कट हे एकाच पूर्वजांचे वंशज आहेत. म्हणजे, आपल्या चुलत भावापासून आपण जन्माला आलो असे आपल्याला म्हणता येईल का? नाही. पण आपले आजोबा एकच होते, हे सत्य आहे. तसेच हे. हा धक्का पुढारलेल्या पाश्चात्यांच्याही पचनी पडलेला नाही. डार्विनच्या हयातीतही यावर अत्यंत हीन वाद झडले होते.


  उत्क्रांतीवाद्यांचा दावा असा की, संपूर्ण जीवसृष्टी ही प्राथमिक अवस्थेतल्या सजीवांपासून सावकाशपणे उत्क्रांत होत आली आहे. आजची सजीवांची विविधता हा उत्क्रांतीचाच एक भाग आहे आणि माणूस हादेखील एक प्राणीच असून या उत्क्रांतीचंच फलित आहे. तर विरोधी पक्षाचं म्हणणं असं की, अगदी प्रथमावस्थेतील प्राण्यातदेखील अत्यंत गुंतागुंतीची जैवरासायनिक रचना असते. केवळ चार रसायने अपघाताने एकत्र आली म्हणून ते रेणू ‘जीव’ धरू शकत नाहीत. तेव्हा सजीवांची उपज ही कोण्या बुद्धिवान निर्मिकानं केलेली करामत आहे. ही मंडळी यासाठी मोठा मासलेवाईक दाखला देतात. समजा, चालताचालता तुम्हाला एक दगड दिसला तर तो तिथे निसर्गतः आहे हे मान्य करता येईल, पण एखादं घड्याळ आढळलं तर ते काही निसर्गतः घडलेलं नाही, हे उघड आहे. घड्याळ्याच्या निर्मितीमागे कोणीतरी कसबी कारागीर आहे हे निश्चित. तद्वतच सजीवांची गुंतागुंतीची रचना निव्वळ निसर्ग-अपघातांनी, आपोआप घडून येणे, अशक्य आहे. हा तर कुणा कुशल निर्मिकाचा खेळ.


  उत्क्रांतीवाद असे दाखवून देतो की, अशा कोण्या घड्याळजीची गरजच नाही. स्वतःच्या नकला काढू शकणारे रेणू (म्हणजे आपली गुणसूत्रे), या नकला काढताना होणारे किंचित किंचित बदल आणि नैसर्गिक निवडीची न-नैतिक, दिशारहित, शक्ती हीच जीवोत्पत्तीचे कारण आहे. ही शक्ती अशी आंधळी आहे(Blind watchmaker). तिला काया, वाचा, मन, काही काही नाही.
  आणखीही काही युक्तिवाद आहेत. समजा एखाद्या जंबोजेटचे सारे भाग सुटे करून एखाद्या आवारात ठेवले आणि चक्रीवादळासरशी ते एकत्र येऊन जम्बोजेट बनलं, असं कुणी सांगितलं, तर ते विश्वसनीय वाटेल का? जम्बो जेटसारखी गुंतागुंतीची रचना केवळ वाऱ्यानं घडू शकेल का? निर्मितीवाद्यांचं म्हणणं असं, की वादळानं जम्बोजेट बनणं जसं असंभवनीय आहे, तद्वतच उत्क्रांतीनं सजीवांची निर्मितीही असंभवनीय आहे.
  मात्र उत्क्रांतीवाद्यांच्या मत,े हा सारा उत्क्रांतिवादाचा शुद्ध विपर्यास आहे. आलं वारं आणि झालं जम्बोजेट तयार, असा मुळी युक्तिवादच नाहीये. पृथ्वीचं काही कोटी वर्षं असलेलं वय, त्या काळातले भूकवचातले आणि वातावरणातले बदल, प्रयोगशाळेत निर्माण करता आलेली अमिनोआम्ल, ठिकठिकाणी सापडलेले जीवाश्म आणि अव्याहतपणे तयार होणाऱ्या, आणि बदलाशी जुळवून न घेता आल्यामुळे, नष्ट होणाऱ्या प्रजाती, हा सारा उत्क्रांतीच्या बाजूने भक्कम पुरावा आहे.


  उत्क्रांती कशी घडते, यावर डार्विनकाळी बरीच मतमतांतरे होती. खुद्द डार्विनच्या आजोबांनी उत्क्रांतीसम काही कल्पना मांडली होती. ‘ट्रान्सम्युटेशन’वाल्यांच्या मते पृथ्वीतलावर कोणी अवतार उतरावा, तशी नवी प्रजाती अचानक उद्भवते किंवा एखाद्या जीवात एकाएकी इतका टोकाचा बदल होतो, की नवीनच प्रजाती निर्माण होते. तेव्हा जोमात असलेल्या ‘टायपॉलॉजी’च्या साच्यात हा विचार फिट्ट बसतो. एका ‘टाइप’कडून दुसऱ्या ‘टाइप’कडे थेट उडी! ‘ओर्थोजेनेसिस’वाले सांगत, की सजीवांना सतत एका पूर्वनिश्चित उत्कर्षावस्थेची अंगभूत आस असते आणि परिणामी सजीव, पिढी दर पिढी विकसित होत जातात. उन्नतीकडे होणारा हा प्रवास म्हणजेच सजीवांचे उत्क्रांतीरहस्य. लामार्कच्या तत्वानुसार जगताना झालेले शारीरिक बदल हे पुढील पिढीत संक्रमित होतात आणि हळूहळू नवीन प्रजाती उत्पन्न होतात. याचे गाजलेले उदाहरण म्हणजे, जिराफाची लांब मान. लामार्कची मांडणी अशी, की उंचावरचा पाला खाता खाता आखूड मानेच्या जिराफांच्या माना लांबल्या, मग त्यांच्या मुला-बाळांच्याही लांबल्या आणि परिणामी काही पिढ्यात लांब मानेचे जिराफ तयार झाले. अर्थात एके काळी या मांडणीला बरीच मान्यता असली तरी नवीन संशोधनानंतर हा सिद्धांत मागे पडला. कोणाचा हात तुटला म्हणून त्याला थोटी मुले होत नाहीत आणि जन्मतः सुंता केल्याने कुणाला सुंता झालेली मुले होत नाहीत! उत्क्रांतिवाद सांगतो, निसर्गतः काही जिराफ ऊंच मानेचे निपजतात (Variation); त्यांना जगण्याच्या, तगण्याच्या आणि म्हणून जुगण्याच्या, अधिक संधी प्राप्त होतात (Natural Selection); परिणामी पिढ्यांपिढ्या माना ऊंच ऊंच होत जातात, अखेरीस ऊंच मानेचा जिराफ ही नवीनच प्रजाती उत्पन्न होते (Speciation). थोडक्यात,नव्या नव्या प्रकारचे जीव निर्माण होण्यात कर्ताकरविता हात हा नैसर्गिक निवडीचा आहे, त्यासाठी कोणत्याही शक्तीची कल्पना अनावश्यक आहे.


  कोण्या निर्मिकाने ही सृष्टी निर्माण केली, आज आपल्याला दिसते त्याच स्वरुपात निर्माण केली आणि तेव्हापासून सृष्टी आणि जीवसृष्टी अव्याहतपणे चालू आहे. ‘स्काला नाट्युर’ अशी ही कल्पना होती. जीवनाची साखळी किंवा पायऱ्यांसारखी रचना... सगळ्यात वर देव, मग देवदूत, मग शापित देवदूत, तारे, चंद्र, राजे, राजपुत्र, सरदार, सामान्य मनुष्ये, जंगली प्राणी, पाळीव प्राणी, वृक्ष, अन्य वनस्पती, हिरे, सोने, चांदी, इतर खनिजे...! मानवाचे पूर्वज मानवच होते आणि मुंग्यांचे मुंगीच होते; वडापासून वड निपजले आणि पिंपळापासून पिंपळ. कालही निपजले, आजही निपजतात आणि उद्याही निपजतील. ही धारणा, हे आसपास दिसणारे ‘उघडउघड’ सत्य, डार्विनने नाकारले. कालौघात, जीवात, किंचित किंचित बदल होत जातात. परिणामी, बऱ्याच काळानंतर मूळ जीव आणि ताजा जीव हे एकाच जीवमाळेचे मणी आहेत हे सांगूनही खरे वाटत नाही; असे त्याचे सांगणे. सजीवांचे आजचे स्वरूप हे तर त्यांचे संस्करीत रूप आणि हे ही स्वरूप अंतिम नाही, ही जाण त्यानी दिली.

  जीवसृष्टीचा विकास हा साखळीसारखा नसून अनेक फांद्या फुटलेल्या झाडासारखा आहे. खरेतर फांद्या फांद्या फुटलेले झाड एवढे एकच चित्र त्याच्या मूळ हस्तलिखितात आहे. हा विनम्र विद्वान समासात लिहितो, ‘असं वाटतंय.’ म्हणजेच पिढ्यापिढ्यांची, कड्याकड्यांची साखळी असावी अशी दिसणारी जीवसृष्टी डार्विननी फांद्याफांद्यांची कल्पिली. जीवसृष्टी म्हणजे विविध जीवांच्या अनंतापर्यंत एकमेकींना न छेदणाऱ्या समांतर साखळ्या, अशी प्रचलित कल्पना होती. डार्विननी जीवांच्या वंशाचा वृक्ष कल्पिला आणि तोही प्रत्येक फांदीवर वेगळ्याच प्रजातीने डवरलेला वृक्ष. वृक्ष म्हटला म्हणजे एकमेकींना मिळणाऱ्या रेषा आल्या. वृक्ष म्हटला की समान पूर्वज आले. कोणत्याही टोकापासून सुरवात केली तरी अंतिमतः खाली, खाली, खाली, त्याच्या बुंध्याशीच पोहोचणे आले. एका आदिजीवापासून आजचा वृक्ष फुटलेला आहे हे ही ओघाने आले. बऱ्याच फांद्यावाले डेरेदार झाड आणि त्याच्या टोका-टोकाला एकेक सजीव असे चित्र जीवशास्त्राच्या पुस्तकात हमखास दिसते. या झाडाच्या सर्वात ऊंच फांदीवर असतो माणूस. माणूस हा सगळ्यात अधिक उत्क्रांत प्राणी, असे सुचवणारे हे चित्र साफ चुकीचे आहे. लक्षात घ्या, गांडूळ चिखलात राहू शकते, तुम्ही आम्ही नाही. म्हणजेच चिखलात राहण्यासाठी गांडूळ हा सर्वात उत्क्रांत जीव आहे. आपण गांडुळाची जागा घेऊ शकत नाही आणि गांडूळ आपली जागा घेऊ शकत नाही. त्या त्या ठिकाणी तो तो जीव सर्वात उत्क्रांत जीव आहे, म्हणूनच तर तो आहे. अन्यथा तो केव्हाच नष्ट झाला असता. थोडक्यात सर्वच जीव त्यांच्या त्यांच्या परिस्थितीत, परिसंस्थेत सर्वात उत्क्रांत आहेत. म्हणूनच ते ते आहेत, नाही तर केव्हाच खल्लास झाले असते.


  सजीवसृष्टीच्या वैविध्यात कर्ताकरविता हात कोण्या अदृश्य, सर्वशक्तिमान निर्मिकाचा नसून ‘नैसर्गिक निवडीचा’ आहे, हे सूत्र विज्ञानातीलच नव्हे तर तत्वज्ञानातील एक कळीचे सूत्र ठरले आहे. ‘वरी घालतो धपाटा आत आकाराचा हात’, असे म्हटले आहे; पण धपाटा घालणारा हात आणि आकार देणारा हात, असे दोन्ही हात नैसर्गिक निवडीचे आहेत, असे डार्विन दाखवून देतो. न भूतो अशीच ही कल्पना होती. नैसर्गिक निवडीचं बळ (Selection pressure) हे भौतिकीच्या राज्यातल्या गुरुत्वाकर्षण बळ, विद्युतचुंबकीय बळ अशा मापनसिद्ध बळांपेक्षा अगदी भिन्न स्वरूपाचे आहे. या बळामुळे जे तगू शकत नाहीत ते जगण्यास, जुगण्यास आणि प्रसवण्यास मुळी शिल्लकच उरत नाहीत. या शर्यतीतून ते आधीच बाद होतात. इतका साधासा सिद्धांत डार्विन सांगतो. ‘सक्षम तेवढेच जगतात’ (Survival of the fittest) हे त्याचं प्रसिद्ध लौकिक रूप. मुळात डार्विननी हा शब्दप्रयोग वापरला नव्हता, हर्बर्ट स्पेन्सरचे हे शब्द.
  पण उत्क्रांतीच्या स्पर्धेत सबल तेवढे टिकतात, हा एक लोकमान्य गैरसमज आहे. मुळात हत्यारे आणि संस्कृती काढून घेतली तर माणूस दुर्बलाहूनही दुर्बल आहे. तेव्हा बळ हे अनेक प्रकारचे असते हे लक्षात घेतले पाहिजे. बाहू-बळ आहे तसेच बुद्धिबळही आहे. मानवापेक्षाही महाकाय असे प्राणी काळाच्या ओघात नष्ट झाले आहेत आणि इवली लव्हाळी टिकली आहेत. लढायाही अनेक प्रकारच्या असतात. दुष्काळात तगण्यासाठी शुष्कतेशी सामना जमायला हवा, थंडीत तगून रहाण्यासाठी शीत-युद्ध जिंकता यायला हवे आणि तुमच्या सवयीच्या आहारातल्या ऐवजी एखाद्या वेगळ्याच वनस्पतीने सर्व परिसर व्यापला, तर आता ती पचवण्याची तुमची ‘ताकद’ हवी. अशा अनेक ताकदी, अनेक लढाया, अनेक कुरुक्षेत्रे, जीवांची क्षमता जोखत असतात. प्रश्न निव्वळ शारीरिक ताकदीचा नाही. बदलता परिसर, बदलती परिसंस्था, बदलते वातावरण या साऱ्याचा सजीवांच्या, जगण्या-तगण्या-जुगण्या-प्रसवण्यावर अनेकांगांनी दबाव येत असतो (Selection Pressure). उत्क्रांती म्हणजे,या नित्यनूतन, दबावात जे उरतात ते पुढे पुढे जातात. जे मोडतात ते संपतात. उद्याच्या ‘दाब-दबावाचा’ अंदाज उत्क्रांतीला कुठून यावा? बंदुकीच्या शोधाचा अंदाज वाघांना होता काय?

  एकाच प्रजातीची अनन्य आणि उदंड संख्या असेल तर त्यातील कमअस्सल उत्क्रांतीच्या चाळणीतून गळून नामशेष होतील. जगण्यास अधिक लायक तेवढे प्रजननासाठी उपलब्ध असतील. ‘अनन्य’ आणि ‘उदंड’ हे दोन्ही शब्द इथे महत्वाचे आहेत. दोन टप्यामध्ये चालणारी ही प्रक्रिया आहे. अनन्य लोकसंख्या ही पुनरुत्पादनाच्या सारीपाटावर जनुकांचे काय दान पडते यावर अवलंबून. सगळी माणसे, माणसेच असतात, पण तरीही एकासारखा दुसरा असतच नाही. ही जनुकांची किमया. जनुकांच्या जुगारात प्रत्येकाला वेगवेगळे दान पडते. पण ही अनिश्चितता हीच उत्क्रांती विचारात कळीची आहे. आजूबाजूला ‘निश्चित विज्ञानाचा’ यळकोट चालू असताना अनिश्चिततेच्या पायावर आपला डोलारा उभा करण्यात डार्विनचे महात्म्य आहे. निश्चित उत्तराचे सूत्र शोधायच्या नादाला लागला असता तर डार्विन इथवर पोहोचता ना. त्यातल्या त्यात माणसे अनन्य असतात, हे उघड जाणवणारे सत्य आहे पण सारेच जीव असे अनन्य असतात, हे ओळखण्यात डार्विनची महत्ता आहे. सगळे शंख आणि सगळे शिंपले, सगळे कावळे आणि सगळी शेवाळे, सगळ्या बोरी आणि सगळ्या बाभळी अनन्य असतात. हे अनन्यत्व; हे किंचित, किंचित बदल, हाच उत्क्रांतीचा पाया आहे. अनन्यत्व यादृच्छिक (Random) तर निवडीची चाळणी ही परिस्थितीबद्ध. त्या त्या परिस्थितीतल्या सगळ्यांना सारखीच. नैसर्गिक परिस्थिती बदलली की या चाळणीच्या जाळ्या बदलणार. काय गळणार आणि काय नाही हे ठरणार. सजीवातील बदल हे जनुके आणि परिस्थिती या दोन्हीची फलश्रुती आहे.


  डार्विन काळी विज्ञान म्हणजे सूत्र, आकडेमोड, पुढे काय घडेल याचे नेमके भाकित अशी कल्पना होती. न्यूटनचे गतीचे नियम, ग्रह-गतीची नेमकी गणिते हे म्हणजे, भरभक्कम विज्ञान. त्यामुळे जीववैज्ञानिक फिजिक्सवर जळत असतात (Physics envy) असाही गंमतीशीर आरोप आहे. त्यामानाने उत्क्रांतीशास्त्रात असतात त्या संकल्पना. स्पर्धा, निवड, वारसा, मादीकडून होणारी जोडीदार नराची निवड (स्वयंवर!), अशा संकल्पना भौतिकी किंवा रासायनिक नियमात घट्ट बसवता येत नाहीत. उत्क्रांतीशास्त्राची तऱ्हा इतर विज्ञानशाखांपेक्षा थोडी आगळी आहे. इथे प्रयोगाला वाव कमी. निरीक्षण, तुलना, वर्गीकरण आणि भूतकालीन घडामोडींबद्दलच्या विविध अंदाजांची तपासणी; हा इथला रिवाज आहे. ‘प्रदीर्घ कालपट’ (Geological timespan) हीच संकल्पना बघा ना. प्रत्येक पिढीत होणारे किंचित बदल हे साठत साठत एक वेगळीच प्रजाती निर्माण होते, पण हे घडायचे तर भलताच दीर्घ कालावधी लागेल. देवाने पृथ्वी जेमतेम काही हजार वर्षापूर्वी निर्माण केली आहे, असे मानणाऱ्या बायबलनिष्ठ समाजाला, हा विशाल कालपट आकळणे अवघडच गेले. अक्षर ओळख नसताना निव्वळ काहीतरी आकार काढता काढता आपले नाव आपल्याकडून बिनचूक लिहिले जाण्याची शक्यता खूप कमी आहे. तसे व्हायचेच झाले तर कितीतरी काळ प्रयत्न करत रहावे लागेल. उत्क्रांतीला असाच प्रचंड काळ लागतो. हा कालपट समजावून घेणे, हा उत्क्रांतीचा अभ्यास करण्यातला महत्वाचा टप्पा आहे. पृथ्वीचे कोट्यवधी वर्षांचे वय आणि जीवांच्या उत्पतीचा कालावधी पहाता, आपली आयुष्ये निमिषमात्रही नाहीत. त्यामुळे आपल्याला दोन-तीन पिढया, किंवा काही हजार वर्षे, एवढी कल्पना सहज जमते. पण उत्क्रांतीसाठी जी अति दीर्घकाळाची कल्पना करावी लागते, तिथे आपले घोडे अडते. उत्क्रांती आपल्याला अशक्य कोटीतली वाटायला लागते.

  डार्विनकालीन वैज्ञानिक माहोल काही और होता. ‘ओरिजिन ऑफ स्पेसिज’ प्रसिद्ध झाले तेव्हा (१८५९) शास्त्रज्ञ आणि विचारवंत हे बहुतेक सारे ख्रिश्चन होते आणि पुरुष होते. त्यांचे जग हे देवानी निर्मिलेले, ‘त्याच्या’च नियमांनी चालणारे होते. गुरुत्वाकर्षणाचे, उष्णतेचे आणि कसले कसले नियम ‘त्याने’च आखले होते. काही जीव आपल्या मतीने निर्माण केले होते. ‘त्याच्या’च मतीने निर्माण झालेले हे सृष्टीचक्र, ‘त्याने’च नेमलेल्या गतीने चालू होते. ‘त्याच्या’च इच्छेने त्याची सारी लेकरे परस्परांशी आणि निसर्गाशी एकोपा ठेवून नांदत होती. विज्ञानात डिटर्मिनिझमचा आणि टेलिओलॉजीचा दबदबा होता.


  डिटर्मिनिझम म्हणजे स्वतंत्र इच्छेचा अभाव. प्राण्यांना, म्हणजे अर्थात त्यावेळच्या विचारधारेप्रमाणे मुख्यत्वे मनुष्यप्राण्याला, स्वतंत्र इच्छेने (Free will) काही करता येत नाही असा दावा. सर्व काही पूर्वनिश्चित आहे. ईश्वरेच्छा बलियसी. लाप्लास तर म्हणाला होता, की आज जर जगाचे सारे ज्ञान मला प्राप्त झाले तर उद्या काय घडणार हे मी निश्चितपणे सांगू शकतो! ‘द ओरिजिन ऑफ स्पेसिज’ प्रसिद्ध झाले आणि हे संगतवार विचारविश्व उध्वस्त झाले. डार्विन समंजसपणे सांगतो, की सजीवातील जनुकीय बदल हे यादृच्छिक (Random) असतात. देवाघरचे नेमानेम, विचित्र नसून मुळात अस्तित्वातच नाहीत, हे डार्विनला ज्ञात झाले. ईश्वरेच्छाही बलियसी नाही आणि स्वेच्छाही बलियसी नाही. पहिल्या पायरीत जनुकांच्या सारीपाटावर काय दान पडेल हे सांगता येत नाही आणि दुसऱ्या पायरीवरची निवड ही यमनियमबद्ध. जैविक क्रियांचा हा जनुकीय जुगार अनेकांना धक्का देऊन गेला.


  टेलिओलॉजी म्हणजे हेतुवाद. उदाः कोयीचा ‘नैसर्गिक हेतू’, आंब्याचे झाड होणे हा आहे. पण एवढेच नाही तर एकूणच या जगरहाटीमागे कोणीतरी, काहीतरी हेतू बाळगून आहे, सारे काही घडते ते योजनापूर्वक आणि सहेतूक घडते अशी कल्पना. डार्विनकाळी धर्मशास्त्र, तत्वज्ञान आणि विज्ञान या ज्ञानशाखांची गच्च जाळीं एकमेकांत गुंतलेली होती. ढणढणत्या धर्म दिव्याचा उजेड कमी आणि धूरच फार होत होता. या धुरातून गुदमरत विज्ञान वाट शोधत होते. तेव्हा हेतू-कल्पनाही वैचारिक वातावरणात भरून राहिली होती. डार्विनप्रेरित नव्या जीवशास्त्रात निसर्गाला असा कोणताही हेतू आवश्यक ठरत नाही. ही सृष्टी कशी निर्माण झाली? या सृष्टीत, जीवसृष्टी कशी निर्माण झाली? आपण कसे निर्माण झालो? आणि या साऱ्याचा हेतू काय? हे मानवी मनाला पडलेले चिरंतन प्रश्न. प्रत्येक धर्मानी आणि धर्ममार्तंडांनी, कित्येक पंथांनी आणि पंडितांनी, यांची उत्तरे दिली आहेत. अर्थात वेगळीवेगळी. कितीतरी तर परस्परविरोधी. डार्विननी या साऱ्या प्रयत्नांना एक वेगळीच कलाटणी दिली. अर्थशून्य भासणारा कलह जीवनाचा, मुळात हेतूशून्य आहे, हे त्याने सप्रमाण सिद्ध केले.

  अंतिम कारण (Final cause) अशीही एक संकल्पना होती. समस्येचे जिथे भौतिक समाधान नसायचे अशा प्रश्नांना डार्विनपूर्व शास्त्रज्ञ अंतिम कारणाचा टिळा लावून मोकळे व्हायचे. ‘विज्ञान जिथे संपते तिथे अंतिम कारण सुरु होते’ असे काही तरी ते होते. त्यातही भौतिक क्रियांच्या मागची करणे स्पष्ट होत होती. दगड पडतो, तो गुरुत्वाकर्षणामुळे आणि पाणी थंड होते ते त्यातील उष्णता आसपास पसरते म्हणून. पण जैविक क्रियांचा अन्वय लावणे अवघड झाले होते. मोराला पिसारा असतो आणि लांडोरीला नसतो. कारण, त्यांची संप्रेरके भिन्न भिन्न आहेत. हे झाले तात्कालिक कारण पण ती तशी का आहेत, हे कुणालाच ठाऊक नव्हते. हा प्रश्न मती गुंग करणारा होता. अशा प्रश्नात अंतिम कारण उपयोगी ठरे. कित्येक जैविक क्रिया तर हेतुतः होतात असे दिसतच होते. हृदयाचे कामच मुळी रक्त पंपणे आणि किडनीचे मूत्र तयार करणे, नाही का? हाच तर त्यांच्या अस्तित्वाचा अंतिम हेतू. पण हे अवयव ही मुळी उत्क्रांतीची देण, असे डार्विननी दाखवून दिले. हृदय विचारपूर्वक, हेतुतः रक्त पंपत नाही! आणि लघवी बनवण्यात किडनीच्या आयुष्याची इतिःकर्तव्यता नाही.

  अगदी प्लेटो, पायथॅगोरस पासून टायपोलॉजी/इसेन्शियालिझमची कल्पना घट्ट रुतून बसली होती. जगात सर्व जड वस्तू या विविध ‘प्रकारात’ (Types/Essences) मोडतात आणि हे प्रकार अपरिवर्तनीय आणि स्थिर आहेत, अशी ती कल्पना. जग म्हणजे या काही मर्यादित प्रकारांचीच विविध रूपे आहेत आणि हे प्रकार एकमेकांशी संपूर्ण फारकत बाळगून असतात. त्रिकोणाचेच बघा ना. त्याचा आकार लहान मोठा असेल पण काहीही असला तरी त्रिकोण तो त्रिकोण. तो चौकोन होऊ शकत नाही. शिवाय त्रिकोण आणि चौकोन यात मधलीअधली स्थिती नसते. अशाच काहीशा विचारातून मानवी वंशरचनेची मांडणी होत होती. कॉकेशिअन, आफ्रिकी, मंगोल हे वंश; त्यांची काही उतरंड आणि हे सारे कायमस्वरूपी आणि दैवदत्त असल्याची ठाम जाणीव प्रचलित होती. मानवी वंशांचीच सरमिसळ जिथे अशक्य मानली होती, तिथे नर आणि वानराचा पूर्वज एकच होता ही कल्पना कशी बरे पचावी? प्रत्येक प्रजाती ही स्वतंत्र आणि अन्यांशी कसलेही ऐतिहासिक नाते नसलेली मानली गेली होती. डार्विन विचारांनी ही रचना मोडून पडली. मधल्याअधल्यांना काही स्थान मिळाले. सजीव अपरिवर्तनीय ‘टाइप्स’ नाहीत आणि उच्चनीचही नाहीत, हे समजले.
  पण डार्विनचा सिद्धांत हाती पडताच टायपॉलॉजीवाले हरखून गेले. वंशवादाचे खणखणीत आणि शास्त्रीय समर्थन सापडल्याचा दावा केला जाऊ लागला. शिवाय जगण्याची जर स्पर्धा आहे तर त्यात काही मागे पडणारच, तेव्हा असे जगायला नालायक लोक हीन आहेत,असे समजणे चुकीचे कसे? ‘सोशल डार्विनझम’ नावे खपवला जाणारा हा युक्तिवाद, मुळातच डार्विनच्या सिद्धांताचा विपर्यास आहे. उलट डार्विनने टायपॉलॉजीला टांग मारून समूहकेंद्री दृष्टिकोन मांडला (पॉप्युलेशन थिंकिंग) असे अर्न्स्ट मायरने दाखवून दिले आहे. साऱ्या प्रजाती या एकमेवाद्वितीय अशा जीवांचे समूह आहेत. इथे धरतीच्या पाठीवर नांदणारे कोटी कोटी मानव आहेत, पण प्रत्येकजण ‘सर्वाहुनी निराळा’ आहे. फरक आहेत, ते तपशीलात. मुळात, सारे एक आहेत. वंशवादाचे समर्थन टायपॉलॉजीत सापडेल कदाचित, पण डार्विनिझममध्ये नाही.

  जगण्याची जर ‘स्पर्धा’ असेल तर प्रत्येक स्पर्धकाचं अ-हित हेच आपलं हित नाही का? आपल्याच भाईबंधांप्रती प्रेम, जिव्हाळा, त्यांचं लालन, पालन, पोषण म्हणजे स्वतःला वैरी निर्माण करणे नाही का? यावर बराच उहापोह झाला आहे. या अशा सहकार्यामुळे तो समूहच्या समूह/कुटुंब/प्रजाती तगायला मदत होते. इतकंच काय कुणाला किती सहाय्य करायचं याचंही गणित मनातल्या मनात मांडलेलं असतं. आधी सगे, मग सोयरे, मग जातभाई, मग अन्य काही, अशा क्रमानी उपकार केले जातात. पुढे कधीतरी परतफेडीच्या अपेक्षेनेही उपकार केले जातात. सबब, स्पर्धेसारखाच सहकार हाही उत्क्रांतीला उपकारक असू शकतो. समाज म्हणून जगू पहाणाऱ्या जीवांत; यात माणूस आहे, मुंग्या आहेत आणि इतरही बरेच कोणकोण आहेत; सहकाराला तरणोपाय नाही. म्हणजेच परोपकाराला उत्क्रांतीतत्वात स्थान आहे. सोशल डार्विनिझम आणि त्यातील टोकाच्या स्वार्थलोलूप वृत्तीचे, वंशवादाचे, उच्च नीचतेचे समर्थन हे डार्विन विचाराचे अपुरे आकलन आहे तर.


  सृष्टीचा प्रवास ‘त्याच्या’ देखरेखीखाली सतत कोणत्यातरी आदर्शवत अवस्थेकडे चालू आहे, अशी ग्रीक कल्पना होती. जीवाश्मांचा शोध लागत होता. ‘साध्याश्या’ जीवांपासून ‘गुंतागुंतीचे’ जीव अशी चढती भाजणी उत्क्रांत झालेली दिसत होती. पण डार्विन सांगत होता, उत्क्रांतीची वाटचाल कोण्या आदर्शाच्या दिशेने नसून; चुकतमाकत, अडखळत होणारा, निव्वळ जगण्याला, तगण्याला, अनुकूल बदल सामावून घेत जाणारा, तो एक संथ प्रवास आहे. सतत उत्कर्ष, सतत उत्तमाकडे वाटचाल असा तो मुळीच नाही. प्रजातींत होणाऱ्या बदलाची दिशा कोणी जगन्नियंता ठरवत नसून, ती नैसर्गिक निवडीच्या दाबदबावांमुळे आपोआप घडणारी क्रिया आहे. साधे जीव, अप्रगत आणि गुंतागुंतीची रचना असणारे, प्रगत; अशी कल्पना चुकीची आहे. जो जो, ज्या ज्या परिसंस्थेत जगतो आहे; तो तो, त्या त्या परिसंस्थेत जगायला सर्वात उत्क्रांत आहे म्हणूनच जगतो आहे.

  कोण्या सर्वात्मक सर्वेश्वराने, करुणार्णव करुणाकराने, सृष्टी निर्मिती केली म्हणावे तर या सृष्टीतील हीन पदोपदी अडचणीचे ठरत होते. जिवंतपणी दुसऱ्या जीवाचा घास करणारे परोपजीवी इथे होते. मग तो कर्ता प्रेमळ कसा? काळाच्या ओघात नष्ट झालेल्या कितीतरी बलदंड प्रजातींचे जीवाश्म सापडत होते. हा संहार त्या करवत्याच्या शांतीसंदेशाशी विसंगत नाही का? अपेंडिक्ससारखे आता अडगळ ठरलेले अवयव होते. मग त्याची निर्मिती परिपूर्ण कशी म्हणावी? वातावरणातील आणि परिसरातील बदलांना जुळवून घेत प्रजाती जगल्या होत्या, जगत होत्या. यात अपयश आले तर होत्याच्या नव्हत्या होत होत्या, अनुकूल बदल टिकणार, नाहीतर ती प्रजाती संपणार, हे चक्र तर अव्याहत होते. मग अंतिम हेतू नेमका कोणता? याउपरही विश्व काही हेतूने चालवले जात आहे असा दावा होता, आजही आहे. पण विज्ञान अशी कल्पना उराशी बाळगून नाही.


  सजीवांच्या सौंदर्याचे आश्चर्य मिश्रित कौतुक असते आपल्याला. त्यांच्या बिनतोड रचनेचे केवढे गारुड असते, आपल्या मनावर. जगदिशाच्या ऐशा लीला; त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का?; गंध का हासतो, पाकळी सारुनी... खुण घे जाणुनी, रूप हे ईश्वरी; अशी गाणी रचतो आपण. जगभरातल्या संस्कृतींनी आणि धर्मांनी, जीवांची गुंतागुंतीची रचना, हा तर ईश्वराच्या अस्तित्वाचा पुरावाच मानलाय. पण योगायोगाने घडणारे बदल, नैसर्गिक निवड आणि प्रचंड कालपट या योगे हे ईश्वराविनाही शक्य आहे हे सिद्धच केले डार्विनने. पण निसर्गात सौंदर्य आहे तसे क्रौर्यही अाहे. जेवढे सुस्वरूप आहे तेवढे कुरुपही आहे. निसर्गातील सौंदर्याची आणि क्रौर्याची डार्विननी एकाच फटक्यात मीमांसा मांडली. जे जे मंगल घडते ते सात्विक, सत् शक्तीमुळे आणि अमंगळ ते ते नाठाळ सैतानामुळे ही समज डार्विनच्या माऱ्यापुढे फारच बाळबोध ठरली.


  डार्विनने सर्व अतिनैसर्गिक शक्ती आणि कार्यकारणभाव प्रथमच मोठ्या ताकदीने नाकारले. या आधीही नास्तिकांनी हे सारे नाकारून झाले होतेच. पण या "नाही रे' वाल्यांना, ना विश्वोत्पत्तीचा थांग होता, ना जीवोत्पत्तीचा पत्ता. तेव्हा आहे विरुद्ध नाही ही फक्त शब्दबंबाळ लढाई होती. शिवाय "आहे रे' वाल्यांकडे अनेकानेक अनुत्तरीत, अनाकलनीय अशा निसर्गलीलांची जंत्री होती. डार्विनने जैववैविध्य, सजीव अन् परिसराचे तादात्म्य आणि त्यांची उत्पत्ती-स्थिती-लय असा मोठाच कूटप्रश्न अत्यंत जडवादी, भौतिक दृष्टिकोनातून सोडवून दाखवला. देशोदेशीच्या विविध जीवोत्पत्ती कथा या प्रत्यक्षातल्या निसर्गवाचनाशी मुळीच सुसंगत नाहीत, हे त्यानी दाखवून दिले. अचानक देवाची गरजच संपली. एकूणातच डार्विनने निदान विज्ञानातून तरी देवाला आणि सैतानालाही हद्दपार करून टाकले. बुद्धिप्रामाण्यवादाला आता वादातीत महत्व आले.
  पण डार्विनची सगळ्यात मोठे काम कोणते असेल, तर त्याने माणसाला सिंहासनभ्रष्ट केले. अर्थात हे सिंहासन माणसानेच स्वतःसाठी घडवले होते आणि मोठ्या ऐटीत तो त्यावर विराजमान होता. देवाच्या या लाडक्या लेकराला खाली खेचून इतर जीवांच्या पंक्तीला बसवले ते डार्विनने. आधुनिक जीवशास्त्र कोणत्याही जीवाला कमी लेखत नाही. उलट चार क्षुल्लक प्राण्यांपेक्षा आपण कोणी खास आहोत, सारी सृष्टी ही देवाने आपल्या करमणुकीसाठी आणि खाण्यापिण्याची सोय म्हणून उत्पन्न केली; सबब माणूस सोडता अन्य जीव नीच आणि माणूस, देवदूत, देव अशी पुढे चढती भाजणी अशी बऱ्याच धर्मांची मांडणी आहे. ती किती कोती आहे हे उत्क्रांतिवाद दाखवून देतो. माणूस म्हणून आपण फार माज टाकायची काही गरज नाही. ‘मानवाचे अंती गोत्र एक’ ही भावना उदात्त आहेच, पण उत्क्रांतीची, ‘सजीवांचे अंती गोत्र एक’, ही भावना तर त्याहीपेक्षा उदात्त आहे.


  अर्थात माणूस हा प्राणीच असला तरी इतर अनेक अर्थानी प्राणीसृष्टीत आगळा वेगळा आहेच. बुद्धिमत्ता अनेकांकडे आहे पण माणसाचे बुद्धिवैभव अन्योन्य. भाषा तर साळुंक्याही बोलतात, पण व्याकरण आणि अन्वयार्थ असणारी माणसाची बोली अन्योन्यच. इतकेच काय नीती आणि रीतीभाती असणारी समृद्ध संस्कृती हादेखील मानवी करिश्मा. या साऱ्यामुळे माणसाचे स्थान अन्य सजीवांपेक्षा वेगळे आहे खास, पण ते अन्यांपेक्षा उच्च खासच नाही.


  आज जग भलतेच बदलले आहे आणि या बदलाला विज्ञान आणि तंत्रज्ञान कारणीभूत आहे. पण यातही डार्विनविचाराचा हिस्सा ललामभूत आहे हे आपल्या लक्षातही येत नाही. आजच्या जीवशास्त्रातल्या गाभ्याच्या कल्पना देणारा आणि हे कसे घडत असावे, याचा अचूक अंदाज देणारा डार्विन होता. कितीतरी प्रचलित समजुतींना त्यांनी धक्का दिला, कित्येक नेस्तनाबूत झाल्या, कित्येक नव्या कल्पना त्याने पेरल्या; त्या रुजल्या, वाढल्या, फोफावल्या. जीवशास्त्रात तर डार्विनची प्रभा डोळे दिपवून टाकते. आज तत्वज्ञानापासून ते मनोव्यापारापर्यंत आणि समाजशास्त्रापासून ते खगोलशास्त्रापर्यंत त्याच्या विचाराशलाका मार्ग दाखवत आहेत. डार्विननी माणसाचा स्वतःकडे आणि सृष्टीकडे पहाण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. या विश्वाकडे पहाण्याचा भव्योत्कट, विनम्र, विस्मय ही डार्विन विचाराची खरी देण आहे...


  डॉ. शंतनू अभ्यंकर
  shantanusabhyankar@hotmail.com

Trending