आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेग्नन्सी आणि विमान प्रवास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणे एके काळी निव्वळ श्रीमंतांची मक्तेदारी असलेला विमान प्रवास हा आता नित्याचा झाला. त्यामुळे कोणे एके काळी निव्वळ गुळगुळीत कागदाच्या मासिकातच छापला जाईल असा हा लेख आज न्यूजप्रिंटवर छापला जातो आहे. बदलत्या भारताची ही एक हलकीशी खूण.


गर्भावस्थेत विमान प्रवासाने काही त्रास होतो का?
सारे काही यथास्थित आणि साधे सरळ असेल तर विमानप्रवासासारखा सुरक्षित प्रवास नाही. यात होणारे हवेच्या दाबातील आणि आर्द्रतेचे बदल काहीही दुष्परिणाम घडवत नाहीत. विमान प्रवासाने गर्भपात, कमी दिवसांची प्रसूती, पाणमोट फुटणे वगैरे प्रकार होत नाहीत. अर्थात शहाणी पोटुशी बाई दिवस भरायच्या आत कुठे ती भरारी घेऊन टाकेल. जुळेबिळे असेल तर ३२ आठवड्यांच्या आत विमानोड्डाण उरकावे हे उत्तम. दिवस भरलेल्या, अवघडलेल्या, बाईला बहुतेक विमान कंपन्याच प्रवासी म्हणून घेत नाहीत. शिवाय इतक्या अवघडलेल्या बाईची जोखीम इन्शुरन्स कंपन्याही, कचकावून पैसे घेतल्याशिवाय, स्वीकारत नाहीत.


सदतीस आठवडे झाले की कायद्याने दिवस भरतात. त्यापुढे केव्हाही कळा सुरू होऊ शकतात. प्रत्यक्षात तारीख दिलेली असते ४० आठवडे पूर्ण झाल्याची. ही तारीख म्हणजे त्याच दिवशी प्रसूती होईल याची भविष्यवाणी म्हणून दिलेली नसते. प्रसूती नेमकी कधी होणार हे डॉक्टरनाच काय, ब्रह्मदेवाच्या बापालाही सांगता येणार नाही, असे म्हणतात, ते खरे आहे. प्रसूतीची तारीख म्हणजे बाळ पोटात सुरक्षित असण्याचा शेवटचा दिवस. तिथून पुढे वार म्हातारी होते, तिच्याच्याने बाळाचे सगळे ‘होत नाही’. त्यामुळे वाट पाहायची वा नाही, आणि पाहायची तर किती, हे तपासून ठरवावे लागते.


लांबच्या प्रवासात विशेष काळजी घ्यावी लागते, पण तीन ते चार तासांच्या प्रवासात काही विशेष फरक पडत नाही. प्रवासाने किरकोळ त्रास होतो. जो एरवीही होतो, तो गरोदरपणात जास्त होतो. पाय सुजतात, नाक चोंदते, कानाला दडे बसतात. आधीच उलट्यांनी जेरीस आलेली कोणी असेल तर ती अधिक जेरीस येते. 


प्रवासात पायात रक्त साठून राहते, याच्या गुठळ्या होतात आणि एखादी गुठळी तिथून सटकली की थेट फुप्फुसापर्यंत पोहोचते. हे जिवावर बेतू शकते. मुळातच गरोदरपणात आणि पुढे प्रसूतीपश्चात दीड महिन्यापर्यंत रक्त गोठण्याची क्रिया जलद होत असते. त्यात प्रवासात एका जागी बसल्याने रक्तप्रवाह मंदावतो आणि आणखी प्रॉब्लेम येतात. लांबचा प्रवास असेल, वजन जास्त असेल, आधी कधी असला काही प्रकार झाला असेल, तर आणखी प्रॉब्लेम येतात. तेव्हा सैल पेहराव असणे, बूटही योग्य मापाचे असणे, शक्यतो पॅसेजकडची सीट घेऊन पाय जवळ-लांब करणे, सतत पाय हलवण्याचे बसल्या जागीही करता येतील असे व्यायाम करणे, शक्य तितक्या फेऱ्या मारणे, भरपूर पाणी पिणे आणि दारू, कोला, कॉफी अशी अपेय पेये न पिणे, हे आवश्यक आहे. प्रवासात वापरण्यासाठी पायाच्या बोटापासून जांघेपर्यंत येणारे खास मोजे मिळतात. हे पावलाला आवळून बसतात आणि जसजसे वर जाऊ तसतसा आवळपणा कमी होतो. जांघेशी हे त्या मानाने सैलसर बसतात. यामुळे पाऊल, पोटरी, मांडी येथे रक्त साठून राहत नाही. हेही वापरता येतील. पण यांचे माप परफेक्ट असायला हवे. प्रत्यक्ष घालून बघूनच खरेदी केलेले चांगले. ऑनलाइन मागवण्यात काही अर्थ नाही.


काहींना, काही आजारामुळे, ही गुठळ्या होण्याची शक्यता फारच असते. अशांसाठी हिपॅरीनचे इंजेक्शन आहे. याने रक्त सहज गोठत नाही. (पेशंटच्या भाषेत, ‘रक्त पातळ होण्याचे इंजेक्शन’.) हे उड्डाणावेळी आणि नंतर काही दिवस घ्यावे लागते. इंजेक्शन सोबत न्यायचे तर त्याचे प्रिस्क्रिप्शनही सोबत हवे हे लक्षात असो द्यावे. ‘रक्त पातळ’ होण्यासाठी अॅस्पिरीनच्या गोळ्याही दिल्या जातात. प्रवासात जो त्रास होतो तो अॅस्पिरीननी टळत नाही. तेव्हा हिपॅरीन सांगितले तर घ्यावेच घ्यावे, पण अॅस्पिरीन चालू असतील तर त्याही चालूच ठेवाव्यात. 
कमी दिवसांची प्रसूती होईल असे वाटत असेल, रक्त खूपच कमी असेल, सिकलसेल आजारामुळे नुकताच काही त्रास झाला असेल (याला सिकलसेल क्रायसिस म्हणतात. आपल्याकडे विदर्भात सिकलसेलचे प्रमाण फार), वार खाली असेल (Placenta Previa) तर विमानप्रवास टाळणे उत्तम. काही कंपन्या नुकतेच हाड मोडलेले, नुकतेच कान फुटलेले किंवा नुकतीच पोटाची शस्त्रक्रिया झालेले प्रवासी घेत नाहीत. असे काही असेल तर आधीच विचारणा केलेली बरी. पहिल्या तीन महिन्यांत सुमारे १५ ते २०% गर्भ ‘खाली होतात’. म्हणजे गर्भपात होतात. हे केव्हाही होऊ शकते. त्यामुळे यादरम्यान अत्यावश्यक असेल तेव्हाच प्रवास करावा.  निघण्यापूर्वी आणि पोहोचल्यानंतर, सारे काही जिथल्या तिथे आहे याची खात्री करण्यासाठी सोनोग्राफी केलेलीही बरी. कारण प्रवासानंतर काही बिघडले की ते प्रवासाआधीचे की नंतरचे यावरून सासर वि. माहेर असे यादवी युद्ध पेटू शकते.  विमानतळावरील नेहमीची सुरक्षाचाचणी बाळासाठी निर्धोक असते, त्यात एक्सरे वापरात असले तरीही. सीटबेल्ट लावणेही आवश्यक आहे. पुरेसा घट्ट आणि पोटाच्या खाली बसेल असा तो लावावा.  शेवटी प्रवास आवश्यकच आहे का? प्रवासाने काही बिघडणार आहे का? इन्शुरन्सवाले काय म्हणतात? हे प्रश्न महत्त्वाचे. बरोबर आपले सर्व केसपेपर, औषधे, प्रिस्क्रिप्शने, फिटनेस सर्टिफिकेट, ड्यू डेट सर्टिफिकेट, इन्शुरन्स वगैरे असावे. शुभास्ते पंथान: सन्तु।।
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई
shantanusabhyankar@hotmail.com

बातम्या आणखी आहेत...