आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडिया आणि ग्रामीण स्त्रिया

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. सुनीता बोर्डे

एखाद्या उत्पादनाची माहिती घेण्यासाठी नवीन तंत्र शिकण्यापासून ते पुढे जात आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्यापर्यंतच्या विविध टप्प्यांवर ग्रामीण स्त्रिया सोशल मीडियाचा वापर करीत आहेत. शहरी स्त्रिया माहिती,  ज्ञान आणि  मनोरंजनासाठी सोशल मीडिया वापरताना दिसतात, तर ग्रामीण भागातील स्त्रिया मनोरंजनापेक्षा व्यवसाय, उत्पादन, वितरण अशा बाबींची माहिती घेण्यासाठी या माध्यमाचा वापर करतात.
औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील धामोरी खुर्द हे छोटंसं गाव.. जानकीदेवी बजाज समाजसेवा केंद्राच्या अनिता वानखेडे यांच्याभोवती जमलेला महिलांचा समूह.. त्यातली एखादी म्हणते, ‘मॅडम, आम्हाला पापडाच्या मशीनचा यूट्यूब विड्यो दाखवा.’ दुसरी म्हणते, ‘खारीक-खोबरं कांडप मशीन कशी चालाती, त्याचा विड्यो दाखवा..’ अशा मशीन कशा प्रकारे चालवायच्या याची माहिती प्रत्यक्ष पाहून, समजून घेण्याच्या उत्सुकतेने अनिताताईंच्या आसपास बसलेल्या अकरा महिला म्हणजे ग्रामीण भागातील महिला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडल्या जात असल्याचे आश्वासक चित्र! सोबतच ‘आधार स्वयंसहायता’  बचत गटाचा हा  प्रयोग एक वेगळा प्रयोग आहे. कुणी कर्जाला कंटाळलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची विधवा पत्नी, कुणाचा पती अपघातात, कुणाचा आजारात तर कुणाचा आत्महत्येमुळे जग सोडून गेलेला. अशा अकरा विधवा स्त्रियांचा हा गट आहे. इतरही गावांत अनिताताईंनी संघटित केलेली विधवा स्त्रियांच्या संघटनाची बचत गटांची ही चळवळ आणि त्याला मिळालेली सोशल मीडियाची जोड, हेच अधोरेखित करते की, ग्रामीण स्त्री काळानुरूप स्वतःला नवीन बदलांना सामोरे जाण्यासाठी हळूहळू तयार करत आहे. व्हॉट्सअॅप ग्रुपसारख्या समाज माध्यमातून ग्रामीण स्त्रिया आता संघटित होऊ लागल्या आहेत. एकमेकींशी संवाद साधू लागल्या आहेत. आजची ग्रामीण स्त्री ही बदलांच्या नव्या आव्हानांना अत्यंत समर्थपणे सामोरे जात आहे. दिवसेंदिवस स्मार्टफोनच्या किमती सर्वसामान्य लोकांच्याही आवाक्यात येत आहेत. परिणामी गावात अगदी झोपड्यांपर्यंत अन् वाड्या-वस्त्यांपर्यंत स्मार्टफोन पोहचले आहेत. ग्रामीण भागात स्त्रियांच्या बाबतीत स्मार्टफोन वापरण्याचे दोन प्रकार पडतात. एक स्वतःच्या मालकीचा आणि दुसरा म्हणजे मुलगा, पती यांच्या फोनच्या माध्यमातून समाज माध्यमांचा वापर करणाऱ्या स्त्रिया! स्वतःचा फोन  असलेल्या स्त्रिया, यात प्रामुख्याने वय वर्षे अठरा ते तीस या स्त्रियांचा समावेश होतो. व्हॉट्सअॅप आणि फेसबुक या लोकप्रिय समाजमाध्यमांबरोबरच, ग्रामीण स्त्रियांमध्ये लोकप्रिय असणारा एक घटक म्हणजे यूट्यूब! रात्री जेवण झाल्यानंतर गप्पा मारत बसणारी आजी नातवाला सहजच एखाद्या कीर्तनाचा यूट्यूबवरील व्हिडिओ लावण्याचा आग्रह करते, जमलेल्या बायका कीर्तन बघतात. एखाद्या उत्पादनाची माहिती घेण्यासाठी, नवीन तंत्र शिकण्यासाठी, आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी अशा विविध टप्प्यांवर ग्रामीण स्त्रिया सोशल मीडियाचा वापर करताना दिसतात. तुलनात्मदृष्ट्या बघितले तर शहरी स्त्रिया माहिती, ज्ञान आणि मनोरंजनासाठी या मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसतात, तर ग्रामीण स्त्रिया मनोरंजनापेक्षा व्यवसाय, उत्पादन, वितरण अशा बाबींची माहिती घेण्यासाठी त्याचा वापर करतात. भाजीवाल्या मावशीने तीन वर्षांपूर्वी छोटा टेम्पो घेऊन आपला व्यवसाय वाढवला आहे. एक दिवस भाजी घेताना ती म्हणाली,‘मॅडम, तुमचा व्हॉट्सअॅप नंबर द्या. मी म्हटलं, ‘तुमच्याकडे आहे ना माझा नंबर..’ तर ती म्हणाली,‘व्हॉट्सपवाला नंबर द्या, म्हंजी रोज सकाळी सकाळी तुम्हाला ताज्या ताज्या भाज्यांचा फोटो टाकत जाईन. तुम्हाला पाहिजे ती भाजी मिळेल.’ हे ऐकून मला खूप आनंद झाला. ग्रामीण स्त्रिया सोशल मीडियाचा किती प्रभावी आणि विधायक वापर करू शकतात, हे पाहून माझा स्त्रियांच्या क्षमतेवरचा विश्वास आणखीच दृढ झाला. भारतात मोठ्या संख्येने असलेल्या ग्रामीण, बहुजन, दलित स्त्रिया या बदलांना कशा प्रकारे प्रतिसाद देतात, त्यांच्या समस्यांचे वेगळेपण नेमके काय आहे, या गोष्टी बऱ्याचदा मुख्य प्रवाही स्त्री चळवळीकडून दुर्लक्षित राहतात. ग्रामीण स्त्रीया या नव्या जगातील, नव्या बदलांना सकारात्मक प्रतिसाद देत, बदलाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. 

संपर्क-९४०५२८६११४

बातम्या आणखी आहेत...