आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रांगोळीचे शंकरपाळे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. सुषमा ठोंबरे

कामाची सवय प्रत्येकीला असतेच असं नाही. त्यातून दिवाळीचा फराळ म्हणजे तर तिथे ‘ पाहिजे जातीचे ’अशीच माणसं हवी. मात्रं हौसेनं कुटुंबासाठी एका सुनेनं शंकरपाळे करण्यासाठी कंबर कसली. पण तिला मदत करणाऱ्या सदस्याच्या नजरचुकीमुळे मोठाच घोळ होऊन बसला...
 
माझं वैद्यकीय शिक्षण औरंगाबादला झालं असलं तरी सासर ग्रामीण भागातले होते. आमचं एकत्र कुटुंब असल्यामुळे मला दिवाळीचा फराळ कधी करावाच लागला नाही. तसा तो येतही नव्हता. माझ्या दोन्ही जावा उत्तम स्वयंपाक करायच्या. बोलता बोलता एकदा शर्यत लागली की मी शंकरपाळे करून दाखवायचे. मग काय, मी मोबाइलवर ‘मधुराज रेसिपी’ सर्च केले. सर्व तयारी केली. मदतीला जाऊबाईंचा नऊ वर्षांचा मुलगा तानू होताच. मी सांगायचं आणि तानूने मोजून सामान द्यायचे असे सुरू होते. परातीत मैदा घेतला. मोहन घातले. नंतर तानूला दोन वाट्या पिठीसाखर दे, असं मी सांगितलं. त्याच वेळी माझी पुतणी कोमल दारात रांगोळी काढून आलेली होती. तिनं तिच्याकडची पांढऱ्याशुभ्र रांगोळीची वाटी खाली ठेवली आणि निघून गेली होती. तानूनं तीच वाटी घेतली आणि त्यातली दोन वाट्या रांगोळी मला मोजून दिली. मी ती रांगोळी मैद्यात टाकून मस्तपैकी मैदा मळून घेतला. एक तास ते मिश्रण भिजत ठेवले आणि नंतर शंकरपाळे तळून घेतले. डॉक्टर सून, काकू आणि बायको अशा भूमिकेतून बाहेर येऊन एका गृहिणीने केलेले ते शंकरपाळे चाखण्यासाठी सगळं कुटुंब एकत्र जमलं. थोरल्या दिरानं एक शंकरपाळा तोंडात टाकला आणि त्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला. 

‘अगं, खडे टाकलेत की काय याच्यात? गोड चव तर काहीच लागत नाहीए’ म्हणत त्यांनी तोंडातला शंकरपाळा थुंकून टाकला. मग तिथं असलेल्या प्रत्येकानं एक एक शंकरपाळा तोंडात टाकून चव चाखली. त्यानंतर प्रत्येक जण एकानंतर एक थुंकण्यासाठी बाहेर पळाला. माझ्याकडून झालेली गफलत लक्षात आली आणि तिथं एकच हशा पिकला. 

‘बघा हं, डॉक्टर बायको हवी असेल तर असेच शंकरपाळे खावे लागणार,’ थोरल्या जावेनं माझ्या नवऱ्याला टोमणा मारला. मी इतकी हिरमुसले की विचारू नका. आजही शंकरपाळे पाहिले की मला तर हा प्रसंग आठ‌तोच, पण घरातला प्रत्येक जण, ‘डॉक्टर काकूंचे रांगोळीचे शंकरपाळे खाणार का?’ असं विचारून चेष्टा करतात.

लेखिकेचा संपर्क : ८४११८३३८८५

बातम्या आणखी आहेत...