आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थानी सौहार्दाचा गुलाब-गंध...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर भारतातल्या गंगेच्या खोऱ्यापासून सुरू झालेला गंगा-जमनी सौहार्द-प्रवाह खाली उतरत राजस्थानात येऊन आपले अस्तित्व राखतो. पुष्कर आणि अजमेर ही इथली शेजारगावं. तिथे पिढ्यांपासून आकारास आलेले व्यापार-व्यवहार सौहार्दपूर्ण सहजीवनाचं ठसठशीत प्रतीक ठरतात...


‘पधारो म्हारो देस’ म्हणत पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या राजस्थानमधील प्रत्येक जिल्ह्याचे स्वत:चे वेगळे सौदर्य-वैशिष्ट्यं आहे. एखादा जिल्हा लाल संगमरवरासाठी तर एखादा पिवळ्या संगमरवरासाठी प्रसिद्धी मिळालेला. एखादा ‘सुवर्ण नगरी’ तर एखादा ‘गुलाबी नगरी’ म्हणून ओळखला जाणारा. प्रत्येक जिल्ह्यात नरजेत न मावू शकणारे भव्यदिव्य किल्ले (गढ़) आणि प्रशस्त हवेल्या, इथल्या ऐतिहासिक वैभवाची ओळख सांगतात. त्यात भौगोलिकदृष्ट्या ‘हरियाली’ असणारा प्रांत म्हणजे, ‘मेवाड़’ आणि शेखावटीतील काही भाग. उर्वरित राजस्थानात पाण्याचा अभाव असण्याचा इतिहास आहे. संगीत, लोककला, सौंदर्य आणि सर्व प्रकारच्या हस्तकलेत राजस्थानची गणना श्रीमंत-समृद्ध राज्यांत होते. ‘अजमेर’ हा त्याच श्रीमंतीचं एक पान. अरावलीच्या कुशीत वसलेल्या ह्या बहुधार्मिक सर्वसमावेशक शहरात भारतीय पर्यटकांचे मुख्यत: दोन आकर्षण बिंदू असतात. एक म्हणजे, भारतातील एकमेव ब्रम्हमंदिर असलेले ‘पुष्कर’ आणि दुसरे ख्वाजा मोईउद्दीन हसन चिश्ती (गरीब नवाज़) या सुफी संताचा ‘दर्गा’. 


दर्ग्याला मन्नतीसाठी येणाऱ्या जायरिनांमध्ये (भाविक) मुस्लिमांपेक्षा हिंदूंची संख्या अधिक असते. अजमेरचा दर्गा ही स्थानिकच  नव्हे, देशाची ‘साझी विरासत’ आणि गंगा जमनी तहजीबचं गौरवशाली प्रतीक आहे. दर्ग्यासंबंधी उर्स असो वा हिंदू सण-समारंभाची तयारी सर्व बैठकांमध्ये सर्व समाजाची उपस्थिती असते. त्याची कारणे धार्मिक सहिष्णुतेइतकीच आर्थिक परस्परावलंबनाची आहेत. दर्गा परिसरातील सर्व हिंदू दुकानदारांची सुरुवात आणि शेवट दर्ग्यापुढे ‘चावी’ टेकवूनच होते. कोणत्याही जाती-धर्मियांच्या जीभेवर ‘ख्वाजा की कसम’ हे आपल्या मराठमोळ्या ‘आई-शप्पथ’सारखं असते. तबर्रुख, दस्तारबंदीच्या परंपरा हिंदूंच्याही अंगवळणी असतात. अजमेरचा दर्गा हा मनोकामना पूर्ण करतो असे मानले जाते. म्हणूनच तर येथे सिनेतारकांची मांदियाळी आवर्जून दिसते. राष्ट्रपती, पंतप्रधान, देशातील सर्वच राजकीय पुढाऱ्यांच्या चादरी येथे नियमाने येतात आणि सर्वांचेच ‘चिश्ती’ वा ‘खादीम’ ठरलेले असतात.


पुष्कर अजमेरपासून अवघ्या तेरा किलोमीटर अंतरावर आहे. जगत निर्मात्या ब्रह्माला पृथ्वीतलावरील सर्वांत अधिक भावलेले ठिकाण म्हणून पुष्करची आख्यायिका आहे. पुष्करचा ‘गुलाब’ ब्रह्माच्या येथील वास्तव्याचे आणखी एक कारण सांगितले जाते. मंदिरापासून थोडे दूर, रेल्वे लाइन ओलांडून, गावात गेल्यावर गुलाबाचा सुगंध आसमंतात भरून राहिल्यासारखा जाणवतो. हा सुगंध अनुभवल्यावर ‘पुष्कर’सारखा गुलाब भारतात कोठेही होत नाही, हे स्थानिकांचे म्हणणे मनोमन पटायला लागते. मध्य भागातील सुपीक जमिनीवर घेतले जाणारे हे येथील प्रमुख व्यावसायिक पीक आहे. पुष्करची जमीन, हवा-पाणी आणि भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे येथील गुलाबाचे स्वत:चे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. शेकडो टन गुलाब येथून रोज अजमेरला येतो. येथून देशभरातील बहुतांशी ठिकाणी गुलाबाची निर्यात होते.आखाती देशात अंत्यविधीच्या ‘सुपुर्त ए खाक’च्या विधीला मोठ्या प्रमाणात सुकलेल्या गुलाब पाकळ्या वापरतात. त्याची निर्यातही येथूनच होते. 
पुष्करमध्ये पूर्वी अनेक गावांमध्ये गुलाबापासून गुलाबपाणी बनवण्याच्या घरगुती ‘मांडण्या’ म्हणजेच ‘भट्ट्या’ होत्या. भट्टी लावून गुलाबपाणी बनवण्याचे एक तंत्र आहे. पाण्याचे ‘ऊर्ध्वपतन’ हे त्यामागील विज्ञान. याच सूत्रातून पूर्वी अत्तरदेखील तयार केले जायचे. पुष्करमधील अत्तराचा व्यवसाय जवळ-जवळ नामशेष झाला आहे. अत्तरांचे ‘पारखी’ आणि ‘शौकिन’ दोन्हीही कमी झाल्याचे ते लक्षण म्हणावे लागेल. पुष्करने आपलं ‘गुलाबपाणी’ आणि ‘गुलकंद’ मात्र जपून ठेवलं आहे. 


घाटीमधल्या  माळी  समाजाचे  प्राबल्य असणाऱ्या काही गावांमध्ये गुलाबपाण्याचे, गुलकंदांचे कारखाने दिसतात. पुष्करमधील बासेली, गनाहेड़ा, कोठी ही गावे यासाठी अधिक प्रसिद्ध आहेत. गुलाबपाणी वा अत्तर बनवण्याची प्रक्रिया मोठी जिकिरीची असते. वेळेचे त्यात फार महत्त्व असते. सूर्योदयापूर्वी गुलाब झाडावरून तोडले जाणे गरजेचे असते. पहाट होण्यापूर्वी गुलाबात मिळणारा ‘दव’ हा सगळ्यात मोठा कार्यकारक घटक असतो. शिवाय भट्टीचा जाळ किती प्रमाणात, किती वेळ ठेवायचा, कोणत्या क्षणाला तो कमी करायचा, हे सर्व विज्ञान आहे. ‘गुलकंद’ बनवण्याची प्रक्रिया ही त्या मानाने सुटसुटीत आहे. गुलाबाच्या पाकळ्या सुकवून त्याची देशांतर्गत आणि बाहेरही निर्यात करणे हा येथील आणखी एक व्यवसाय. अजमेरच्या दर्ग्यामुळे राजस्थानामधील आणि देशातील बहुतांशी सुफी संतांचे दर्गे एकमेकांना जोडले गेलेले आहेत. सर्व दर्ग्यांना जोडणारी ‘ऑल इंडिया सुफी सज्जादानशीन परिषद’ आहे. पुलवामाच्या हल्ल्यानंतर देशभरातील दर्ग्यांमधून शांतता, देशभक्ती आणि बंधुभावाचा संदेश दिला जावा, असा ठराव परिषदेमार्फत नुकताच पास करण्यात आला होता. अजमेरच्या दर्ग्यावर पुष्करचा गुलाब चढवला जातो आणि दर्गा परिसरातून पुष्करला पूजेची सामग्री जाते. रजमानच्या काळात काही हिंदू रोजा सोडण्यासाठी दर्ग्यात जातात. संघाचे विजयादशमीचे संचलन असो वा सिंधी समाजाचा चेट्रीचंडचा उत्सव, प्रत्येक हिंदू सणाच्या मिरवणुकीला दर्ग्यातील सज्जादान सामोरे जातात, फुले उधळतात. अजमेरच्या बॉम्बस्फोटाने एकदा परिस्थिती चिघळली होती, मात्र तरीही माणुसकीचे चिरे अभेद्यच आहेत. अजमेर हे सहजीवन आणि सहिष्णुतेचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे.


गुलकंद आणि गुलाबपाण्याबरोबरच अजमेरमधील आणि राजस्थानच्या काही जिल्ह्यांमध्ये आढळणारा आणखी एक प्रसिद्ध पारंपरिक व्यवसाय म्हणजे, ‘गोटा वर्क. राजे-रजवाड्यांच्या काळापासून या कलेला मागणी असल्याचे आपल्याला निरनिराळ्या संग्रहालयांत जतन करून ठेवलेल्या पोशाखांवरून लक्षात येते. प्राचीन काळापासून राजस्थान हे हस्तकलेसाठी प्रसिद्ध आहे. सोने-चांदी आणि मौल्यवान रत्नांचा वापर करून वस्त्रांवर विणलेले नक्षीकाम म्हणजे ‘गोटा-वर्क’. संस्थानिकांच्या काळात ‘गोटा’ वर्क हे मुख्यत्वे सोन्या-चांदीच्याच धाग्याने बनवले जात असे. कालांतराने त्यात तांबे आणि आता पॉलिस्टर धाग्याचा वापर सुरू झाला. अजमेरमधील जवळपास पाचशे कुटुंबीय या कुटीर उद्योगात आहेत. रावतनगर येथे ‘गोटा कॉलनी’ आहे. येथे केवळ हाच उद्योग करणारी कुटुंबे राहतात. कुटुंबातील पुरुष हे मुख्यत: या व्यवसायात असले तरी  महिला आणि मुलांचाही तितकाच महत्त्वपूर्ण सहभाग असतो.‍ दक्षिण भारतातील स्थलांतरितांकडून मुगलांच्या काळात उदयास आलेली ही कला असल्याचे सांगितले जाते. संपूर्ण राजस्थानात गोटावर्कच्या उद्योगात हिंदू-मुस्लिम समूहांतील काम करणाऱ्या कारागिरांची संख्या जवळपास सारखीच आहे. अजमेरमध्ये हिंदू कारगिरांची तर नागौर जिल्ह्यांत मुस्लिम कारागिरांची संख्या अधिक आहे. व्यापारामध्ये मात्र हिंदू आणि जैन धर्मीयांचे प्राबल्य दिसून येते. कारागीर आणि व्यापारी यांच्या व्यवहारात जात-धर्म आडवा येत नाही. जीएसटीच्या विरोधात बाजू मांडताना व्यापाऱ्यांनी कारागिरांच्या दृष्टीने अधिक विचार केल्याचे तत्कालीन परिस्थितीत दिसून आले होते. 


गोटा वर्कची मागणी संपूर्ण भारतातच नव्हे, तर भारताबाहेरही प्रचंड आहे. मुख्यत्वे लग्नसराईमध्ये या उत्पादनाची अधिक मागणी असते. आषाढी एकादशीपासून (देवशयनी ग्यारस) ते तुळशी विवाहापर्यंत (देवउठनी ग्यारस) मंगलकार्य होत नसल्याने याची मागणी कमी होत जाते. तुळशी विवाहापासून उद्योग पुन्हा सुरू होतो. अजमेरहून मुख्यत्वे सुरत, मुंबई आणि अहमदाबाद, तर निर्यातीच्या बाबतीत इराण, इराक आणि पाकिस्तान येथे मुख्यत्वे  व्यापारी देवाण-घेवाण होते. राजस्थानची अर्थव्यवस्था ही पर्यटनकेंद्री आहे. राजस्थानचा माणूस हा कष्टाळू, मनमिळाऊ, कसबी, हरहुन्नरी आहे. चित्रकला, शिल्पकला, कशिदावर्क, गालिचे, लाकडावरील कलाकुसर, उंटाच्या हाडांपासूनची आभूषणे, चामड्याच्या वस्तू, लाखेच्या बांगड्या सारेच विलोभनीय आणि विस्मयकारी. संगीत आणि नृत्याशिवाय येथील लोकजीवन अपूर्ण आहे, तर दुसरीकडे, शिक्षणाचा अभाव, रूढी-परंपरेचे प्राबल्य, बळकट जातीय व्यवस्था, पारंपरिकता आणि आधुनिकतेचा संघर्ष यातील अवस्थांतर हेदेखील येथील समाज अभ्यासकांच्या चिंतेचे विषय आहेत.  


डॉ. स्वाती अमराळे-जाधव
swasidha@gmail.com
(लेखिका सामाजिक विषयाच्या अभ्यासक आहेत. संपर्क : ८८३०९७९८७२)

बातम्या आणखी आहेत...