Home | Magazine | Rasik | dr swati amrale jadhav rasik article

उपजत शहाणपणाचा वाळवंटी वारसा

डॉ. स्वाती अमराळे-जाधव | Update - Mar 17, 2019, 12:03 AM IST

उंट, तलाव, खेजडी, जोहड आणि कलमकारी-दस्तकारी यासारख्या गोष्टी राजस्थानच्या समृद्ध परंपरेचे अंग राहिलेले आहेत.

 • dr swati amrale jadhav rasik article

  उंट, तलाव, खेजडी, जोहड आणि कलमकारी-दस्तकारी यासारख्या गोष्टी राजस्थानच्या समृद्ध परंपरेचे अंग राहिलेले आहेत. राजस्थान आधुनिकतेकडे वळताना या पारंपारिक गोष्टी निव्वळ संग्रहालय , लोकस्मृती अथवा पुस्तकांच्या पानांमध्ये राहू नयेत...


  राजस्थान म्हटलं की, वाळवंटाच्या पार्श्वभूमीवर पारंपारिक वेशभूषा, साज-शृंगार आणि घुंगट घेतलेल्या स्त्रिया, पांढरे धोतर, अंगरखा आणि सफेद किंवा रंगीत असा डोक्यापेक्षाही मोठा बांधलेला फेटा घातलेला पुरुष, सोबत अथवा पाठीमागे उंट असे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. कित्येक जणांची राजस्थानबाबतची दृश्यात्मक ओळख वाळवंट, उंट आणि पाण्याचा दुष्काळ एवढ्या पुरतीच सीमित असते. त्यामुळेच की काय वाळंवट आणि उंट हे पर्यटकांच्या आकर्षणांपैकी महत्वाचे घटक असतात. प्रत्येक भूभागाचे वैशिष्ट तेथील परिसर, परंपरा, जीवसृष्टी आणि जीवन व्यवहारांना कवेत घेणारे असते. राजस्थानातील उंट आणि वाळवंट हे देखील असेच अनुपम जीवनसृष्टीचे उदाहरण. ‘उंट वाळवंटातील जहाज आहे’ हे तर आपण भूगोलात शिकलेलो आहोत. भारताप्रमाणेच जगभरातील वाळवंटी प्रदेशात प्रवासासाठी, मालवाहतूकीसाठी उंट हा उपयुक्त पशु ठरल्याच्या नोंदी आहेत.


  मैलो न्् मैल प्रवास करताना प्रदीर्घ काळ पाण्याशिवाय टिकाव धरु शकेल,अशी उंटाच्या शरीराची रचना असते. तहानलेला उंट एका वेळेला वीस गॅलन किंवा त्यापेक्षा अधिक पाणी पितो. उंटाच्या जठरात असणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण पेशींमुळे उंट शरीरात पाणी साठवून ठेवू शकतो. गरज पडेल तेव्हा त्याला त्याच्या शरीरातील या साठवलेल्या पाण्याचा उपयोग करता येतो. उंटाच्या शरीरात घामावाटे पाणी उसर्जित होत नाही, त्यामुळे कडक उन्हाळ्यातही त्याच्या शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहते. उंटाच्या पाठीवर जो उंचवटा असतो त्याला ‘मदार’ म्हणतात. यात अन्न चरबीच्या स्वरुपात साठवले जाते. काही उंटामध्ये मदारींचे दोन उंचवटे आढळतात. उंटाची शारीरिक रचना वाळंवटातील वादळ आणि काटेरी झुडपांशी सामना करणारी असते. त्याचे ओठ टणक आणि दात बळकट असतात. वाळंवटातील काटेरी झुडुपांसून संरक्षण करण्यास ते उपयोगी ठरतात. उंटाच्या डोळ्यावरील पापण्या आणि त्यावरील लांब केस प्रखर सूर्यप्रकाश आणि वादळात उडणाऱ्या रेतीपासून त्याचे संरक्षण करतात. उंटाला हवे तेव्हा नाकपुड्या बंद करून घेता येऊ शकतात. याचा उपयोग त्याला वादळापासून बचाव करण्याकरिता होतो.


  भारतातील सर्वाधिक उंट राजस्थानमध्ये (७९%) आढळतात. प्रामुख्याने मारवाड प्रातांतील जैसलमेर, बाडमेर, बीकानेर, जोधपूर आणि शेखावटी प्रातांतील चुरु, सीकर, झुंझनु आदी जिल्ह्यांमध्ये उंट दिसून येतात. उंटांची सर्वाधिक संख्या जैसलमेरमध्ये (४९,९१७) तर सर्वांधिक कमी प्रतापगढ (१०९) येथे आहे. जैसलमेरमधील ‘नाचना’ आणि फलौदीजवळ ‘गोमठ’ जातीचा उंट उत्कृष्ट समजला जातो. राजस्थानमध्ये उंट पालन करणारा ‘रेबारी’ हा जात समूह प्रसिद्ध आहे. राजस्थानच्या लोकगीतात उंट जागोजागी ध्वनित होत असतो. उंटाच्या श्रृंगारासाठी गायले जाणारे ‘गोरबंद’ हे एक प्रसिद्ध श्रृंगार गीत आहे. उंटाच्या नाकात घातल्या जाणाऱ्या लाकडाच्या आभूषणाला ‘गिरीबाण’ असे म्हणतात. भारतामध्ये ७०० वर्षांपूर्वी सर्वप्रथम ‘मोहम्मद बिन कासिम’ अथवा ‘पाबूजी राठोड’ यांनी उंट आणल्याच्या श्रृती कथा आहेत.


  राजस्थानच्या वाळंवटी परिसंस्थेतील अविभाज्य घटक असलेल्या उंटांचे प्रमाण दिवसोंदिवस घटत चालले आहे. मागील चोवीस वर्षांत तीन लाख छत्तीस हजार उंट नामशेष झाले आहेत. महाराष्ट्रातील पशुपालक धनगर समाजासारखाच राजस्थानात उंट पालन करणारा ‘रायका’ समाज आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात संस्थांनिकांकडे अखंडित जमिनी उपलब्ध होत्या. उंटाला आवडणारा काटेरी ‘झाडोरा’ आणि ‘खेजडी’ची झाडेही मुबलक होती. हिरवळीच्या भूभागामध्ये उंटांना चराईसाठी बंधने नव्हती. स्वातंत्र्यानंतर जमीन छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये विभागली गेली. जंगले संरक्षित झाली. सामूहिक मालकीच्या संसाधनांना राजस्थानमध्ये ‘शामलात’ हा पारंपारिक शब्द आहे. काळाच्या ओघात सर्वच प्रकारचे ‘शामलात’ (कुरणे, तलाव, जोहड) ऱ्हास पावत चालले आहेत. त्यामुळे उंटांच्या चाऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला. आधुनिक यांत्रिक उपकरणांच्या सहाय्याने शेती होऊ लागल्याने शेतीसाठीही उंटांचा उपयोग कमी होत गेला. राजस्थानला एक हजार कि.मी. पेक्षाही जास्त सीमावर्ती भाग आहे. येथे विकसित झालेल्या रस्त्यामुळे सैन्यामध्ये ‘पेट्रोिलंग’ अर्थात गस्तीच्या कामामध्ये आणि व्यापार-वाहतुकीसाठी होणारा उंटाचा वापरही जवळ-जवळ संपुष्टात आला. या सर्व परिस्थितीत उंटाचा सांभाळ करणे रायकांना कठीण होऊन बसले. पुढे-पुढे तस्करीसारख्या अपप्रवृत्ती फोफावल्या. उंटाचे केस, हाडे, चामडे आणि मांस या उद्योगांसाठी तस्करीच्या प्रमाणात वाढ होऊ लागली. संपूर्ण निसर्गचक्रालाच ग्रहण लागल्यासारखे झाले.


  इल्से कोहलर रोलेफसन नावाची एक जर्मन पशुवैद्यक महिला उंटावर संशोधन करण्यासाठी १९९० मध्ये राजस्थानामध्ये आली आणि इथलीच झाली. पाश्चात्य अभ्यासकांमध्ये संशोधनासाठी अपार मेहनत घेण्याची वृत्ती असते. या वृत्तीला जागून पारंपारिकरित्या उंटाची जोपासना करणाऱ्या ‘रायकां’ना ती प्रत्यक्षात भेटली. पिढी दर पिढी हस्तांतरित झालेले शहाणपण, ज्ञान तिने समजून घेतले. त्यासाठी ८०० कि.मी. चा वाळवंटातील प्रवास चक्क उंटावर बसून केला. राजस्थान आणि उंटांचा जैवसंबध अभ्यासण्यासाठी ती १९९० पासून अथक परिश्रम घेत आहे. या परिश्रमांतून पाली जिल्ह्यामध्ये ‘लोकहित-पशुपालक संस्थान’ नावाची अशासकीय संस्था आकाराला आली. या संस्थेच्या माध्यमातून उंटाआधारित अर्थव्यवस्थेला उजाळा देण्याचे अनेक प्रयत्न झाले. संघटन, संशोधन, जाणीव-जागृती, जनवकालत अशा अनेक माध्यमातून उंटाला राज्यप्राणी घोषित करण्यासाठी संस्थेने सरकारला भाग पाडले. राजस्थानमध्ये आढळणाऱ्या ‘रायका’ समाजाची संख्या आणि त्यांच्या संख्याशास्त्रीय समीकरणामुळे राज्य सरकारने ३० जून २०१४ रोजी उंटाला ‘राज्यप्राणी’ घोषित केले. राजस्थानमध्ये भटक्या-निमभटक्या आणि विमुक्त समुदायांची संख्याही मोठी आहे. पशुपालक समाज हाही पूर्वाश्रमीचा भटका आणि आता निम-भटका आहे. राजस्थान पशुसंसाधन मंडळाचे अध्यक्ष राहिलेले ‘ओटाराम देवासी’ हे ‘रायकां’चे धार्मिक नेते आहेत. राजस्थानमध्ये प्रत्येक जाती-समूहाचे धार्मिक अधिष्ठान असते. या अधिष्ठान प्रमुखांचा येथील राजकारणावर मोठा प्रभाव असतो.


  २७ मार्च २०१५ रोजी राज्य कायदे मंडळाने ‘राजस्थान उंट (हत्या प्रतिबंध आणि अस्थायी स्थलांतर अथवा निर्यात) अधिनियम २०१५ हा कायदाही तयार केला. आजमितीला सर्वसाधारण उंटाची किंमत ही वीस हजार ते चाळीस हजार रुपयांपर्यंत दिसते. नवीन पिढीला उंटांचा सांभाळ करणे फारसं आवडत नसावं, हे त्यांच्या व्यवहारातून जुन्या पिढीला जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर लोकहितचे नावीन्यपूर्ण आणि उपयुक्त संशोधन सामोरे येत आहे. उंटिणीचे दूध हे काही आजारांवरचे प्रभावी औषध आहे. मधुमेहाच्या टाइप दोन या प्रकारामध्ये, रक्तातील शर्करेचे प्रमाण कमी करण्याची क्षमता या दूधामध्ये असल्याचे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. त्याचप्रमाणे ‘स्वमग्नता’ (ऑटिस्टिक) आजार असणाऱ्या मुलांसाठीही त्याचा उपयोग होतो. स्वमग्नता असणाऱ्या मुलांनी उंटिणीच्या दूधाचे सेवन केल्यास त्यांचा दृष्टी संपर्क (आय कॉनटॅक्ट) सुधारण्यास मदत होते. राजस्थानातील उंट, पर्यावरण, पारंपारिक जीवनाधारांच्या स्त्रोतांचे पुर्नज्जीवन या सर्वांची सांगड घालत, आरोग्य वृद्धिकरण वा हेल्थ टुरिझमच्या दिशेने स्थानिकांच्या रोजगारास चालना दिल्यास सामाजिक उद्योजगतेचा आयाम त्यास प्राप्त होऊ शकेल.


  राजस्थानातील उपजत सौंदर्य दृष्टीचा आणखी एक अनोखा मिलाफ पहायला मिळतो तो इथल्या जलस्त्रोताच्या स्थापत्यशास्त्रामध्ये. अभावातून नावीन्यतेचा शोध घेतला जातो याची प्रचिती येथील जलसंसाधनाच्या विविध पारंपारिक पद्धती पाहताना येते. राजस्थानला नद्यांचा वारसा नाही. मोठ्या नद्या तर जवळ-जवळ नाहीतच. येथे तलावांची मोठी परंपरा आहे. संपूर्ण राजस्थानात आपल्याला गावोगावी तलाव आढळतात. गावांतील-शहरांतील तलाव हे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरील रुढी-कर्मांशी (जन्म, विवाह, मृत्यु) जोडलेले आहेत. तलावाचे संरक्षण आणि संवर्धन हा येथील लोकव्यवहाराचा आणि राजधर्माचाही भाग होता. राजस्थानातील सर्वांत मोठे संस्थान म्हणजे, ‘मेवाड’ होय. ‘उदयपूर’ ही मेवाड संस्थानाची शेवटची राजधानी. या शहराला त्यामध्ये असणाऱ्या तलावांमुळे ‘झीलों का शहर’ असे म्हणतात. वाळवंटी जैसेलमेरमधील गढीसर तालाब आणि त्याला जोडून येणारी ‘तेलन’ नावाच्या गणिकेची तलावनिर्मितीची गोष्ट येथील लोककथांचे अंग आहे. हिंदी सिनेमा ‘पहेली’ मुळे अधिक उजेडात आलेली सर्वांत मोठी पायऱ्यांची विहीर ही मुळची तलावाचीच रचना आहे. ती ‘दौसा’ जिल्ह्यात आढळते.


  देशात असणाऱ्या एकूण वाळवंटी क्षेत्रापैंकी ६८.८% भाग हा राजस्थानात आहे. कमी पर्जन्यमान असणारा हा भूप्रदेश हा आपल्या जल साठवणुकीच्या तंत्रामुळे आणि विज्ञानामुळे समृद्ध राहिला. जलसंसाधनांचे पारंपारिक शहाणपण आणि त्या-त्या संस्थानिकांच्या काळातील राजे-रजवाडयांनी त्या प्रयत्नांना दिलेला राजाश्रय हा अभ्यासाचा विषय आहे. नाडी, तलाव, बांध, जोहड, सरोवर, कुंई, बावडी, बेरी, झालरा, टोबा, कुंडी/टाका असे जलसंवर्धनाचे अनेक पारंपारिक प्रकार येथे पहावयास मिळतात. काळाच्या ओघात या पारंपारिक जलस्त्रोतांकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले. दिल्लीस्थित ‘सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट’ संस्थेने प्रकाशित केलेले ‘डाइंग व्हिजडम’ हे पुस्तक भारतासोबतच राजस्थानातील पाण्यासंदर्भातील लोक परंपरांना उजाळा देते.


  गांधीवादी पिंड असलेल्या स्व. अनुपम मिश्र या पाणीदार माणसाकडून राजस्थानातील पारंपारिक जलस्त्रोतांच्या संवर्धनांचे आणि पुर्ननिर्माणाचे काम १९८०च्या दशकात हाती घेण्यात आले होते. १९८७च्या दुष्काळात प्रदेशातील गाव न गाव त्यांनी पालथे घातले. इथल्या जलसंचयाच्या आणि व्यवस्थापनाच्या पारंपारिक पद्धतींचे महत्व त्यांच्या लक्षात आले. लोकांना उपऱ्या अथवा निव्वळ लाभधारक ठरवणाऱ्या यंत्रणा या दुष्काळावरचा उपाय ठरु शकणार नाही, असे त्यांचे ठाम मत होते. समूहाधिष्ठित पारंपरिक पाण्याचे स्त्रोत जगण्याचा आधार ठरु शकतात, हे त्यांच्या अनुभवाधिष्ठित कामातून आणि लेखणीतून नेहमीच सामोरे येत राहिले होते. अनुपमजींचे जगणे आणि लिहिणे हे खूप साधे असायचे. ‘आज भी खरे हैं तालाब’ आणि ‘राजस्थान की रजत बूंदे’ ही त्यांची पुस्तके पारंपारिक जलस्त्रोतांचा व्यापक सामाजिक, पर्यावरणवादी आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन मांडतात. हेच जलस्थापत्यशास्त्रांचे ज्ञान समजून घेऊन, भूजल पुर्नज्जीवनाचा दृष्टिकोन विकसित करण्याची गरज आज निकडीने भासत आहे. "तरुण भारत संघा'चे राजेंद्रसिंह हे व्यापक अर्थाने अनुपमजींचाच वारसा पुढे चालवीत आहेत. उंट, तलाव, खेजडी, जोहड आणि कलमकारी-दस्तकारी यासारख्या गोष्टी येथील समृद्ध परंपरेचे अंग राहिलेले आहेत. राजस्थान आधुनिकतेकडे वळताना या पारंपारिक गोष्टी निव्वळ संग्रहालयांच्या, लोकस्मृतींच्या अथवा पुस्तकांच्या पानांमध्ये राहू नयेत, असे येथील वयोवृद्ध माणसांना राहून-राहून वाटत असते.


  डॉ. स्वाती अमराळे-जाधव
  swasidha@gmail.com
  (लेखिका अजमेरस्थित (राजस्थान) सामाजिक विषयाच्या अभ्यासक आहेत. संपर्क : ८८३०९७९८७२ )

Trending