आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंग रंगीलो... छैल छबीलो!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थानच्या लोकजीवनातले रंग लोककलांमध्येही पुरेपूर झिरपले आहेत. मात्र मुख्य प्रवाहाने क्षणाचा मान दिला असला तरीही, या लोककला आणि जोपासना करणारे कलावंत बहुतांशी दुर्लक्षितच राहिले आहेत.  हा विरोधाभास दूर होण्यासाठी सामाजिक-सांस्कृतिक आणि मुख्य म्हणजे, राजकीय स्तरावरून लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेला, अर्थात समतेच्या तत्त्वाला जागण्याची नितांत आवश्यकता आहे...

 

राजस्थानमधील गाणाऱ्या गळ्यांचे आणि संगीत परंपरेचे अनोखे दर्शन आपण मनोरंजन वाहिनींवरच्या संगीत गायन-वादन स्पर्धांच्या निमित्ताने नित्य अनुभवत असतो. परंतु हा अनुभव फक्त एक कवडसा आहे. राजस्थानला लोकसंगीत परंपरेचा भव्य-दिव्य वारसा आहे. पूर्वी संस्थानिकाद्वारे राजाश्रय लाभल्याने येथील लोकसंगीताच्या समृद्ध परंपरेचे संवर्धन झालेले पाहायला मिळते. संस्थानिकाच्या काळात अनेक जाती-जमातींचा निर्वाह केवळ ‘संगीत’ या कलेवरच चालत असे. म्हणूनच येथील प्रत्येक प्रातांतील लोकसंगीताचे स्वत:चे आगळे-वेगळे वैशिष्ट्य आजही टिकून आहे.

 


राजस्थानामधील लोकसंगीतात प्रामुख्याने दोन प्रकार पहायला मिळतात. विविध सण-उत्सव, लग्न, जन्म, बारसे, स्वागत, पाठवणी (विदाई), तीज, गणगौर, होळी आदि प्रसंगांच्या निमित्ताने गायली जाणारी गाणी हा एक प्रकार. राजे-रजवाड्यांचे स्तुति-कौतुक प्रदर्शित करणारा हा गायनाचा दुसरा प्रकार. यात राजे-रजवाड्यांसाठी गायिली गेलेली लोकगीते ही वीररस, शौर्यरसांनी ओतप्रोत असत. तर कौटुंबिक वा सामाजिक उत्सवांच्या निमित्ताने गायले जाणारे संगीत गेयतापूर्ण आणि हृदयाचा ठाव घेणारे असते. यापैकी बऱ्याच लोकसंगीतातून स्त्रियांच्या जगण्याचे, त्यांच्या सुख-दु:खाचे चित्रण आपल्या कानावर पडत असते. इण्डोणी, कांगासियो, गोरबंद, पणिहारी, लूर, ओल्यूँ, पोदिना, चिरमी वा लांगुरिया इत्यादी लोकगीते गावा-गावांमधून मोठ्या आवडीने गायिली जातात. राजस्थानमध्ये ‘रात्री जागरण’ ही लोकसंगीताची एक मोठी  प्रथा पहावयास मिळते. देवी-देवतांना प्रसन्न करण्यासाठी, इच्छित फल प्राप्त करण्यासाठी भजने गाऊन रात्र जागवणे याला ‘रतजगा’ असे म्हटले जाते. गणेश, शंकर, विष्णु, राम, कृष्ण, बालाजी (हनुमान), भैंरु, जुंझार, पाबू, तेजा, गोगा, रामदेव, देवजी, रणकदेव, सती माता, दियाड़ी माता, सीतला माता, भोमियाजी इत्यादि देवतांची भजने या  जागरणांमध्ये (याच जागरणांतून तावून-सुलाखून निघालेले नेहा कक्कड़, रिचा शर्मा आदि कलाकार आज मांदियाळीत तळपताना दिसत आहेत.)  गायिली जातात. मीरा, कबीर, दादू, रैदास, चंद्रस्वामी तथा बख्तावरजींची पदेही मोठ्या भक्तीभावाने गायिली जातात. 

 

दैनंदिन व्यवहाराचे दर्शन घडवणारी ही लोकगीते ठेका धरायला लावणारी असतात. ख्याल अथवा ठुमरी प्रमाणे छोटी-छोटी तान, मुरकी घेऊन अथवा विशेष आघात देऊन त्यांना अधिक कर्णमधूर बनवले जाते. ही लोकगीते मांड, देस, सोरठ, मारु, परज, कालिंगडा, जोगिया, आसावरी, बिलावल, पिलू खमाज इत्यादी रागांमध्ये गायिली जातात. कुरजा, पीपली, रतन राणो, मुमल, घुघरी, केवड़ा आदि लोकगीते ही जैसलमेर, बाड़मेर, बीकानेर, जोधपूर या भागांमध्ये गायिली जातात. जयपूर, कोटा, अलवर, भरतपूर, करौली आणि धौलपूर इत्यादि मैदानी प्रदेशांत स्वरांमध्ये चढ-उतार असणारी लोकगीते गायिली जातात. मंद्र ते तार सप्तकामध्ये गायिली जाणारी लोकगीते ऐकणे, हा नादब्रम्हाचा वेगळा अनुभव आहे.  लोकगीतांमध्ये भक्तिरस आणि शृंगाररस बरोबरीने आढळतो.


लोकगीतांमध्ये महिलांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्याचा, त्यांच्या रोजच्या जगण्यातील व्यथा-वेदनांचा समावेश आहे. ‘कागा’ हे विरहिणीचे कावळ्याला संबोधून गायलेले गीत असो वा ‘कुरजाँ’ हे प्रियकरला संदेश पाठवणारे गीत असो, स्त्रीसुलभ भावना यात प्रदर्शित होत असतात. जिऱ्याची शेती करताना कराव्या लागणाऱ्या अपार कष्टांची वेदना राजस्थानी शेतकरी महिला ‘जीरा’ गीतातून मांडतात. ‘तेजा’ गीतातून जाट लोक शेतीकामाला सुरुवात करताना लोकदेवतेचे स्मरण करतात. हिचकी, पावणा, पिपली, बिछुड़ो, केसरिया बालम, कांगसियो अशी अनेक प्रकारची लोकगीते इथल्या जीवन व्यवहारांचे यथार्थ दर्शन घडवत असतात. 

 

राजस्थानातील ‘मांड’ गायकी प्रसिद्ध आहे. थोड्या-बहुत फरकाने ती वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या शैलीत गायली जाते. उदयपूरची मांड, जोधपूरची मांड, जयपूर-बिकानेरची मांड, जैसलमेरची मांड ह्या मांड गायिकीमध्ये आज छोटी-मोठी घराणी दिसायला लागली आहेत. स्व. हाजनअल्लाह जिलाई बाई (बिकानेर), स्व. गवरी देवी (बिकानेर), मांगीबाई (उदयपूर), गवरीदेवी (पाली) या मांड गायकीतील प्रमुख लोकगायिका आहेत. राजस्थानातील ‘मारु’ हा लोकगायकांद्वारे गायला जाणारा वीर भाव जागृत करणारा असा सिंधु तथा मारु रागावर आधारित गायन प्रकार आहे. सैन्य रणांगणात लढावयास जाण्यास निघाले असताना त्यांना प्रेरित करणारी लोकगीते या प्रकारात मोडतात. ही लोकगीते उंच आणि लांब-लचक स्वरात म्हटली जातात. राजस्थानमधील ‘ओल्यूँ-ओल्यूँ’ हे प्रमुख लोकगीत याच प्रकारात मोडते. एखाद्या व्यक्तिची सतत आठवण येणे, म्हणजे ओल्यूँ होय. ‘लंगा गायिकी’ ही आणखी एक लोकगीताची शैली आहे. बिकानेर, बाड़मेर, जोधपूर आणि जैसलमेर भागात हा लोकगीत गायन प्रकार प्रसिद्ध आहे. महरदीन लंगा, अल्लादीन लंगा, करीम खाँ लंगा, फुसे खाँ हे गायकीचे प्रमुख लोकगायक आहेत. मंगणियार गायिकी ही लोकगीतातील एक प्रमुख शैली आहे. हा गायनप्रकार गाणारे अनेक पुरुष या जातीत आहेत, मात्र रुकमादेवी ही पहिली मंगणियार गायिका आहे, जिला जगभर प्रसिद्धी मिळाली. तिला ‘थार ची लता’ म्हटले जाते.  राजस्थानमधील ‘कालबेलिया’ या भटक्या विमुक्त समाजातील महिलांचे याच नावाने प्रसिद्ध असलेले नृत्य ‘गुलाबो सपेरा’ या आंतरराष्ट्रीय नर्तिकेमुळे साता-समुद्रापार गेले आहे. पुष्करच्या यात्रेमध्ये नृत्य आणि लवचिक अंगाची कसरत करणाऱ्या गुलाबोचा कुणीतरी व्हिडीओ बनवला. म्हणता म्हणता, तो व्हायरल झाला आणि ती प्रसिद्धीस आली. पूर्वी नृत्य झाल्यावर ‘भिक्षा’ मागणाऱ्या समाजातील स्त्रियांना आज वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमात सन्मानाने ‘बिदागी’ मिळत आहे. येथील बहुतांशी लग्नसमारंभ संगीताशिवाय अपूर्ण असतात. अनेक लग्नसमारंभामध्ये कालबेलिया समाजाचे नृत्य आणि संगीत आपल्याला आवर्जून पाहायला मिळत असते. उपभोग्य वस्तू ठरलेल्या कालबेलिया समाजाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलत आहे, ही बाब तितकीच स्वागताहार्य.

 

राजस्थानात प्रत्येक जातीची लोकदैवते आहेत. काही दैवते सर्वच समाजाची आहेत. प्रत्येक गावात असणाऱ्या वीर तेजाजींचा महोत्सव असो वा पोखरणमध्ये असणाऱ्या रामदेवरांच्या यात्रेला पूर्ण राजस्थानमधून चालत जाणारे महिला-पुरुष असोत. या यात्रेमधून चालत असताना, दैनंदिन आयुष्यातील ताण-तणाव विसरुन बेभान नाचणाऱ्या ‘स्त्रिया’ हा निव्वळ कौतुकाचा नाही, तर हेव्याचा विषय आहे. गेल्या दशकातील काही हिंदी सिनेमांनी ‘घुमर’, ‘निंम्बुडा’ आणि राजस्थानी लोकनृत्याचे अनेक प्रकार मोठ्या पडद्यावर आणले आहेत. राजस्थानातील बहुतांशी महिलांना पदन्यास घेत  ‘घुमर’ जमतो, ही अतिशयोक्ती नसून नृत्याकडे विधायक दृष्टिने पाहिलेल्या समाजाची हीओळख आहे. राजस्थानमधील पारंपारिक संगीताला, लोकगीतांना खऱ्या अर्थाने उजाळा मिळाला तो, स्व. कोमल कोठारी यांच्या प्रयत्नांमुळे. कोमलजी मूळचे राजस्थानचेच. राजस्थानमधील लोककला, लोकसंगीत, वाद्ये यांचे जतन व्हावे, याकरीता त्यांनी बोरूंदा येथे ‘रुपायन’ नावाची संस्था स्थापन केली. १९५८ मध्ये ते ‘राजस्थान संगीत नाटक अकादमी’ त रूजू झाले. पुढील चाळीस वर्षे त्यांनी राजस्थानी लोकसंगीताचे दस्तावेजीकरण करून त्याच्या संरक्षणासाठी झपाटल्यागत काम केले. मंगणियार, लांगा गायकांना सुरुवातीला रेकॉर्डिंगसाठी आणणे अत्यंत कठीण होते. हे गायक ध्वनिक्षेपक पाहून घाबरुन जायचे. ‘माइक’ आमचा आवाज गिळून टाकेल, अशी भीती त्यांना वाटायची. कोमलजींच्या अथक परिश्रमानंतर ही परंपरागत गायन संस्कृती जगाच्या पाठीवर पोहोचली. २००४ मध्ये कोमलजींना या कार्यासाठी ‘पद्म’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. राजस्थानात वर्षभरात कितीतरी प्रकारचे उत्सव-समारोह साजरे होत असतात. त्यातील संगीत-समारोह विशेष उल्लेखनीय असतात. जोधपूरमध्ये भरवला जाणारा वर्ल्ड सेक्रेड स्प्रिंट फेस्टिव्हल असो की उदयपूर वर्ल्ड म्युझिक फेस्टिव्हल असो किंवा कबीर यात्रा संगीत समारोह असो सूफीपासून मांड-मंगणियारपर्यंत सर्व संगीत रंगांची उधळण त्यात असते. वर्षभर ठिकाठिकाणी असे उत्सव होत असले तरी पारंपारिक लोकसंगीताचे जतन, संरक्षण आणि विकास होण्यासाठी मूलभूत काम होण्याची अजूनही गरज भासत आहे. नानाविध जाती-समूहांकडून प्रसंगानुरुप गायले जाणारे प्रकार, त्यांचे अर्थ, त्या-त्या समूहांच्या भाषेची लकब, त्यातील बारकावे हयाची जपणूक करण्याचे सुरु केलेले कोमलजींच्या कामाचा अधिक  विस्तार होणे गरजेचे आहे. मुख्य प्रवाहात नसणाऱ्या अनेक घटकांकडे त्या कलेची पुंजी आहे. भटक्या समूहांसारखे समूह एका जागी स्थिर नसल्याने आणि मुळात दोन वेळच्या अन्नाचीच भ्रांत असलेले समूह आपल्याकडील हा ठेवा कसा काय जपून ठेऊ शकतील? त्यांना सन्मानजनक उपजिविका प्राप्त करुन दिल्यास त्यांच्यातील कला-गुणांसहीत, लोककलांचे जतन आणि संवर्धन अशा दोन्ही गोष्टी साध्य होतील, पर्यायाने कलांचे लोकशाहीकरण घडून येईल.

(लेखिका अजमेरस्थित (राजस्थान) सामाजिक विषयाच्या अभ्यासक आहेत.)
 

डॉ. स्वाती अमराळे-जाधव
संपर्क : ८८३०९७९८७२

 

बातम्या आणखी आहेत...