Home | Magazine | Madhurima | Dr Swati Ganoo writes about neurotic personality

स्थिरता-अस्थिरतेच्या हिंदोळ्यावर

डॉ. स्वाती गानू, पुणे | Update - Aug 28, 2018, 12:38 AM IST

कायम स्वस्तुती करत स्वत:च्याच प्रेमात असणं जसं चूक तसंच क्षुल्लक कारणांसाठी अपराधी वाटून घेणंही चूकच.

 • Dr Swati Ganoo writes about neurotic personality

  कायम स्वस्तुती करत स्वत:च्याच प्रेमात असणं जसं चूक तसंच क्षुल्लक कारणांसाठी अपराधी वाटून घेणंही चूकच. दैनंदिन जीवनातल्या प्रत्येक लहान-सहान बाबतीत भावनिक स्थिरता आणि अस्थिरतेच्या हिंदोळ्यावर असणाऱ्या न्यूरॉटिक व्यक्तींच्या स्वभावाविषयी...

  स्वराला हर्मन खूप आवडायचा. खरं म्हणजे तिचं प्रेम होतं त्याच्यावर पण ती इतकी तणावात होती की, तो आपल्या प्रेमाला हो म्हणेल का? समजून घेईल का? त्याचं दुसऱ्या एखाद्या मुलीवर तर प्रेम नसेल नं? मी त्याच्यासमोर शोभून दिसेन का? मनाने अतिशय हळुवार असलेली स्वरा अतिविचार करायची आणि ते विचार नकारात्मक दिशेने जाणारेच जास्त असायचे. जेव्हा हर्मनने अतिशय सभ्यपणे तिच्या या भावनेला नाही म्हणलं तेव्हा ती हा नकार पचवू शकली नाही. तिच्या मनात विचारांचं जणू द्वंद्व पेटलंं. ती अगदी आजारी दिसायला लागली. ती आपला चेहरा सारखा स्वच्छ धुवायची. तिच्यापेक्षा कोणी सुंदर दिसतंय हे तिच्या मनाला पटेना. अशा मुलींचा ती तिरस्कार करायला लागली. त्यांच्याबद्दल तिच्या मनात खूप राग निर्माण झाला. तिच्या दु:खापेक्षा तिचा संताप हा काळजीत टाकणारा होता. क्षणात ती निराश असायची आणि क्षणात रागीट. क्षणात स्वत:ला अपराधी समजायची आणि क्षणात असूया बोलून दाखवायची. तिचे मूड्स सतत बदलत होते. तिला असं का होतंय, हे तिच्या घरातल्यांना नीट कळत नव्हतं.


  प्रदीप चासकर पस्तिशीतला सरकारी नोकरीत काम करणारा तरुण. नेमून दिलेलं काम नीट होण्यासाठी मान मोडून काम करायचा. त्याची चिकाटी वाखाणण्यासारखी होती. पण नेहमी काळजीत असायचा. चिंता त्याला सतावत असायची. त्याच्या जबाबदारीत असलेली एक महत्त्वाची फाइल जेव्हा गहाळ झाली तेव्हा तर तो स्वत:ला अपराधी समजून खूप त्रास करून घ्यायला लागला. आधीच लोक त्याला चिंतातूर किडा म्हणायचे. त्यात असं घडलं तेव्हा तो काळजीत पूर्ण बुडून गेला. तो मनाशी विचार करत राहायचा की, मी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही असं का होतं? माझ्यातच काहीतरी कमतरता आहे. या गोष्टीला मीच जबाबदार आहे, ही अपराधीपणाची भावना त्याला छळत होती. त्याची काळजी, वाटणारी चिंता इतकी वाढली होती की, त्याचं वागणं आश्चर्य वाटण्यासारखं बदललं होतं. त्याचे विचार त्याला जगू देत नव्हते. विचार करतांना तो सारखं नख कुरतडायचा. भुवया, केस उपटायचा. त्याच्या मनातल्या गोंधळाचं कारण विचार करूनही त्याला कळत नव्हतं.


  पाच सर्वात महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्व प्रकारांपैकी ‘न्यूरॉटिसिझम’ किंवा न्यूरॉटिक पर्सनॅलिटी हा एक. अशा व्यक्ती ओळखण्यासाठी महत्त्वाचं साधन म्हणजे त्यांच्यातील भावनिक स्थिरता ते भावनिक अस्थिरता यांच्यातील सातत्य मोजणं. म्हणजे ते किती वेळा भावनिकदृष्ट्या स्थिर किंवा अस्थिर असतात. स्वरा, प्रदीप ही अशा न्यूरॉटिक पर्सनॅलिटीची उदाहरणं आहेत. अशी माणसं स्वत:वर लक्ष केंद्रित करणारी असतात. सतत नकारात्मक विचारात असतात. निर्माण झालेल्या परिस्थितीचा ते सकारात्मकतेने विचार करू शकत नाही. आपल्यापेक्षा जास्त चांगल्या परिस्थितीत असणाऱ्या माणसांबद्दल अशा माणसांना मत्सर वाटत असतो. ते नैराश्याकडे प्रवास करत असतात. आयुष्याचा ताणतणाव झेलताना त्यांची चिडचिड वाढत जाते. न्यूरॉटिसिझमची पातळी कमी असणाऱ्या व्यक्ती त्या मानानं बऱ्याच सुरक्षित समजायला हरकत नाही. न्यूराॅटिसिझमची पातळी उच्च असणाऱ्या व्यक्ती प्रचंड काळजी करतात. मूडी असतात. भीतीनं त्यांना सुचत नाही. असूया, मत्सर, अपराधीभाव त्यांना सामान्य जीवन जगू देत नाही. ही सगळी विशेषणं नकारात्मक आहेत म्हणूनच न्यूरॉटिक पर्सनॅलिटी असं म्हणलेलं या व्यक्तींना आवडत नाही. न्यूरॉटिक व्यक्तींनी त्यांच्या तणावाला दिलेला प्रतिसाद हा खूपच खालच्या दर्जाचा असतो. संकट आलं तरी कुठेतरी आशेचा दीप सामान्य माणसाच्या मनातला कोपरा उजळत असतोच. पण न्यूरॉटिक व्यक्ती नेहमी वाईट बाजू पाहतात. त्यामुळेच सामान्य माणसांसाठी जी समस्या सोडवली जाऊ शकते, जिला उत्तरं मिळू शकतात, पर्याय असू शकतात, त्याच समस्या न्यूरॉटिक व्यक्तिमत्त्वांसाठी फार गंभीर आणि धोकादायक असतात. ते वास्तवात राहात नाहीत असं नाही पण त्यांच्या मनात संभ्रमावस्था असते. ते फार लवकर निराश होतात. तणावात जातात. या मनाच्या ज्या अवस्था आहेत त्या अर्थातच व्यक्तीच्या मज्जासंस्थेशी निगडीत आहेत. सतत ताण, निराशा यामुळे त्यांचा मेंदू नेहमी अतिक्रियाशील (हायपरअॅक्टिव्ह) असतो.


  तुम्ही स्वत: किंवा तुमच्या आसपास अशा न्यूरॉटिक व्यक्ती असल्या तर त्यांची चिंतातूर होण्याची वारंवारिता, राग, नैराश्य, कटू वृत्ती यांचं प्रमाण, अपराधीपण, एकटेपणाबाबतची त्यांची लक्षणं, एखाद्या गोष्टीबद्दल लालसा, मोह आवरता न येणं, ताणाच्या व्यस्थापनाअभावी येणारी असुरक्षितता, ही लक्षणं टोकाची असतात. त्यांच्याशी वागताना त्यांना भावनिकदृष्ट्या समजून घेऊन वागायला हवं. ते आनंदी राहतील अशा वातावरणात त्यांना ठेवायला हवं. आपण प्रतिक्रिया न देता शांतपणे परिस्थिती हाताळली तर त्यांना शांत होण्यास मदत होईल. आपल्या सकारात्मक बोलण्यानं त्यांच्या निराश दृष्टिकोन कमी होऊ शकेल. भावना सांभाळाव्या कशा, कशा व्यक्त कराव्या हे आपल्या वागण्यातून त्यांना दिसू द्यावं.अशा व्यक्ती व्यसनांकडे झुकणं सोपं असल्याने त्यांना मानसिक, भावनिक आधार वाटेल अशी सोबत आवश्यक आहे. तणावाच्या परिस्थितीला कसं सामोरं जाता येऊ शकेल असा संवाद करावा. परिस्थितीशी तुला जुळवून घेता येईल अशा अर्थाची चर्चा असावी. या व्यक्तींना त्यांच्यामधील नकारात्मक दृष्टिकोनामुळे आपली नाती निकोप किवा दीर्घकाळ टिकवणं जमत नाही. त्याबद्दल ते स्वत:ला दोषी ठरवतात. त्यांची स्वप्रतिष्ठा अतिशय कमी असल्यानं ताणाला तोंड देणं फार कठीण जातं. म्हणूनच त्यांना मदतीची खूप गरज असते. मात्र प्रत्येकच वेळेला अशा न्यूरॉटिक म्हणजेच खूप हळूवार मनाच्या, लगेच सगळ्या भावना व्यक्त करणाऱ्या व्यक्तींना सांभाळायला कुणी असेलच असं नाही. म्हणून या व्यक्तींनी प्रतिक्रिया देण्यापूर्वी स्वत:ला असा प्रश्न विचारावा की, आणखी दुसरा कोणता पर्याय आहे का? शिवाय असा विचार करावा की, जर दुसरे लोक ताणाचं व्यवस्थापन करू शकतात तर आपणही नक्की करू शकतो. यासाठी रोज स्वत:ला सकारात्मक आज्ञा द्या. मी माझं आयुष्य नियंत्रित करू शकतो. सगळं काही ठीक होईल. हा काही जगाचा शेवट नाही. परिस्थिती नक्कीच सुधारेल. दीर्घ श्वास घेत राहिल्यानं मन आणि शरीर शांत होईल. दहा वेळेस हे केल्यानं नक्कीच फायदा होईल.


  व्यायामाने असे विचार नक्कीच नष्ट केले जाऊ शकतात. थेरपिस्टची मदत घेणं सर्वात उत्तम कारण, या अतिकाळजी, चिंता, भिती, अपराध भावनेने व्यापलेल्या चिंतातूर जंतूंना कसं ओळखावं, समजून घ्यावं, त्यांच्या भावना सांभाळायला कशी मदत करावी, शांत, संयमी राहून कठीण प्रसंगांना कसं तोंड द्यावं, त्याला असलेली प्रेम आणि मायेची गरज कशी पूर्ण करावी, त्याला अपराध भावना न येऊ देता प्रोत्साहन कसं द्यावं हे थेरपिस्ट आपल्याला योग्य पद्धतीनं सांगतो. शेवटी माणसाचं व्यक्तिमत्त्व खूप महत्त्वाचं असतं. कारण असं म्हणतात की, personality is to a man what perfume is to a flower. म्हणूनच माणसं सांभाळायला हवी.


  - डॉ. स्वाती गानू, पुणे
  ganooswati@gmail.com

Trending