आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूल्य संस्कार पेरणारा "विजेता'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. वैशाली जहागीरदार  

उपदेशाचे डोस न पाजता, प्रबोधनाचा आव न आणता मूल्य संस्कार पेरणाऱ्या "विजेता' या बालकुमारांसाठीच्या कथासंग्रहातील कथांमधून गोष्ट हरवत नाही. सहज स्वाभाविक कथन हे या कथांचे सामर्थ्य असून मुलांच्या जगण्यातून उगवलेले आशय विषय मुलांना ऊर्जा देणारे व आजच्या स्वयंकेंद्री मानसिकतेत भवतलाचे भान देत साने गुरुजींच्या बालसाहित्याशी संवादी आहेत.
"आपल्या दृष्टिपटलावर पडणाऱ्या दृश्यावर आपले मन प्रक्रिया करते, त्यातील न दिसणाऱ्या रिकाम्या जागा भरण्याचा प्रयत्न करते, असे अर्नेस्ट माख म्हणतो तर मॅक्स हा मनोवैज्ञानिक म्हणतो, "जे दिसतं त्यापेक्षा काहीतरी जास्तीचा अर्थ शोधण्याचे काम आपले मन सतत करत असते.' "विजेता' या बालकुमारांसाठीच्या कथासंग्रहातील प्रत्येक कथेत लेखक उमेश घेवरीकर यांनी संवेदनशील शिक्षक म्हणून मुलांच्या दृश्य वर्तनामागचा नेमका अर्थ शोधण्याचा केलेला प्रामाणिक प्रयत्न वाचकाला अंतर्मुख करतो. 

या संग्रहातील कथा म्हणजे निव्वळ शब्दांची जोडणी करून रचलेल्या काल्पनिक कथा नव्हेत तर जागरूक, समाजभान जपणाऱ्या शिक्षकांच्या हृदयस्पर्शी जाणिवा आहेत. संग्रहात एकूण सात कथा आहेत. प्रत्येक कथा ही मुलांच्या भावविश्वातून साकारणारी, त्यांची भावनिक आंदोलने टिपणारी म्हणूनच काळजाचा ठाव घेणारी  आहे. कथांचे नायक म्हणजे गवंडीकाम करणार मुलगा, कर्जबाजारी शेतकऱ्याची मुलगी, गतिमंद मुलगा असे असून ही सर्व पात्रे प्रतिकूल परिस्थितीशी विनातक्रार संघर्ष करत प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचे धाडस दाखवणारी असल्याने वेगळी ठरतात. विद्यार्थी - शिक्षक-शाळा-समाज या चौकटीतील आंतरप्रक्रिया अत्यन्त प्रभावीपणे रेखाटताना कथेतील प्रत्येक पात्र व वाचकांशी थेट संवाद साधते. 

धावण्याच्या स्पर्धेत शाळेला पहिले बक्षिसे मिळवून न देता आल्याने निराश झालेला पण जिद्द बाळगून असलेला उदय आपल्या जिवलग मित्रांच्या मदतीने शर्यत जिकण्याची शिकस्त करतो, पण विजय दृष्टिपथात असताना बक्षिसापेक्षा राष्ट्रध्वज सन्मान सर्वोच्च मानून कृतीतून राष्ट्रप्रेमाचा आदर्श घालून देताना भेटतो. आपल्यासारखे इतर कुणाच्या आयुष्याचे रंग फिकट होऊ नयेत यासाठी आपल्या सुंदर हातांचा उपयोग व्हावा ही भावना चित्रकार असूनही परिस्थितीमुळे गवंडीकाम करत असलेला आणि समाजभान जपणारा रोहिदास त्याच्या बालपणातील आठवणीसह सुंदर हात या कथेत भेटतो. शिक्षणाच्या वाटेवरील एका वळशाने जशी आपल्या आईच्या शाळेची वाट रोखली तशी आपल्या मित्राची शिक्षणाची वाट  बंद होऊ नये म्हणून छोटा वळसा घेऊन अमरने निर्माण केलेली वाट अमनच्या जीवनातील शिक्षणवात उजळवताना भेटते. दोरी ही या संग्रहातील सर्वात सुंदर कथा. नापिकी दुष्काळ यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्याच्या मुलीचे उद्ध्वस्त होणारे भावविश्व काळजाला चरे पाडते. चोर या कथेतून शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातले भावबंध निखळ संवाद किती महत्त्वाचा आहे हे पटते, जन्माने कुणी चोर नसतो. मुलांची मानसिकता आणि भावविश्वासह समजून घेतले तर अनेक समस्याच निर्माणच होणार नाहीत हा विचार अंतर्मुख करतो. घरवापसी या कथेतील मुग्धा सुरक्षित मध्यमवर्गीय आयुष्य जगताना अचानक भटक्या मुलांच्या जगात पोचते आणि तेथील त्यांचा जगण्याचा संघर्ष पाहून स्वतः सोबत वाचकांनाही अवस्थ करत सक्षम नागरिकत्वाचा दिशेने पाऊल टाकते.  दिव्यांग असणारा गणू आणि प्रसंगी शाळा शिक्षक आणि स्वतःच्या आईवडिलांविरुद्ध ठामपणे उभे राहून त्याला शिक्षण प्रवाहात टिकवणारी त्याची वर्गमैत्रीण भक्ती व तिच्या मित्र यांच्या अशा मुलांकडे पाहण्याचा नॉर्मल दृष्टिकोन मोठ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरतो.

संग्रहातील सर्वच कथांचे नायक सर्वसामान्य परिस्थितीतील शाळकरी मुले आहेत तरीही या कथा बालकुमारांसह मोठ्यांनाही नक्कीच आवडणाऱ्या आहेत. प्रत्येक कथा ही मुलांच्या भाव विश्वातून साकारणारी, त्यांची मानसिक स्पंदने नेमकेपणे टिपणारी असल्याने वेगळी ठरते तरीही लेखक कुठेच कुणी काय करावे, असा उपदेश करत नाही. समाजसुधारणेचा अभिनिवेश न घेता सहज वास्तवाचे भान जपत आपले म्हणणे सोप्या पण आशयघन शब्दात मांडतो. त्यामुळे वाचकांची त्या पात्रांशी भावनिक जवळीक निर्माण होते. काही संवादांतून लेखकाने केलेले भाष्य उपदेश न वाटता डोळ्यातील अंजन वाटणे हे या कथांचे यश आहे.

समाजातील, कुटुंबातील संघर्ष त्यांचा मुलांच्या भाव विश्वावर खोलवर होणारा परिणाम, त्यातून निर्माण होणारी असुरक्षितता, भावनिक घुसमट, नकारात्मकता आणि हे टाळण्यासाठी शिक्षक आणि शिक्षणव्यवस्थेचे उत्तरदायित्व उपदेशाचे डोस न देता अधोरेखित करण्यात लेखक कमालीचा यशस्वी झाला आहे. बदलत्या सामाजिक परिस्थितीत मुलांचा शिक्षक पालकांशी असलेला संवाद तुटत चाललेला असताना एका संवेदनशील शिक्षकाने सजगतेने टिपलेली ही मुलांच्या भावविश्वातील स्पंदने प्रत्येक शिक्षक विद्यार्थी आणि पालकांना खूप काही देऊन जाणारी आहेत. पुस्तकाची पाठराखण करणारे साहित्यिक आणि प्रतिभावंत कवी  दासू वैद्य यांनी म्हटल्याप्रमाणे,"उपदेशाचे डोस न पाजता, प्रबोधनाचा आव न आणता मूल्य संस्कार पेरणाऱ्या या कथांमधून गोष्ट हरवत नाही. सहज स्वाभाविक कथन हे या कथांचे सामर्थ्य असून मुलांच्या जगण्यातून उगवलेले आशय विषय मुलांना ऊर्जा देणारे व आजच्या स्वयंकेंद्री मानसिकतेत भवतलाचे भान देत साने गुरुजींच्या बालसाहित्याशी संवादी आहेत.’

> विजेता (बालकुमार साहित्य)

> लेखक : उमेश घेवरीकर

> प्रकाशन : संवेदना प्रकाशन

> किंमत : ७५ रु.  

लेखिकेचा संपर्क : ८२०८७४४१९०