आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाटक म्हणजे फक्त अभिनय नाही ना?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सई माेराणकर, बालकलाकार, दिग्दर्शक

हळूहळू वर सरकत जाणारा पडदा, विंगेत उभे असलेल्या आमच्या पोटात येणारा गोळा, ब्लॅक आउटमधला अंधार, सहकलाकाराचं काही चुकत असताना गडबडून न जाता त्याला सांभाळून घेणं, मेकअप करताना चेहऱ्यावर होणारा हलक्या हातांचा स्पर्श, आरशासमोर बसून बदलत जाणारं आपलंच रूप बघण्याचा आनंद अर्थातच रंगभूमीवर वावरताना क्षणोक्षणी समृद्ध होण्याची सुवर्णसंधी! 

मला वाटतं रंगभूमी ही एक अशी जागा आहे जी आम्हां लहान मुलांचं जगणं संपन्न करत असते, नाटकात काम करत असताना आपोआपच पाठांतराची सवय लागते जी अभ्यासातही उपयोगी पडते, सतत सजग राहण्याची तयारी होते ज्याचा उपयोग प्रसंगावधान दाखवताना होतो, रिटेक नाहीत याचाच अर्थ जे करेल ते आत्ता, इथे आणि उत्तमच ही मनाची तयारी होते. आजकाल काही मुला-मुलींना डायरेक्ट मालिकेत किंवा चित्रपटांत रोल मिळतो, पण त्यांनी नाटकाचा अनुभव घ्यावाच आणि संधी मिळेल तेव्हा नाटक करावंच असं मला मनापासून वाटतं. नियोजन, लिडरशिप, सतर्कता, सजगता, क्रिएटिव्हिटी या सगळ्या गुणांना वाव मिळतो. तसंच नाटकात सेकंड चान्स नसल्याने प्रत्येक वेळेस ते पात्र पडदा पडेपर्यंत “जिवंत” ठेवण्याचं आव्हान पेलण्यासाठी आपण तयार होतो.
 
बालरंगभूमीला नवीन साज चढतोय असं मला वाटतं.  आधी बालनाट्य हे स्पर्धांपुरते मर्यादित होते. ज्यात नाटकाची बाकी सगळी बाजू मोठे लोकं सांभाळायचे जसं की लेखन, दिग्दर्शन, वेशभूषा, रंगभूषा, संगीत, प्रकाशयोजना, नेपथ्य सबकुछ मोठे पण कलाकार म्हणून मात्र लहान मुलं! त्यांनी फक्त मोठे सांगतील तसं आणि सांगतील तेवढंच करायचं, पण आता ट्रेंड बदलतो आहे. मोठेमोठे लेखक आता लहान मुलांसाठी स्पेशल नाटक लिहित आहेत, नावाजलेले दिग्दर्शक ती बालनाट्य बसवत आहेत. हे सगळं खूप छान आहे, बालनाट्यासाठी , बालकलाकारांसाठी ही एक चांगली संधी आहे. 

बालरंगभूमी बदलली पाहिजे असं खूप लोकांना वाटतं, काहीजण प्रयत्नही करतात पण कधीतरी मला या सगळ्यांत बालकांना डावललं जात असल्यासारखं वाटतं. आईबाबांशी गप्पा मारताना त्यांनी त्यांच्यावेळची बालनाट्य कशी होती ते सांगितलं. कावळा-चिमणी, वाघोबा, ससुल्या, हत्ती, माकड नाहीतर राजा, राणी यावर ती नाटकं असायची. आज्जीच्या गोष्टींसारखी छोटी छोटी नाटकं, हसता खेळता खूप काही सांगून जाणारी, शिकवण देणारी ती नाटकं बघतांना मनोरंजन तर व्हायचंच पण काहीतरी बोध घेऊन घरी यायचो असं आई-बाबा 
म्हणतात.  

गल्लोगल्ली चालणाऱ्या बालनाट्य प्रशिक्षण शिबिरांनी मुलांना स्पर्धेत उतरवलं आहे. पालकांनाही आपल्या मुलांना अभिनय शिकवण्यात रस असतो मात्र नाटक म्हणजे फक्त अभिनय नाही ना? लेखन, दिग्दर्शन, वेशभूषा, रंगभूषा, संगीत, प्रकाशयोजना, नेपथ्य यातलं काही जमत असेल तर मुलांनी का करू नये?  मला वाटतं की बालरंगभूमी अजून समृद्ध करण्यासाठी पालकांनीही पुढाकार घेतला पाहिजे. बालनाट्य किंवा बालरंगभूमी हा उत्तम अभिनेता किंवा अभिनेत्री घडविण्याचा पाया आहे. नाटक, चित्रपट किंवा मालिकांमध्ये आघाडीवर असलेल्या कलाकारांची सुरुवात इथूनच झाली आहे.  असं असेल तर येणाऱ्या काळात याच बालरंगभूमीने चित्रपट, मालिका व नाट्यसृष्टीला नुसते कलाकारच नाही तर लेखक, दिग्दर्शकांसह तंत्रज्ञही द्यावे असं मला मनापासून वाटतं. 

बालनाट्यांच्या विषयांनी तर कहर केलाय. खरंच ब्ल्यू व्हेल, शेतकरी आत्महत्या, गलिच्छ राजकारण यातून काय साध्य हाेतं? मुलं डोरेमॉन, नोबिता, शिनचॅन हे टी.व्ही.वर बघतात म्हणून वैतागलेले पालक मुलांना शिबिरात पाठवतात आणि शिबिरवाले परत तीच नाटकं बसवतात. डोरेमॉन आणि छोटा भीम, शिनचॅन आणि नोबिता अशा टायटल्सची नाटकं काय शिकवण देत असतील देव जाणे! 

sayee.morankar@gmail.com

बातम्या आणखी आहेत...