आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वप्न

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेले काही दिवस मिनूतले हे बदल अम्मीच्याही लक्षात येत होते. तो अलीकडे कमी बोलतोय हेही तिला जाणवत होतं. यावर त्याच्याशी आज रात्री बोलायचं असं तिने ठरवलं. त्याच्या आत नेमकं काय सुरू आहे याची तिलाही उत्सुकता लागून राहिली होती. मिनूला कुठेतरी ही गोष्ट बोलावीशीच वाटत होती. पण कुणाशी बोलायचं हे काही त्याला सुचत नव्हतं. आता अम्मीच्या उबदार मिठीत त्याला हलकं आणि सुरक्षित  वाटलं.

 
 
मिनूला बाssरीक निरीक्षण करण्याचा छंद जडला होता. एखाद्या गोष्टीने लक्ष वेधून घेतलं की त्याची नजर त्या गोष्टीचा बराच वेळ पिच्छा पुरवत राहायची अन् त्या अनुषंगाने मेंदूत बरीच खळबळ माजत राहायची. आपसूकच त्या प्रसंगी त्याचा चेहरा ट्रान्समध्ये गेल्यासारखा भासायचा. आताही तो गॕॅरेजमधल्या शकीलभाईंच्या हालचाली नेमकेपणाने टिपत होता. आणि त्या नीटपणे टिपता याव्यात म्हणून त्याच्या मागोमाग फिरत होता. अम्मी एका खुर्चीत बसून वेळ काढत मोबाईलमध्ये गुंतली होती. अम्मीने दोनतीनदा आवाज देऊन पाहिला, "मिनू बच्चे, इदर आ. बैट ह्या जरा सुकूनशे. भैयाकू काम करंदेल.' पण हे बहुधा एकदाही मिनूच्या कानापर्यंत पोहोचलंच नव्हतं. शकीलभाईंचे टायर गाडीपासून काढणे अन् पंक्चर काढल्यानंतर गाडीला टायर पुन्हा जोडणे...प्रत्येक कृती त्याने पाहिली आणि शकीलभाई जेव्हा कपड्याने हात पुसून मोकळे झाले तेव्हाच तो तिथून हलला. 
 
 
अम्मीने गाडी सुरू केली. गाडीवरून घरी पोहोचेपर्यंतही मिनू शांतच होता. पेक्षा त्याच्या मेंदूत आत्ता नुकत्याच पाहिलेल्या प्रसंगाच्या संदर्भाने घड्या तयार होत होत्या. अम्मीची बडबड चालूच होती. मधूनच अम्मी त्याला उद्देशून म्हणायची, "व्हय क्या नै ?'..."बराबर ना ?'...'कतो आबी ऐसा कर्ने हुना लग्ता. ना ?' ... या सगळ्यावर मिनूची प्रतिक्रिया शून्य. मग थकून अम्मीही गप्प झाली. शाळेत तो जेमतेम हुशार होता आणि खेळातही त्याला कमी रूची होती. चित्रं मात्र तो आवडीने काढायचा. रंगांशी मनसोक्त (चक्क हात राड होईपर्यंत) खेळायला त्याला आवडायचं. तेव्हा शाळेतून परतल्यानंतर रंगाच्या बाटल्या आणि कागद घेऊन बसला की तो जेवणासाठीही लवकर उठत नसे. हाका मारून मारून अम्मीचा घसा कोरडा होत असे. 
 
 
त्या दिवशीही घरी परतल्यानंतर तो कागद, रंग घेऊन बसला आणि जैद्याची हाक आली, "मिनू लेको, चल तो खेल्नेकू. नवी बॕट लायलीय अब्बूने. येदेक.' मिनूने खालमानेनेच नकार दिला. जैद्या मग त्याच्या शेजारी येऊन बसला. त्याच्या पाठीवर हात टाकून म्हणाला, "येडे, हँगेसार्का क्या कर्ते तू? चल, जरा वत्ताच आंग मोकला हुइंगा. जरा दोस्तामें मिसळेकतो दिल बहलता. चल. दोचार डाव मार्के आइंगे.' यांवर मिनू समजुतीचं हसला. दोघे मग ग्राउंडवर खेळायला गेले. गेले काही दिवस मिनूतले हे बदल अम्मीच्याही लक्षात येत होते. तो अलिकडे कमी बोलतोय हेही तिला जाणवत होतं. यावर त्याच्याशी आज रात्री बोलायचं असं तिने ठरवलं. त्याच्या आत नेमकं काय सुरू आहे याची तिलाही उत्सुकता लागून राहिली होती. रात्रीच्या जेवणानंतर अम्मीने जवळ बसून मिनूची प्रेमाने विचारपूस केली. "तुजे क्या हुने लगे ऐलीवर? तू ज्यादा बोलता नै. गुमसूम र्हनेलगे. कुच तक्लीप हय क्या तुजे? अम्मीकू नै बोलनाला आपले?'
 
 
मिनूला कुठेतरी ही गोष्ट बोलावीशीच वाटत होती. पण कुणाशी बोलायचं हे काही त्याला सुचत नव्हतं. आता अम्मीच्या उबदार मिठीत त्याला हलकं आणि सुरक्षित  वाटलं. आणि तो म्हणाला, "अम्मी, मजे एक ख्वाब पड्यातां पिछले हफ्तेमें....' इथं थोडं थांबून मिनू म्हणाला, "कतो कैसा बुलू आबी ?... मेरे ख्वाबमें एक शेर आयला हातां. इsss येत्ता बडाक्बडा ! धिप्पाडके धिप्पाड. पन..पन उने अंधा हाता. दोनों आक्क्यान्शे अंधा. अन् बिल्लीशेबी गरीब दिस्ने लग्यातां. लाचार. मइ उस्के साम्ने हाता फिरबी उने अजिबात हालतासुदीक न्हता.'
"आग्गे क्या हुया फिर?' अम्मीने विचारले. 
 
 
"वू कुच येत्ता जरूरी नैना. तो दुस्रे दिनपाश्शे मइ इ ख्वाबपर बिचार करने लग्या. तौ मजे सुचा, आपलेकू आक्क्या हय. अन् एक छोड, दो दो हय. तो आपन उसका केत्ता फायदा उठातें?... तौपाश्शे मैने ठराया, आपले आजूबाजू चलनेवाले दुन्याके चालचलनकू खुल्ले आक्क्यान्शे देखनेका. आक्क्यान्का पूरा के पूरा सही इस्तेमाल कर्नेका.'
 
 
"अरे वा! शाब्बास...'अम्मी उतावीळपणे म्हणाली. तेव्हा तिला अडवत मिनू पुढे म्हणाला, "अजी आग्गे सुनो तो... आग्गे सच्ची मजा हय...तो तौपाश्शे मइ आपले आसपासके चालचलनकू आक्क्या खोलके नीट देकने लग्या. तो मजे भौत सारे अजब अजब चिजां दिशे. उसमेंकी सबशे बडी अन् खास चीज बोलू?'
एव्हाना अम्मीलाही आता मिनूच्या गोष्टीत भरपूर रस येऊ लागला होता. ती उत्सुकतेने म्हणाली, "बोल..बोल बच्चे..'
 
 
मिनू म्हणाला, "उस दिन आपन बजारमें गयते व्हाके नजीमचाचा... दुकानपर तस्बीह करते बैटेले... आपलेआपलेमेंच गुतेले... परसू मइ तेल लानेकू गल्लीमेंके दुकानपर गयाता...व्हाके शाहिदचाचा.. आपलेमेंच गुतके ध्यान्शे लिखते बैटेले... हौर, हौर आज आपन सुबूकू पंक्चर काढने गयते व्हा.. शकीलचाचा...पंक्चर काढनेमें गुतेले...आपआपलेमेंच धुंद होयले... इ सब्जने केत्ते खुबसूरत दिसतेते नै ?'

अम्मीला काही कळेना. तिने मिनूला तसे विचारले. तो गोड हसला. म्हणाला, "कतो आपले काममें पूरा ध्यान...तनमन लगायला इन्सान केत्ता खुबसूरत दिसता? तुमेने देके कबी?'..."तौशे मैने ठराया पूरे दिलपाश्शे कर्नेकी कोंचीबी चीज. पूरा ध्यान लगाके...' अम्मीने खुशीत येऊन मिनूला मिठी मारली. तिच्या लाडक्या मिनूने जगण्यातली फार मोठी गोष्ट आपली आपणच आत्मसात केली होती आणि आता तिचीही जबाबदारी वाढली होती.
 

लेखकाचा संपर्क - ९७६२८२१०८२

बातम्या आणखी आहेत...