आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिण्याच्या  स्वच्छ पाण्यापासून 16 काेटी लाेक वंचित

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकीकडे सूर्य तापला असून दुसऱ्या बाजूला पाण्याचे संकट सतावत आहे. जगाच्या लाेकसंख्येमध्ये आपला हिस्सा १६ टक्के आहे. परंतु आपल्याला जगात उपलब्ध असलेल्या एकूण पाण्याच्या तुलनेत ४% च पाणी मिळते. सरकारच्या सर्व याेजनांमध्ये प्रत्येक व्यक्तीला ४ बादल्या स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याच्या निर्धारित लक्ष्याच्या तुलनेत अर्धे म्हणजे दाेन बादल्या पाणीही उपलब्ध करून देऊ शकत नसल्याचे केंद्र सरकारच्या २०१८ च्या लेखा परीक्षण अहवालामध्ये म्हटले आहे. भारताचे नियंत्रक आणि महालेखापालांच्या अहवालानुसार २०१७ पर्यंत स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यासाठी असलेल्या ८९,९५६ काेटी रुपयांच्या एकूण रकमेपैकी ९० टक्के रक्कम खर्च झाली आहे. तरीही आज जवळपास ३.७७ काेटी लाेक दूषित पाण्यामुळे दरवर्षी आजारी पडतात. दरवर्षी पावसामुळे एकूण ४ हजार घनमीटर पाणी मिळते. परंतु जमिनीतील वापरायाेग्य पाणी १,८६९ घनमीटर असून यापैकी केवळ १,१२२ घन मीटर पाणी वापरात येते. भारतात सरासरी ११० सेंटीमीटर पाऊस हाेताे आणि ताे जगातल्या अन्य देशांच्या तुलनेत जास्त आहे. 


आकडेवारीच्या आधारावर भारत अन्य देशांच्या तुलनेत पाण्याच्या बाबतीत सर्वात समृध्द आहे परंतु पावसाचे ८५ % पाणी समुद्रात वाहून जाते आणि एकूण पाण्यापैकी केवळ १५ % पाणी साठवून ठेवणे शक्य हाेते. पाण्याची बरबादी करण्यातही आपण मागे नाही. दिल्ली, मुंबई आणि चेन्नईसारख्या शहरात पाण्याच्या पाईपलाईनचे व्हाॅल्व्ह खराब झाल्याने १७ ते ४४ टक्के पाणी राेज वाहून जाते. मुंबईत वाहने धुण्यामध्येच ५० लाख लिटर पाणी  खर्च हाेते.  विशेष बाब म्हणजे देशातल्या ग्रामीण भागात राहणारी देशातील जवळपास ८५ टक्के लाेकसंख्या पाण्यासाठी भूजलावर अवलंबून आहे. देशातील जवळपास ६.६ काेटी लाेक पाण्यातील फ्लाेराईडच्या जास्त प्रमाणामुळे आजारांचा सामना करीत असल्याचे संसदेत सांगण्यात आले.


देशाचे भाैगाेलिक क्षेत्रफळ आणि नद्यांमधील पाण्याचे प्रमाण जवळपास समान असल्याची आकडेवारीही धक्कादायक आहे. भारताचे एकूण भाैगाेलिक क्षेत्रफळ ३२.८० लाख वर्ग किलाेमीटर असून सर्व नद्यांमधील एकूण जलग्रहण क्षेत्र ३२.७ लाख चौ. मीटर आहे. देशातल्या नद्यांच्या मार्गातून दरवर्षी १९१३.६ अब्ज घनमीटर पाणी वाहत असून ते जगभरातील एकूण नद्यांच्या तुलनेत ४.४४५ टक्के आहे. बिहारमधील ९० टक्के नद्यांमध्ये पाणी शिल्लक राहिलेले नाही. मागच्या तीन दशकांत राज्यातील २५० नद्या लुप्त झालेल्या आहेत. काही दशकांपूर्वीच राज्यातल्या कमला, बलान, घाघरा या माेठ्या नद्या अनेक प्रवाहांमधून वाहत हाेत्या, पण आता त्या नष्ट झाल्या आहेत. झारखंडची स्थिती काही वेगळी नसून येथील १४१ नद्या लुप्त झाल्या आहेत.  


केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने २००९ मध्ये देशात एकूण १२१ प्रदूषित नद्या असल्याचे म्हटले हाेते. ही संख्या आता २७५ झाली आहे. केवळ एवढेच नाही तर आठ वर्षे आधी नद्यांच्या एकूण १५० भागात प्रदूषण आढळून आले असून आता ही संख्या ३०२ झाली आहे. प्रदूषण मंडळाने २९ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील एकूण ४४५ नद्यांचा अभ्यास केला असता यातील २२५ नद्यांचे पाणी अत्यंत खराब स्थितीत आढळले. या नद्यांच्या किनाऱ्यावरच्या शहरातील ६५० पैकी एकूण ३०२ ठिकाणी ६२ हजार एमएलडी गटारे, नाल्यांचे खराब पाणी नदीमध्ये मिसळले जाते. भारतात १२,३६३ किलाेमीटर क्षेत्रफळातून प्रदूषित नद्यांचे पाणी वाहते यातील १,१४५ किलाेमीटरचे क्षेत्र हे अत्यंत दूषित श्रेणीतले आहे. यामध्ये दिल्लीतील यमुना नदी अग्रस्थानी असून त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागताे. या राज्यात ४३ नद्या मृत्यूच्या उंबरठ्यावर आहेत. आसाममध्ये २८, मध्य प्रदेशात २१, गुजरातमध्ये १७, कर्नाटकमध्ये १५, केरळमध्ये १३, बंगालमध्ये १७, उत्तर प्रदेशात १३, मणिपूर आणि आेेडिशामध्ये १२-१२, मेघालयात १० आणि काश्मीरमध्ये ९ नद्या आपल्या अस्तित्वासाठी लढा देत आहेत.


अर्थव्यवस्थेचे ३९ अब्ज रुपयांचे नुकसान
सर्वसामान्यांची मजबुरी- देशातील १७ लाख गावांपैकी ७८ %  भागात गरजेपुरतेच पाणी पाेहचते. १९ हजारपेक्षा जास्त गावांत पाण्याचा काेणताही स्त्राेत नाही. हगवणीमुळे जवळपास १५ लाख मुलांचा अकाली मृत्यू हाेताे.


देशावर परिणाम-  पिण्याच्या पाण्याने आजारी पडून ७.३ काेटी कामाचे दिवस वाया जातात. त्यामुळे अर्थव्यवस्थेला दरवर्षी ३९ अब्ज रुपयांचे नुकसान हाेत आहे. 


पाण्याची आणखी बरबादी-  व्हाॅल्व खराब झाल्याने विविध महानगरांत १७ ते ४४ % पाणी वाया जाते.      

  
पंकज चतुर्वेदी 
(पाणी संकटावर ४ पुस्तके लिहिली आहेत)