राजस्थान / चालकाने डॅशबोर्डवर लावावेत पत्नी व मुलांचे फाेटो; अपघात टाळण्यासाठी परिवहन विभागाचे आदेश

अधिकाऱ्यांच्या बायको व मुलांचेही फोटो लावा
 

वृत्तसंस्था

Sep 22,2019 11:00:00 AM IST

नरेश वशिष्ठ

जयपूर - राजस्थान परिवहन विभागाने नव्याने काढलेल्या आदेशात सर्व सरकारी व खासगी वाहनांच्या चालकांनी वाहनांच्या डॅशबोर्डावर स्वत:सह पत्नी-मुले असलेले कौटुंबिक छायाचित्र लावावे, असे म्हटले आहे. हे छायाचित्र समोर असल्यास चालक चुकीच्या पद्धतीने वाहन चालवणार नाही, असे या विभागाचे मत आहे. मात्र, या आदेशाने नवा वाद निर्माण झाला असून आमच्या कुटुंबाचे छायाचित्र लावण्याऐवजी ज्यांचे वाहन आहे, ते आमच्या बायको-पोरांना पाहतील, त्याऐवजी त्या मालकाचे अथवा सरकारी अधिकाऱ्यांच्या कुटुंबाचे छायाचित्र लावले तर योग्य ठरेल, अशी चालकांत दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.


यामुळेच बहुतांश चालकांनी आपल्या कुटुंबांचे छायाचित्र अद्याप विभागाकडे दिलेले नाही. परिवहन आयुक्त (प्रशासन) अमृता चौधरी यांच्याकडे ९ सप्टेंबरपर्यंत आपली छायाचित्रे जमा करण्यास सांगण्यात आले होते. तसेच ती डॅशबोर्डावर लावायची होती. चालकांनी सांगितले, आम्ही कित्येक वर्षांपासून सरकारी वाहन चालवत आहोत, अाजवर अपघात झालेला नाही. परिवहन विभागाचे सचिव व आयुक्त राजेश यादव म्हणाले, योजनेनुसार कौटुंबिक छायाचित्रे लावण्याचा उद्देश चालकांनी बेदरकारपणे वाहन चालवू नये, असा आहे. या योजनेची सुरुवात परिवहनमध्ये झाली आहे. इतर विभागातही लवकरच लागू होईल. फाइल मंत्र्यांकडे गेली आहे.

अपघात वाढण्याचे चालकांचे मत
या आदेशाबद्दल चालकांचे मत असे की, कुटुंबाचे छायाचित्र असेल तर ठीक वाहन चालवणे शक्य नाही. कारण फोटोकडेच लक्ष राहील. उलट अपघात वाढतील.


अपघाताचे प्रमाण कमी झाले नाही
विभागात रस्ते सुरक्षा सेल तयार करण्यात आला आहे. रस्ते सुरक्षेवर सुमारे ८० कोटी रुपये खर्च होतात. परंतु रस्ते अपघात कमी झालेले नाहीत. राजस्थानात आजही दहा हजारांहून अधिक लोक दरवर्षी मृत्युमुखी पडत आहेत.

X
COMMENT