Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | DRM Yadav Surprise Visit at midnight

डीआरएम यादव यांची सरप्राईज व्हिजिट..मध्यरात्री टॉर्चच्या प्रकाशात 7 किमी पायी केले पेट्रोलिंग; पडताळली 'ट्रॅकमन'ची तत्परता

श्रीकांत सराफ | Update - Dec 23, 2018, 12:51 PM IST

भादली गेट, स्थानकावर अचानक केली तपासणी

 • DRM Yadav Surprise Visit at midnight

  भुसावळ- रेल्वे रुळांच्या देखभालीची जबाबदारी असणारे ट्रॅकमन रात्री किती तत्परतेने कर्तव्य बजावतात? याची पडताळणी डीअारएम अार.के. यादव यांनी केली. शुक्रवारी (दि.२२) रात्री ११ ते २.४५ दरम्यान भादली ते साकेगाव असे ७ किमी अंतर टॉर्चच्या प्रकाशात पायी चालून, त्यांनी रुळांची देखभाल करणाऱ्या चार ट्रॅकमनसोबत संवाद साधला. कामात अाळस करू नये, प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडावे, अशा सूचना त्यांनी गस्तीवरील ट्रॅकमनला (पेट्रोलमन) दिल्या.

  किमान १४ अंश तापमानामुळे कडाक्याच्या थंडीत त्यांनी स्वत: पेट्रोलिंग केली. या सरप्राईज व्हिजिटचा 'दिव्य मराठी'ने डीआरएम यादव त्यांच्यासोबत पायी चालून लाईव्ह रिपोर्ट घेतला.
  सध्या कडाक्याची थंडी असल्याने रेल्वे रुळांना तडे पडू शकतात. त्यामुळे ट्रॅकमनची जबाबदारी वाढली आहे. या कालावधीत ट्रॅकमन कर्तव्याला किती प्राधान्य देतात? याची पडताळणी करण्यासाठी डीअारएम यादव यांनी शुक्रवारी मध्यरात्री ७ किमी पायपीट केली. या सरप्राईज व्हिजिटसाठी डीआरएम यादव यांनी रस्तेमार्गाने भादली स्थानक गाठले. भादली रेल्वे गेट जवळील क्रॉसिंगवर गेटमनची कॅबिन गाठून तेथील रजिस्टर तपासले. यादव यांना अचानक समोर पाहून कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. कॅबिनची तपासणी केल्यानंतर त्यांनी भादली स्थानकावरील स्टेशन मास्तर कार्यालय गाठले. तेथील रजिस्टर तपासत गाड्यांच्या आगमनाची माहिती घेतली. यादव भादली स्थानकावर रात्री १२ ते १२.४० पर्यंत थांबून होते. यानंतर त्यांनी पहाटे २.४५ वाजेपर्यंत वाघूर नदीवरील पूल परिसरापर्यंत तपासणी केली. मंडळ अभियंता दीपककुमार, सहायक संरक्षा अधिकारी ए.डी.महा, प्रमाेद साळुंखे, उपनिरीक्षक लवकुश वर्मा हे त्यांच्या सोबत होते.


  त्रुट्या आढळल्या
  रेल्वे मार्गावरून रात्री टॉर्चच्या प्रकाशझाेतात डीअारएम यादव रेल्वे रूळ, स्लिपर, एसीबी प्लेट यांची पाहाणी करीत हाेते. काही ठिकाणी रूळांच्या अाणि स्लिपरच्या क्लिप (एसीबी प्लेट) निघालेल्या आढळल्या. त्यासंदर्भात दुरुस्तीची सूचना यादव यांनी दिली. रात्रीच्या कीर्द अंधारातही वरीष्ठ अधिकाऱ्यांची नजर किती चाणाक्ष असते, याचा अनुभव रेल्वे कर्मचाऱ्यांनी घेतला.


  पेट्राेलमनला कीट
  भादली ते साकेगाव पायी गस्तीदरम्यान डीआरएम यादव यांना चार पेट्रोलमन भेटले. त्यांना नवीन जॅकेट, बॅटरी, बॅगसह गस्तीवरील आवश्यक वस्तूंचे कीट डीआरएम यादवांनी दिले. बॅग आणि पिशव्या न अाणता मध्य रेल्वेचा शिक्का असलेली बॅगच साेबत अाणावी, असा सल्ला त्यांनी दिला. रेल्वे जॅकेटला रेडीयम असल्याने लोको पायलटला लांब अंतरावरून गस्तीवर असलेला कर्मचारी दिसू शकतो.


  भादली-साकेगावदरम्यान ११ ते २.४५ पर्यंत टॉर्चच्या उजेडात रुळ निरीक्षण
  ट्रॅकच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पेट्रोलमन्सला जॅकेट, टार्चचे वाटप
  तापमान @14°C


  वाघूर पुलाजवळ मध्यरात्री घेतला वृक्षारोपणाचा आढावा

  साकेगाव जवळील वाघूर नदीवरील नवीन पुलाची डीअारएम यादव यांनी पाहणी केली. या पुलाजवळ केलेल्या वृक्षाराेपणाची त्यांनी रात्री पाहणी केली. तसेच दरराेज वृक्षांना पाणी दिले जाते किंवा नाही? याची चौकशी केली. मध्यरात्री त्यांनी केलेल्या पाहणीमुळे खळबळ उडाली.


  वॉच : ३२५ पेट्राेलमनला दिले जीपीएस ट्रॅकर
  अनेक ट्रॅकमन रात्रीची गस्त नियमित करत नाहीत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने विभागातील ३२५ पेट्राेलमनला जीपीएस यंत्रणा दिली अाहे. ही यंत्रणा इंजिनीअरींग विभागाला जाेडली असून मंंडळ अभियंता दीपक कुमार यांच्या माेबाईलला संलग्न अाहे. त्यामुळे पेट्रोलमनच्या हालचालींवर लक्ष असते.


  किमान १४ अंश तापमानात भादलीपासून ६ किलोमीटर अंतरावर रोशन ईश्वर या पेट्रोलमनसोबत डीअारएम यादव यांनी पहाटे दीडच्या सुमारास संवाद साधला.


  धोका : थंडीमुळे 'रेल फ्रॅक्चर'ची भीती

  हिवाळ्यात १० अंशांपेक्षा कमी तापमान झाल्यावर रेल्वे रूळांना तडे पडतात. याला रेल्वेच्या भाषेत 'रेल फ्रॅक्चर' असे म्हटले जाते. रात्री १ वाजेनंतर तापमान कमी हाेत असल्याने रेल फ्रॅक्चर होण्याचा धोका असतो, असे मंडळ अभियंता दीपककुमार यांनी सांगितले.


  बॅटरीचे बिल मिळते का? कर्मचाऱ्याकडे विचारणा
  भादलीपासून भुसावळकडील रेल्वे मार्गावर डीआरएम यादव यांनी मध्यरात्री पायीच आगेकूच सुरू केली. भादली स्थानकापासून काही अंतरावर त्यांना पेट्रोलमन राहूल मुरलीधर भेटला. त्याच्याशी चर्चा करत डीआरएम यादव यांनी त्याचे नाव, गाव, किती किमी गस्त केली? किती वेळा रेल्वे फ्रॅक्चर सापडले? ही माहिती घेतली. तसेच रजा मिळते का?, रात्री गस्तीवरील टॉर्चच्या बॅटरीचे बिल मिळते का? कामावरील बुट किती दिवस टिकतात? असे प्रश्न विचारले. पुढे गेल्यावर विशाल पाटील, राेशन ईश्वर अाणि भूषण नावाच्या पेट्रोलमनशी डीआरएम यादव यांनी संवाद साधला. रेल्वे प्रवाशांची सुरक्षा तुमच्याच हातात आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे कर्तव्य बजावा, असे आवाहन यादव यांनी केले.

Trending