Srinagar / अमरनाथ यात्रा मार्गाची ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याने होणार निगराणी, भाविकांना बार कोड स्लिप मिळेल, त्यांच्या वाहनांना रेडिओ टॅग लावणार

१ जुलैपासून सुरू होतेय ४६ दिवसांची अमरनाथ यात्रा ; सुरक्षित-सोप्या यात्रेसाठी घेतली जात आहे तंत्रज्ञानाची मदत

विशेष प्रतिनिधी

Jun 25,2019 10:38:00 AM IST

श्रीनगर - अमरनाथची पवित्र यात्रा १ जुलैपासून सुरू होत आहे. यंदा ती ४६ दिवस म्हणजे १५ ऑगस्टपर्यंत चालेल. पुलवामा हल्ल्यानंतर होत असलेल्या या यात्रेच्या सुरक्षेसाठी लष्कर आणि श्री अमरनाथ देवस्थान मंडळाने आतापर्यंतची कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. यात्रा सोपी, शांततापूर्ण आणि दुर्घटनारहित व्हावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. यात्रा मार्गांवर २४ तास निगराणीसाठी आयपी आधारित हाय रिझोल्युशन सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. त्याद्वारे कंट्रोल रूमला ताफा आणि भाविकांचे रिअल टाइम फुटेज मिळेल तसेच सुरक्षा दलांदरम्यान समन्वय सोपा होईल. भाविकांची ओळख आणि लोकेशन जाणून घेण्यासाठी त्यांच्या प्रवासी स्लिपमध्ये बारकोड असेल. या स्लिमपमध्ये भाविकांची पूर्ण माहिती असेल. त्यामुळे किती भाविक गुहेपर्यंत पोहोचले याची माहिती प्रशासन आणि सुरक्षा संस्थांना मिळेल. त्याशिवाय स्लिपच्या ३ प्रती असतील. त्या भाविकांना तपासणीच्या वेळी दाखवतील. मागील वेळेप्रमाणेच यंदाही भाविकांच्या वाहनांना रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टॅग (आरआयएफडी) लावले जातील. भाविकांची ही वाहने जम्मूहून बेस कॅम्पपर्यंत निमलष्करी दलाच्या ताफ्यासोबतच जातील. या वर्षी हाय रिझोल्युशन कॅमेऱ्यांनी सज्ज ड्रोननेही मार्गाची निगराणी केली जाईल.


गर्दीवर नियंत्रणासाठी रोज फक्त ७५०० गुहेसाठी रवाना केले जाईल. यंदा ३० हजारपेक्षा जास्त अतिरिक्त निमलष्करी दलाचे जवानही तैनात केले आहेत. सीआरपीएफचे श्रीनगर सेक्टरचे आयजी रविदीप साहींनी सांगितले की, सुरक्षा दलाच्या ३०० कंपन्या (एका कंपनीत ८० ते १०० जवान) तैनात करण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी तीन स्तर असतील. पहिला स्तर सीआरपीएफचा, दुसरा राज्य पोलिसांचा आणि तिसरा लष्कराचा असेल.

बंदोबस्त : ११ माउंटन रेस्क्यू, १२ अॅव्हलांच रेस्क्यू टीमचीही मदत
यात्रा मार्गावर काही ठिकाणी फायर फायटिंग टीम, एक्सरे बॅगेज स्कॅनिंग युनिट्सही तैनात केले आहेत. नीलगड, पांचतारणी, पहलगाममध्ये हेलिपॅड बनवले आहेत. रस्त्यात बारकोड पॉइंट्स आणि दूरसंचारचीही व्यवस्था आहे. श्री अमरनाथ देवस्थान मंडळाचे सीईओ उमंग नरुला यांनी सांगितले की, २७ बचाव पथकेही तैनात राहतील. पोलिसांची ११ माउंटन रेस्क्यू टीम महिलांना आणि आजारी भाविकांना अडचणीत मदत करेल. १२ अॅव्हलांच रेस्क्यू टीमही तैनात केली जाईल.

मार्ग: ३८८८ मी. उंचीपर्यंत जाण्यास १४ आणि ४६ किमीचे २ रस्ते
काश्मीर खोऱ्यात ३८८८ मीटर उंचीवरील अमरनाथच्या पवित्र गुहेपर्यंत जाण्यासाठी दोन रस्ते आहेत. पहिला रस्ता पहलगामहून गुहेपर्यंत ४६ किमी लांब आहे. हा या तीर्थयात्रेचा ऐतिहासिक मार्ग आहे. त्यासाठी सुमारे ४६ दिवस लागतात. नवा मार्ग बालटाल येथून अमरनाथ गुहेपर्यंत जातो. तो १४ किमी लांबीचा आहे. त्याद्वारे गुहेपर्यंत जाण्यासाठी फक्त १ दिवस लागतो. आजकाल बहुतांश प्रवासी याच मार्गाचा वापर करतात.

X
COMMENT