Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | drought condition in marathwada

पाणीसाठे तळाशी, प्राण आले कंठाशी, पावसाळ्यातील 100 दिवसांच्या खंडाने दुष्काळ तीव्र

अजय कुलकर्णी | Update - Apr 11, 2019, 09:18 AM IST

राज्यातील बहुतांश जलसाठे मार्चअखेरच कोरडे पडले

 • drought condition in marathwada

  औरंगाबाद - गेल्या पावसाळ्यात सप्टेंबर कोरडा गेला. त्यातच कोकण वगळता इतर भागात पावसाने सलग १०० पेक्षा जास्त दिवस दडी मारली. त्यामुळे राज्यातील बहुतांश जलसाठे मार्चअखेरच कोरडे पडले. परिणामी भीषण पाणीटंचाई आहे. मे-जूनमध्ये पिण्याच्या पाण्याकरिता उद्योगांची पाणीकपात करावी लागण्याची शक्यता आहे. राज्यातील ११ जिल्ह्यांत सध्या गंभीर स्थिती आहे. जलसाठ्यांतील पाणी तळाशी जाऊन सर्वांचे प्राण कंठाशी आल्याचे सध्याचे चित्र आहे.


  जून ते सप्टेंबर २०१८ या महिन्यांत राज्यात बेताचा मोसमी पाऊस झाला. अनेक जिल्ह्यांत ऐन पावसाळ्यात सलग १०० पेक्षा जास्त दिवस पावसाने दडी मारली. सप्टेंबर कोरडा गेल्याने प्रमुख धरणे व प्रकल्पांत पाणीसाठा कमी झाला. जानेवारीअखेरपासून तापमान चढल्याने या प्रकल्पातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने झाले. परिणामी मार्चअखेर प्रमुख प्रकल्पात जलसाठा तळाशी आहे.


  २०१५ पेक्षा जास्त पाऊस, तरीही यंदाचा दुष्काळ जास्त भीषण : राज्यात २०१४ व २०१५ असा सलग दुष्काळ होता. २०१८ मध्ये तेव्हापेक्षा जास्त पाऊस होऊनही यंदाचा दुष्काळ भीषण आहे. २०१८ मध्ये पावसाचे असमान वितरण, मोठे खंड, सप्टेंबरमध्ये पावसाची दडी व एप्रिलपासूनच पारा ४० अंशांवर यामुळे यंदा दुष्काळाची तीव्रता वाढली आहे.


  ११ जिल्ह्यांत पाणीबाणी
  राज्यातील औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, जालना, लातूर, सोलापूर, नगर, जळगाव, नाशिक, बुलडाणा, यवतमाळ या ११ जिल्ह्यांत दुष्काळाची भीषणता जास्त आहे. राज्यात सध्या ३९७० टँकर सुरू असून त्यातील ५० टक्के टँकर या जिल्ह्यांत आहेत. या जिल्ह्यातील जायकवाडी, उजनी या प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.


  सर्वाधिक टँकर असलेले जिल्हे
  - औरंगाबाद ९१५
  - अहमदनगर ६८८
  - बीड ६५२
  - सोलापूर १६९
  - नाशिक १८४
  - जळगाव १०२
  - उस्मानाबाद ९३
  (स्रोत : पाणीपुरवठा विभाग)

Trending