Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | drought condition no jobs in maharashtra

गतवर्षीपेक्षाही यंदा कामांत घट; 6 महिन्यांपासून मागणी, पण ना कामे ना रोजगार

दीप्ती राऊत | Update - May 15, 2019, 10:36 AM IST

दुष्काळ असूनही महाराष्ट्र बाराव्या क्रमांकावर, मुख्यमंत्र्यांच्या आदेशालाच वाटाण्याच्या अक्षता

 • drought condition no jobs in maharashtra

  नाशिक - दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये रोजगार हमीअंतर्गत तातडीने जलसंधारण आणि मृदसंधारणाच्या २८ कामांना मान्यता दिल्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील सरपंचांशी संवाद साधत असताना नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक तालुक्यातील अस्वली गावातील मजूर त्यांचे कोरे जॉबकार्ड दाखवत होते. या गावातून १०० जणांनी गेल्या सहा महिन्यांपासून कामाची मागणी नोंदवूूनही गावात रोजगार हमीची कामे सुरू झाली नसल्याच्या तक्रारी सांगत होते. विशेष म्हणजे, २४ जानेवारीच्या बैठकीत रोहयो उपजिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ कामे काढण्याबाबत दिलेली आश्वासनेही वाऱ्यावर उडाली. १०० मजुरांच्या मागणीवर काढण्यात आलेल्या दोन दगडी बंधाऱ्यांच्या कामांवर फक्त १८ लोकांना ३ दिवस काम मिळाल्याची तक्रार सोमा लचके यांनी ‘दिव्य मराठी’कडे केली. ऑगस्टपासून पावसाने दडी मारल्याने त्यांच्या शेतात भातही आला नाही. तेव्हापासून त्यांची कामासाठी सुरू झालेली वणवण आजही कायम आहे. फक्त त्र्यंबकच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. राष्ट्रीय रोजगार हमी कायद्याच्या शासकीय वेबसाइटवरील आकडेवारीनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात रोजगार हमीच्या कामांची संख्या घटली आहे.


  सरकारी खात्यांत समन्वयच नाही
  राज्याच्या मुख्यालयापासून १५० किलोमीटरील त्र्यंबकेश्वर या आदिवासीबहुल तालुक्यातून रोजगार हमी कायद्याखाली कामे मिळावीत म्हणून अनेक आदिवासींनी मागणी अर्ज केले आहेत. एप्रिलमध्ये निवडणूक आचारसंहितेचा बागुलबुवा सरकारी यंत्रणेने उभा केला. प्रत्यक्षात ही मागणी ६ महिन्यांपूर्वीच करण्यात आली होती. ऑगस्टमध्ये कमी पावसाची कल्पना आल्यानंतरच लोकांनी ग्रामसेवक आणि ग्रामरोजगार सेवक यांच्या माध्यमातून पंचायत समितीकडे रोहयोच्या कामांची मागणी नोंदवली. ग्रामसभेत कामांच्या याद्यांचे ठराव मंजूर करण्यात आले. मात्र ही कामे कृषी खात्याने करावीत की लघुपाटबंधारे खात्याने याबाबत यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याने कामेच काढली जात नसल्याचे कर्मचारी सांगत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.


  अजूनही कामं सुरू झाली नाही...
  ५० जणांनी कामाची मागणी केली. एका दगडी बांधाचं एकच काम काढलं. तेही दोन दिवसांत संपलं. १५० दगडी बांधांचा ठराव मंजूर केला होता. सपाटीकरण, खाचरं, बंधारे अशी बरीच कामे आहेत. अजून कामं सुरू झाली नाही. आता होतील तेव्हा आमची शेताची तयारी सुरू झालेली असेल. त्याचा काय उपयोग? - गणपती ढोले, मागणीदार, देवगाव


  दुष्काळातही लोकांना कामे नाही
  रोहयो कायद्यानुसार सरकारने मागणी येण्याआधीच शेल्फवर कामे तयार ठेवणे अपेक्षित आहे. महाराष्ट्रात कामांच्या यादीलाच “शेल्फ’ म्हटले जाते आणि नंतर अंदाजपत्रके तयार करण्यात वेळ जातो. १९७२ च्या दुष्काळात महाराष्ट्रात जन्मलेली रोहयो इतर राज्ये यशस्वीपणे राबवत आहेत आणि आपण दुष्काळातही लोकांना कामे देऊ शकत नाही. - अश्विनी कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्त्या, प्रगती अभियान


  खूप अर्ज-विनंत्या केल्या, तरीही काम मिळाले नाही
  माझी ७ एकर जमीन आहे, पण पावसाअभावी अनेकांना कामाची खूप गरज आहे. रोजगार हमीची कामे मिळावीत यासाठी आम्ही खूप अर्ज-विनंत्या केल्या. पंचायत समितीपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत चकरा मारल्या. शेवटी लोक गाव सोडून सातपूरला, नाशिकला कामासाठी निघून गेले. तिथे रस्त्यावर राहून पोट भरत आहेत. गावात रोजगार हमीची कामे निघाली असती तर ही वेळ आली नसती.
  - कृष्णा लचके, मागणीदार, अस्वली गाव

Trending