दुष्काळ / आता आपण हरलोय, असेच समजून आम्ही रोज थोडाथोडा मृत्यू पीत आहोत; रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांची आपबीती

सातपुड्याच्या गुलाबवाडीची व्यथा, घराेघरी किडनीचे रुग्ण
 

दिव्य मराठी

May 14,2019 09:40:25 AM IST

जळगाव - आम्ही आता हरलो, असे समजून रोज थोडाथोडा मृत्यू पीत आहोत. किडनीचा आजार जडून केव्हा मरण येईल सांगता येत नाही, असे म्हणून हताश झालेले गुलाबवाडीतील (ता. रावेर) शेतकरी नंदलाल राठोड यांनी गावाला ८ वर्षांपासून होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्याची माहिती देत आपबीती सांगितली. सातपुड्यातील पालपासून ५ किमीवरील गुलाबवाडीत पाणीपुरवठा करणाऱ्या ट्यूबवेलमधून दूषित व अतिक्षारयुक्त पाण्याने किडनी विकाराने ६ वर्षांत १० मृत्यू, तर ७० रुग्ण बाधित आहेत. ३ रुग्ण गंभीर आहेत. ४९० लोकसंख्येच्या गावात २०११ पासून ट्यूबवेलद्वारे पाणीपुरवठा होतो. आधी तो विहिरीतून व्हायचा. पण रात्री महिलांना विहिरीवर जाणे गैरसोयीचे असल्याने ग्रामपंचायतीने नवा ट्यूबवेल सुरू केला अन् २ वर्षांतच गावकऱ्यांना किडनी आणि मुतखड्याच्या आजाराने ग्रासले.

आईने किडनी दान केली, तरी हतबल
गेल्या दोन महिन्यांत तर एका युवकासह मजुराचा किडनीच्या आजाराने जीव गेला. रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून एकदा का हा आजार जडला की किडनी प्रत्यारोपण नाही तर मृत्यू हेच पर्याय उरतात. गावातील गणेश पवारने त्याची शेती विकली आणि उपचारासाठी ते पैसे खर्चून आईने किडनी दिल्याने प्राण वाचले. इतके करून तो जिवंत आहे, पण घराच्या बाहेर पडून काम करू शकत नाही.

गावकरी भयभीत, प्रशासनाचे दुर्लक्ष
नंदलाल म्हणाले, नवे ट्यूबवेल मिळावे म्हणून ५-६ वर्षांपासून सरपंच, आमदारांना निवेदने, तक्रारी केल्या. फक्त आश्वासने मिळाली. आजही कोणी थंडी-तापाने आजारी पडले तर पोटात भीतीचा गोळा उठतो व रक्त, लघवी तपासणीसाठी दवाखाने सुरू होतात. यंदा पाणीटंचाई असल्याने तेच दूषित पाणी पिण्याशिवाय म्हणजेच मरणाला कवटाळल्याशिवाय गत्यंतर नाही, अशा मानसिकतेत ग्रामस्थ आहेत.

६-७ लाख रुपये खर्च केले, तरीही आई वाचली नाही...
‘सर्वात आधी आई यशोदाबाई रोडू राठोड (५०) हिला त्रास होऊ लागला म्हणून रावेरचे डॉ. डी.एम. दलाल यांच्याकडे तपासणीसाठी नेले. त्यांनी आजारांच्या लक्षणावरून गावाला होणाऱ्या पाण्याची माहिती व तपासून घ्यायला सांगितले, तेव्हा किडनीचा आजार व त्याचे मूळ समोर आले. उपचारासाठी ६-७ लाख खर्च केले, पण २०१३मध्ये तिचा मृत्यू झाला,’ असे सांगताना नंदलाल राठोड गहिवरले. त्यानंतर किडनीच्या आजाराने गावात पाय रोवला आणि घरा‌घरात आजाराने बाधित रुग्ण दिसू लागले. आपली आई व्यालीबाई बाजीराव पवारचाही याच आजाराने मृत्यू झाल्याचे पीठगिरणी चालक हंसराज पवार म्हणाले. तेव्हापासून आतापर्यंत लहान-मोठ्यांसह दहा जणांचा मृत्यू झाला आहे.

X