आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
उस्मानाबाद- मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट असतानाही लातूर, उस्मानाबाद येथील बळीराजाने पारंपरिक पद्धतीने शनिवारी वेळ अमावास्या सण साजरा केला. शेतामध्ये पिके व मातीपासून बनवलेल्या पंचमहाभूत (पांडवांची) पूजा करत शेतकऱ्यांनी सहकुटुंब दुष्काळाशी दाेन हात करण्याचा संकल्प केला. लातूर व उस्मानाबाद परिसरात दरवर्षी हा सण माेठ्या उत्साहात साजरा केला जाताे. शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवत शेताशेतात पूजा-अर्चना केली जाते. निसर्ग देवतेला वंदन करून नवीन संकल्प केले जातात.
सातत्याने पडणारा दुष्काळ, शेतीमालाचे घसरते दर आणि मजुरांची कमतरता यामुळे शेती व्यवसाय तोट्यात आहे. मात्र, अशा परिस्थितीतही वेळ अमावास्येला शेतशिवार फुलून जातात. पूजा झाल्यानंतर आग्रहाने निमंत्रित केलेल्या मित्र, पाहुण्यांच्या जेवणाच्या पंगती बसवल्या जातात.
सर्वांचीच पावले गावाकडे वळत असल्याने शनिवारी लातूर व उस्मानाबाद शहर ओस पडले हाेते. व्यापाऱ्यांनी त्यांची प्रतिष्ठाने बंद ठेवली हाेती. शाळा-काॅलेजही बंद हाेते. कडब्यापासून तयार केलेल्या कोपीमध्ये शेतीत असणाऱ्या सर्व पिकांची व मातीपासून बनवलेल्या पांडवांची (पंचमहाभूते) पूजा करतात.
'इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे'
अगदी सकाळपासूनच शेताकडे जाण्यासाठी शेतकऱ्यांची कुटुंबासह घाई होती. शेतकऱ्यांनी शेतात एक कोपी तयार करून त्याच ठिकाणी धान्याची आणि मांडलेल्या पांडवांची पूजा करून एका अर्थाने वनराईची भक्तिभावाने पूजा केली. आंबील वाटीत घेऊन शेतकरी भाऊ-भाऊ, पिता-पुत्र, आजाेबा-नातू आदींनी पूजेभोवती प्रदक्षिणा घातली. या वेळी 'इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे' असा घोष याप्रसंगी करण्यात आला.
स्पेशल मेनू...
आंबील, उंडे, शेंगा चटणी, गव्हाची खीर, भज्जी, खिचडी, लोणचे, ठेचा, चपाती, ज्वारी आणि बाजरी भाकरी, धपाटे, शेंगा गुळाची पोळी असा जेवणाचा मेन्यू असताे.
येळ्ळ अमावास्येवरून वेळ अमावास्या
कर्नाटक व महाराष्ट्राच्या उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यासोबत शेजारील तालुक्यांमध्ये मार्गशीर्ष अमावास्या म्हणजेच वेळ अमावास्या ही अमावास्या दर्शवेळ अमावास्या म्हणूनही ओळखली जाते. मूळ कानडी शब्द 'येळ्ळ अमावास्या' म्हणजे पेरणीनंतर येणारी सातवी अमावास्या येळी अमावास्या. याचाच अपभ्रंश होऊन वेळ अमावास्या शब्द रूढ झाला.
लातूरमध्ये शुकशुकाट
वेळ अमावास्येसाठी लातूरकरांनी शेतशिवार गाठल्याने शनिवारी दिवसभर शहरात शुकशुकाट हाेता. सर्वच व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली हाेती. तर शाळा, महहाविद्यालयेही बंद असल्याने शहर ओस पडले हाेते.
साऱ्यांनी लुटला भाेजनाचा आस्वाद
यंदा पावसाअभावी रब्बीची पेरणी ६० टक्केच झाली. ४० टक्के शेतजमीन पेरणीअभावी पडून आहे. अशा परिस्थितीतही दरवर्षी केला जाणार सण म्हणून सगळी मंडळी शेतात पोहोचलीच. पूजा व गप्पाटप्पा झाल्यानंतर साऱ्यांनी शेतातच अस्सल गावरान पदार्थांचा आस्वाद घेतला. साऱ्यांनीच वेळ अमावास्या आनंदात साजरी केली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.