आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थेंबे थेंबे तहान भागे... जीव धाेक्यात घालून थेंब थेंब पाणी मिळवतात लोक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवापूर- नंदुरबार जिल्ह्यातील तिनसमाळ या अतिदुर्गम गाव व परिसरातील कुटुंबीयांना थेंब थेंब पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. डुठ्ठलपाड्याचा खाटपाणी घाटातील १५० मीटर खाेल झऱ्यातून या गावकऱ्यांना पाणी मिळवावे लागते. झऱ्याच्या थेंब थेंब पाण्यातून हंडा भरण्यासाठी एक ते दीड तास लागताे. सकाळी लवकर नंबर लागत नसल्याने आदिवासी महिला मध्यरात्री १ वाजेपासूनच पाणी भरतात. दिवसभर या ठिकाणी पाण्यासाठी अक्षरश: रांगा लागतात. 

 

झऱ्याच्या ठिकाणी जाण्यासाठी कच्ची पायवाट आहे. थाेडा ताेल गेला तरी ८०० मीटर खाेल दरीत काेसळून जीव जाण्याचा धाेका. वन्यप्राण्यांचा धाेका ताे वेगळाच. यापूर्वी याच ठिकाणी पाणी भरणाऱ्या बालकास बिबट्याने ठार मारले हाेते. तर ७ जण दरीत ताेल जाऊन गंभीर जखमी झाले हाेते. गावातील भौगोलिक परिस्थिती बिकट असल्याने पाणीपुरवठा योजना, बोअरवेल, विहिरी, हातपंप करणे अवघड आहे. त्यामुळे डुठ्ठल पाड्यावर पिण्याच्या पाण्याचे झरा हेच साधन आहे. वन्यप्राण्यासह ग्रामस्थ याच झऱ्यावर तहान भागवतात. 

 

१५ दिवसांनी अंघाेळीचा 'याेग' :

या भागात पुरेसे पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांना १५ दिवसांतून एकदा अंघोळ करावी लागत आहे. त्यामुळे आराेग्याचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. अनेक ग्रामस्थांना विविध त्वचारोगाने ग्रासले आहे. ज्या अन्नपदार्थांना जास्त पाणी लागते, ते अन्नपदार्थ ग्रामस्थ सध्या तयार करणे टाळतच आहेत. पातळ भाजी, भात किंवा खिचडी महिन्यातून एक-दोन वेळाच खातात. उन्हाळ्यात झरा काेरडा पडल्यास ३ किमी पायपीट करून, ३ पर्वत चढून हंडाभर पाणी मिळण्यासाठी धडपड करावी लागते, असे येथील ग्रामस्थ सांगतात. 

 

हिरे व्यापारी सवजीभाईंची मदत, मात्र सरकारचे साफ दुर्लक्ष 
तिनसमाळ परिसरात चार पाडे आहेत. गुजरातमधील हिरे व्यापारी सवजीभाई धाेलकिया यांनी मागील वर्षी यापैकी दाेन पाड्यांवर स्वखर्चाने पाण्याची साेय केली हाेती. सरकारने मात्र या भागाकडे कधीच लक्ष दिले नाही. आमचा पाडा अजूनही पाण्याच्या प्रतीक्षेत आहे, अशी प्रतिक्रिया इमाबाई भाईदास पावरा या ग्रामस्थांनी दिली. 
 

बातम्या आणखी आहेत...