आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

योजना बंद; कूपनलिका मोजताहेत शेवटची घटका, स्वातंत्र्यापूर्वीचा आड भागवतोय अर्ध्या तेरची तहान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेर- दुष्काळाच्या भीषण परिस्थितीत अर्ध्या तेरकरांची तहान स्वातंत्र्यापूर्वीचा आड भागवत आहे. तेरसाठी दोन पाणीपुरवठा योजना राबवूनही ग्रामस्थांचा घसा कोरडाच आहे. कूपनलिका शेवटची घटका मोजत आहेत. भविष्यात ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाने स्वातंत्र्यापूर्वी खोदलेल्या मात्र सध्या पाणी उपलब्ध असलेल्या विहीर व आडातील गाळ काढण्याची गरज आहे. 

 

उस्मानाबाद तालुक्यातील तेर गावाची साधारण १८ हजार लोकसंख्या आहे. गावासाठी सर्व प्रथम १९७६ मध्ये ग्रामपंचायतच्या वतीने ५ लाख रुपये खर्च करून तेरणा नदीवरून नळाद्वारे पाणीपुरवठा योजना राबविली. यासाठी ४ लाख ३५ हजार लिटरचा जलकुंभ बांधण्यात आला. ७४६ वैयक्तिक व २० सार्वजनिक नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. त्यानंतर २००६ मध्ये महाराष्ट्र जिवन प्राधीकरणाने चार गाव पाणी पुरवठा योजना राबविली. त्यात तेरचा समावेश करण्यात आला. या संपूर्ण योजनेवर १५ कोटी ९९ लाख रुपये खर्च झाला. त्यामधून तेरसाठी नवीन ४ लाख ५० हजार लिटर क्षमतेचा पेठ विभागात व १ लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ उभारले गेले. तीन जलकुंभ व १४८५ नळाद्वारे तेरला सुरळीतपणे पाणीपुरवठा सुरू झाला परंतु ही योजना प्रचंड तोट्यात गेल्याने २०१५ पासून कायमस्वरूपी बंद करण्यात आली. मात्र, सध्या मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेत या पाणीपुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन झाले. त्यासाठी ३ कोटी ६३ लाख रुपये मंजूर झाले. परंतु, दुरुस्ती प्रक्रिया व सौरऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी बराच काळ लोटणार आहे. तोपर्यंत तेरणा धरणात एक थेंबही पाणी रहाणार नाही, त्यामुळे या योजनेवरील तेर-ढोकी-येडशी-तडवळा या भागातील ८० हजार नागरिकांचा घसा कोरडाच राहणार आहे. 

 

तेर परिसरातील स्वातंत्र्यापूर्वीच्या विहिरी, आडाची दुरुस्ती करण्याची गरज 
तेरणा नदीच्या काठावरील १७ ते २० फूट खोल आड सध्या टप्प्या-टप्प्याने अर्ध्या तेरकरांची तहान भागवत आहे. त्यामुळे या आडाची दुरुस्ती करण्याची गरज आहे. 

 

७२ चा दुष्काळही तारला 
कूपनलिकेला पाणी मिळणे कठीण झाले आहे. असे असताना तेर येथील जुन्या बसस्थानकाजवळ तेदणा नदिकाठी स्वातंत्र्यापूर्वी १७ ते २५ फुट खोल व १५ फुट रूंदीचा आड सध्या निम्म्या तेरची तहान भागवत आहे. तेरमधील तीन ते चार आडाची दुरुस्ती केली तर नक्की चांगले पाणी मिळू शकेल. १९७२ च्या दुष्काळासह अनेक लहान मोठ्या दुष्काळात या आडाने साथ दिली आहे. 

 

नदीतील पाणी आटले 
७० ते ८० च्या दशकात नदीमध्ये थापझऱ्यामधून पाणी मिळत होते. आता पाणी पातळी खोल गेल्याने विहिरी तर आटल्याच परंतु बोअरची पाणी पातळी खोल गेली. 

 

सांडपाणी म्हणून तेरणेतील पाणी नळाला 
सध्या सांडपाणी म्हणून ग्रामपंचायतच्या वतीने तेरणा धरणातील पाणी सोडण्यात येत आहे. परंतु, धरणातच अवघे सव्वा तीन टक्के पाणी शिल्लक आहे. त्यामुळे पुन्हा नागरिकांना पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे. 

 

तेरसह ९ खेड्यांना शाश्वत पाणीपुरवठ्याचा प्रश्न चर्चेनंतर विरला 
शाश्वत पाणीपुरवठा करावा म्हणून चर्चा करण्यासाठी आमदार पाटील यांनी ६ सप्टेंबर २०१६ रोजी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. त्यामध्ये चार गावची १ लाख लोकसंख्या गृहीत धरून उजनी धरणातून पिण्यासाठी ४ एमएलडी व जनावरासाठी ३ एमएलडी पाणी तेरणा धरणात सोडण्याची मागणी पुढे आली होती. मात्र, सध्या हा मुद्दा अडगळीस पडला आहे. गावात लोकसहभागातून घेतलेल्या कूपनलिकेला आमदार पाटील व आमदार चव्हाण यांनी विद्युत पंप दिले. त्यातून काही दिवस पाणी मिळाले मात्र, सध्या शेवटची घटका मोजत आहेत. 

 

टंचाई जाणवल्यास उपाययोजना करण्यात येतील 
तेरच्या नागरिकांची पाणीपुरवठ्याची गरज ओळखून यापूर्वीच ३ बोअर अधिग्रहन केले आहेत. दोन नवीन प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहेत. उपलब्ध पाणी काटकसरीने वापरावे. -विजयसिंह नलावडे, ग्रामविकास अधिकारी,