Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | drought in Water Resources Minister's tahsil

जलसंपदामंत्री महाजन यांच्या तालुक्यात पाण्याअभावी लग्नसोहळे लांबणीवर

विकास पाटील | Update - May 08, 2019, 10:10 AM IST

जामनेर तालुक्यात भयावह स्थिती: अनेक गावांना १० ते २५ दिवसांआड पाणीपुरवठा, सिंचन प्रकल्पांत केवळ मृतसाठा, मुक्या प्राण्यांचेही हालहाल

 • drought in Water Resources Minister's tahsil

  राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यावर भीषण दुष्काळाची छाया आहे. जिल्ह्यात गावागावातील विहिरी, कूपनलिका, तलाव, जलसिंचन प्रकल्प आटल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी कामधंदा साेडून रानावनात भटकंती करावी लागत आहे. तरीही पाणी मिळत नसल्याने ५० रुपयांत २०० लिटर पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत असल्याचे चित्र आहे. विकतचे पाणी परवडत नसल्याने चक्क लग्नसोहळा लांबणीवर टाकण्याची वेळ जिल्ह्यातील नेरी दिगर या गावातील नागरिकांवर आली आहे. जेथे माणसांनाच पिण्यासाठी पाणी नाही तर जनावरांना पाणी कुठून मिळणार? मुके प्राण्यांचे हाल तर वेगळेच.


  नागरिक म्हणाले, निवडणुका संपल्यानंतर कुणी लक्ष देईना :
  गाडेगाव, नेरी दिगर, पळासखेडा मिराचे, मोरगाव तांडा, रोटवद, नांद्रा, शंेदुर्णी, पहूरपेठ, पहूर कसबे आदी गावांना भेट दिली असता या प्रत्येक गावाला दुष्काळाच्या तीव्र झळा बसत असल्याचे दिसून आले. पाण्यासाठी बायाबापड्या रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता रानावनात भटकंती करताना दिसून आल्या. शाळांना सुट्या असल्याने मुलांच्या डोक्यावर हंडा तर शाळकरी मुलींच्या कमरेवर कळशी होती. कालबाह्य पाणी योजना, गैरव्यवहारांमुळे काही गावांमध्ये रखडलेल्या योजना, जलसंधारणाची कामे तसेच धरण, तलाव, लघुप्रकल्पांमधील गाळ काढण्याकडे झालेले दुर्लक्ष व निसर्गाची अवकृपा यामुळे तालुक्यातील अनेक गावे तहानलेली आहेत. वर्षानुवर्षे ही स्थिती कायम आहे. सुस्त प्रशासन आणि दुलर्क्ष करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर लोकांचा राग आहे.

  शेंदुर्णी, पहूरवासीयांची तहान भागेना
  शेंदुर्णी हे जामनेर तालुक्यातील हे सर्वात मोठे गाव. गावात फेरफटका मारला असता नागरिक म्हणाले, १५ दिवसांआड पाणीपुरवठा होतो. तोही अशुद्धच असतो. वर्षानुवर्षे टंचाई कायम आहे. याचे खापर गावकरी प्रशासनावर फोडतात.


  > पहूरपेठेत खांद्यावर कावड घेऊन जाणारा शेख गनी भेटला. सुमारे ४० वर्षांपासून तो चाैकातील हाॅटेल्स, रेस्टाॅरंट, शीतपेय विक्रेत्यांकडे येणाऱ्या ग्राहकांची तहान भागवतोय. २० रुपयांत ३० लिटर पाणी तो िवक्री करतो. यावरून पहूरमधील पाणीटंचाईचा अंदाज येतो.


  > पळासखेडा मिराचे येथून माेरगाव तांडाकडे जात असताना काही महिला हातपंपानजीक महिला व मुली धुणे धुत होत्या. गावात पाणी नसल्याने कामधंदा साेडून येथे यावे लागते. हातपंपही टप्पा घेतो. हातपंपानजीक घाण पाणी साचले आहे. मात्र काय करणार? अशी हतबलता त्यांनी व्यक्त केली.

  घरी पाहुणे आल्यास अंगावर काटा उभा राहतो : नागरिक
  १४ हजार लोकवस्तीचे पळासखेडा मिराचे हे गाव. कडेला असलेल्या पानटपरीवर थांबलो. भाऊ पिण्याच्या पाण्याची काय परिस्थिती आहे, असे विचारताच, पाण्याचे विचारू नका. २१ दिवसांआड पाणीपुरवठा होतो. टँकरने गाव विहिरीत पाणी सोडले जाते. तेथून टाकीत व नंतर गावात नळाद्वारे पुरवठा होतो. घरी पाहुणे आल्यास अंगावर काटा उभा राहतो. ५० रुपयांत २०० लिटर पाणी मिळते.

  रोटवदला वर्षभर टंचाई, श्रमदानातून जलसंधारण
  रोटवद हे जामनेर तालुक्यातील शेवटचे गाव. येथे गेल्या वर्षी तर वर्षभर टँकर सुरू होते. यामुळे गावकऱ्यांनी आता गाव टँकरमुक्त करण्याचा निश्चय केला आहे. पा‌णी फाउंडेशनच्या अभियानातून श्रमदान जाेमाने सुरू आहे. यामुळे गाव व परिसराचे चित्र बदलत आहे. मातीबांध, समपातळी चर, नाला खोलीकरण, शेततळे दिसू लागले आहेत. घरोघरी शोषखड्डे केले जात आहेत.

  जिल्ह्यामध्ये पाच हजार शेततळी उभारणार
  यंदा अत्यल्प पाऊस झाला. धरणांत अत्यल्प जलसाठा झाला. तो उन्हाच्या झळा बसण्यापूर्वीच संपला. आचारसंहिता शिथिल झाल्याने उपाययाेजना करू. दोन दिवसात टंचाईचा आढावा घेणार आहे. तालुक्यात ५ हजार शेततळे तयार करण्यात येणार आहेत. तालुका अागामी काळात टंचाईमुक्त होईल.
  ‌-गिरीश महाजन, जलसंपदामंत्री

Trending