आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परतीचा पाऊस लांबला; १० जिल्ह्यांत दुष्काळसदृश स्थिती, १५ सप्टेंबरनंतर राज्यात पुनरागमनाची शक्यता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- ऑगस्टच्या मध्यात राज्याला चिंब करून पाऊस गायब झाला आहे. सध्या नैऋत्य मान्सूनचा आस उत्तरेकडे असून अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरातही मान्सूनला अनुकूूल हालचाली नाहीत. त्यामुळे परतीचा मान्सून लांबला आहे. राज्यात बहुतांश भागात १८ ऑगस्टनंतर दमदार पाऊस झालेला नाही. पावसात २४ दिवसांचा खंड पडल्याने खरिपातील पिके कोमजू लागली आहेत. राज्यातील १० जिल्ह्यांत पावसाची मोठी तूट पडली असून या जिल्ह्यांत दुष्काळसदृश स्थिती आहे. राज्यावर दुष्काळी ढगाचे मळभ दाटू  लागले आहे. त्यातच मान्सूनच्या शेवटच्या टप्प्यावर अल निनोचे सावट असल्याचे अंदाज व्यक्त झाल्याने चिंतेत भर पडत आहे. 


सप्टेंबरमध्येच ऑक्टोबर हीट : पावसाचा २४ दिवसांचा खंड
राज्यात सप्टेंबरमधील सरासरीपेक्षा २ अंश सेल्सियसने तापमानात वाढ दिसते आहे. सप्टेंबरमध्येच ऑक्टोबर हीटचा अनुभव येत आहे. मंगळवारी नगर, जळगाव, सोलापूर जिल्ह्यांत तसेच मराठवाडा व विदर्भात बहुतांश ठिकाणी ३२ ते ३४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.


शनिवारनंतर पावसास अनुकूल स्थिती  
मान्सूनच्या हालचाली सध्या मंदावल्या आहेत. महाराष्ट्रात १५ सप्टेंबरनंतर पावसास अनुकूल वातावरण तयार होईल, १७ सप्टेंबरनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. परतीचा पाऊस लांबल्याने यंदा मान्सून १५ ऑक्टोबरपर्यंत राज्यात मुक्कामी राहण्याचीही शक्यता आहे. 
- डॉ. रामचंद्र साबळे, हवामान तज्ञ 


पीक उत्पादनात ३० टक्के घटीची शक्यता 
पिकांच्या ऐन वाढीच्या काळात पावसाने दडी मारल्याने खरिपातील कापूस, सोयाबीन, मका, तुरीच्या उत्पादनात ३० ते ४०% घटीची शक्यता आहे. ताणाच्या काळात पोटॅशियम नायट्रेट (१० लिटर पाण्यात १५० ग्रॅम) किंवा युरियाची (२०० ग्रॅम १० लिटर पाण्यात) फवारणी करावी. 
- डॉ. एस. बी. पवार, सहयोगी संचालक, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, औरंगाबाद

बातम्या आणखी आहेत...