Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Drought tour in 7 hours by Central team hours See also hour

'सुटाबुटा'मधील केंद्रीय पथकाने ७ तासांत उरकला दुष्काळी दौरा

प्रतिनिधी | Update - Dec 06, 2018, 10:48 AM IST

केंद्रीय पथकाकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी, शेतकऱ्यांशी साधला संवाद

 • Drought tour in 7 hours by Central team hours See also hour

  नगर - दिल्लीतील सुटाबुटातील केंद्रीय दुष्काळी समितीने नगर जिल्ह्यातील दुष्काळी गावांना भेटी देऊन दुष्काळाची स्थिती जाणून घेतली. बुधवारी दुपारी १ वाजता सुरू झालेला हा दौरा रात्री सात वाजता संपला. या दौऱ्यात समितीने शेतकऱ्यांशी संवाद साधत माहिती घेतली. दरम्यान, पालकमंत्री राम शिंदे यांनी ही दुष्काळी समितीबरोबर पाथर्डी तालुक्यात पाहणी केली.

  कमी पावसामुळे नगर जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये दुष्काळाची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या महिन्यातच या तालुक्यांमध्ये सरकारने दुष्काळ जाहीर करुन दुष्काळी उपाययोजना लागू केल्या आहेत. जानेवारी महिन्यापासून सुरू होणारे पाणी टँकर यंदा ऑक्टोबर महिन्यापासून सुरू झाले आहेत. जिल्ह्यात टँकरची संख्या दोनशेवर गेली आहे. पाणी टंचाईबरोबर चारा टंचाईनेही डोके वर काढले असून, बाजारात चारा आवक कमी झाल्याने जनावरांना चारा कोठून आणायचा असा प्रश्न पशुपालकांसमोर उभा राहिला आहे.

  जिल्ह्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सुटाबुटातील केंद्रीय पथकाने दुष्काळाची स्थिती जाणून घेतली. केंद्र सरकारचे तीन सदस्यीय पथक सकाळी जिल्ह्यात दाखल झाले. या पथकाने जिल्ह्यातील पाथर्डी, कर्जत, जामखेड भागातील टंचाई परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. प्रत्यक्ष वस्तुस्थिती आणि जिल्हा प्रशासनाकडून घेतलेली माहितीचा अहवाल केंद्र शासनाकडे सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय अर्थ मंत्रालयातील सहसंचालक सुभाषचंद्र मीना यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्य पथकाने जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला.

  या पथकात पशुधन व दुग्धविकास विभागाचे एल. जी. टेंभुर्ण, विजय ठाकरे यांचा समावेश होता. राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे हेही या पथकासोबत होते. पालकमंत्री राम शिंदे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, आमदार मोनिका राजळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांनीही पथकाशी चर्चा करून जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती दिली. पथकाने प्रारंभी शेवगाव तालुक्यातील तळणी शिवारातील विष्णू शंकर सातपुते या शेतकऱ्यांच्या शेतात भेट दिली. या वेळी त्यांनी तेथील कपाशी आणि तूर पिकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांकडून परिस्थितीची माहिती घेतली.

  जिल्हाधिकारी राहुल दिवेदी यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यावेळी त्यांच्यासोबत होते अतिशय आपुलकीने शेतकऱ्यांची संवाद साधत आणि परिस्थितीची माहिती घेत त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. आणि या संदर्भात केंद्र शासन निश्चितपणे उपायोजना करेल अशी ग्वाही दिली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती तसेच त्यामुळे परिस्थितीवर झालेला परिणाम आगामी पाणीपुरवठा पाणी पुरवठा होणारा परिणाम पशुधन व चाऱ्याची व्यवस्था या अनुषंगाने संपूर्ण माहितीचा अहवाल सादर करण्यात आला जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनीही या पथकाची पाथर्डी येथे भेट घेऊन त्यांना जिल्ह्यात निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल अवगत केले. या परिस्थितीत या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी केंद्र शासनाकडून तत्काळ मदत मिळावी, या दृष्टीने या पथकाने आपला सकारात्मक अहवाल द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

  या पथकाने नंतर पाथर्डी तालुक्यातील रांजणी येथील शिवारातील पिकांची पाहणी केली. स्थानिक पदाधिकारी, शेतकरी यांनी, पावसाअभावी पिकांची परिस्थिती बिकट असल्याचे पथकाच्या निदर्शनास आणून दिले. केंद्र शासनाकडून तातडीची मदत मिळावी, अशी मागणी केली. येथील कोरड्या पडलेल्या पाणीपुरवठा तलावाची पाहणी केली. यानंतर या पथकाने जामखेड आणि कर्जत तालुक्यातील काही गावांची पाहणी केली.

  पालकमंत्र्यांनीही समितीशी केली चर्चा
  पालकमंत्री राम शिंदे यांनी पाथर्डी तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय समितीच्या सदस्यांशी चर्चा केली. जिल्ह्यातील दुष्काळाची वस्तुस्थिती या समितीच्या निर्दशनास आणून दिली. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी देखील जिल्ह्यातील पशुधन, पाण्याची स्थिती यासह अन्य बाबींचा अहवाल या समितीला सादर केला. या अहवालानुसारच शेतकऱ्यांसाठी दुष्काळी उपाययोजना राबवल्या जातील.

  भाषेची अडचण तरी ही साधला संवाद
  दिल्लीहून आलेले केंद्रीय पथकाने शेतकऱ्यांशी संवाद साधला. या पथकाने हिंदीतून शेतकऱ्यांशी चर्चा केली. पथक हिंदी भाषा बोलत असल्यामुळे शेतकऱ्यांना अडचण आली होती. मात्र, लगेचच जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी त्यांचे भाषांतर केल्यामुळे ही अडचण दूर झाली. दरम्यान, दुष्काळी दौऱ्यातून शेतकऱ्यांना मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Trending