Home | Maharashtra | Vidarva | Akola | drug discovered for malnutrition

कुपोषण हटवण्यासाठी अत्यल्प खर्चात औषध, मेळघाटात लाकूड विघटन करणाऱ्या बुरशीचा उपयोग

विशेष प्रतिनिधी, | Update - Jul 01, 2019, 07:23 AM IST

विद्यार्थ्याने केलेल्या संशोधनास राष्ट्रीय स्तरावर दुसरा क्रमांक

 • drug discovered for malnutrition

  अमरावती - मेळघातील लाकूड विघटन करणाऱ्या बुरशीचा उपयाेग करून आदिवासींच्या कुपोषणावर मात करण्यासाठी कमी खर्चात उपलब्ध हाेऊ शकणाऱ्या औषधाच्या निर्मितीवर संशोधन करत असलेल्या श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या मुकुंद फिस्के याने गुजरातेत पार पडलेल्या राष्ट्रीय अन्वेषण संशोधन महोत्सवात देशातील ७८० विद्यापीठांमधून द्वितीय क्रमांक पटाकावला.


  पावसाळ्यात सर्वत्र लाकडावर छत्रीच्या आकाराची बुरशी आढळून येते. मेळघाटात तिचे प्रमाण सर्वाधिक आढळते. मेळघाटातील आदिवासींना पुरेसा व सकस आहार मिळत नसल्यामुळे कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे. मुकुंदने वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. दिलीप हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली लाकडाचे विघटन करणाऱ्या बुरशीवर संशाेधन करत कमी खर्चात उपलब्ध होऊ शकणाऱ्या औषधाची निर्मिती केली. यामध्ये अँटी कॅन्सर, अँटी बॅक्टेरिया, अँटी ऑक्सिडंट असून त्याचा त्वचाविकार, कान फुटणे यावरही उपयोग केला जातो. यामुळे मेळघाटातील कुपोषणावर मात करणे शक्य होणार असल्याचा विश्वास मुकुंद व डॉ. हांडे यांनी व्यक्त केला आहे.

  डॉ. भटकरांच्या हस्ते गौरव
  मुकुंद फिस्के याच्या संशोधनाला मानव विज्ञान व समाजशास्त्र गटातून देशामधून द्वितीय क्रमांक मिळाला. त्याने मिळवलेल्या यशाबद्दल संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठामध्ये आयोजित कार्यक्रमादरम्यान डाॅ. विजय भटकर यांच्या हस्ते पुरस्कार देवून त्याचा गौरव करण्यात आला.

  पेटंटसाठी प्रयत्न
  मी केलेले संशोधन हे गरजूंपर्यंत पाेहोचवण्याचा प्रयत्न असून कुपोषणावर मात करण्यासाठी उपयुक्त असलेल्या या संशोधनाला पेटंट मिळावे म्हणून प्रयत्न करणार आहे.
  - मुकुंद फिस्के, संशोधक विद्यार्थी

Trending