आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूच्या नशेत चालकाचे नियंत्रण सुटले; दुचाकीच्या धडकेत पादचारी महिला ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव  - दारूच्या नशेत तर्रर दुचाकीस्वार तरुणाने शतपावली करण्यासाठी घराबाहेर अालेल्या महिलेस रविवारी रात्री १०.३० वाजता जोरदार धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा साेमवारी पहाटे ३.४५ वाजता उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. मद्यपी दुचाकीस्वारही जखमी झाला आहे. पोलिस मल्टिपर्पज हॉलसमोरील रस्त्यावर हा अपघात झाला. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दुचाकीस्वार तुषार अशाेक चाैधरी (वय २१, रा. नंदनवन काॅलनी, जळगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सविता विकास बिर्ला (वय ५२, रा. नवीपेठ, जळगाव) असे अपघातातील मृत महिलेचे नाव आहे. 


रविवारी रात्री जेवण झाल्यानंतर सविता या पती विकास केदारनाथ बिर्ला यांच्यासोबत शतपावली करण्यासाठी रस्त्यावर फिरत होत्या. याचवेळी तुषार व त्याचा मित्र विजय पवार (रा. नंदनवन कॉलनी) हे दोघे दुचाकीने (एमएच १९, डीबी ०२२१) रेल्वेस्थानकाकडे निघाले होते. तुषार दुचाकी चालवत होता. दरम्यान, दोघांनी दारू प्राशन केली असल्यामुळे भरधाव वेगात ते निघाले होते. बिर्ला दांपत्य रस्त्याच्या कडेला चालत होते. दारूच्या नशेत तर्रर असलेल्या तुषारचे दुचाकीवर नियंत्रण नसल्याने त्याने थेट सविता यांना जोरदार धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तुषार रस्त्याच्या कडेला फेकला गेला. त्याच्या डाव्या डोळ्याजवळ दुखापत झाली. विकास बिर्ला यांनी पत्नी सविता यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या डोक्यातून रक्तस्राव सुरू होता. सोमवारी पहाटे ३.४५ वाजता सविता यांचा मृत्यू झाला. यानंतर मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला होता. शवविच्छेदन करून सकाळी ९ वाजता मृतदेह कुटंुबीयांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी विकास बिर्ला यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तुषार चाैधरी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस उपनिरीक्षक शिवाजी वराडे तपास करीत आहेत. मृत सविता यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. 


काळाने घातला घाला 
सविता बिर्ला या नित्यनियमाने दरराेज सायंंकाळी जेवणानंतर शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडायच्या. रविवारीही त्या घरून निघाल्या. रस्त्यावर शतपावली करताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. बेदरकारपणे दुचाकी चालवणाऱ्या चालकाने धडक दिल्याने सविता बिर्ला यांचा जीव गेला. दरम्यान, रात्री या रस्त्यावर रॅश ड्रायव्हींग करणाऱ्या वाहनचालकांचे प्रमाण वाढले असल्याचे नागरिकांनी सांगितले. 


चालक दारू प्यायल्याचे स्पष्ट 
सविता बिर्ला यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा तुषार चाैधरी या युवकावर दाखल करण्यात आला अाहेे. रविवारी रात्रीच त्याला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या वेळी तुषार व त्याचा मित्र विजय पवार दोघे दारू प्यायलेले असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात अाले असता जामीन मंजूर करण्यात आला आहे. 


पादचाऱ्यांचा जीव धाेक्यात, पाेलिस प्रशासनाचा धाक संपला 
अत्याधुनिक व जास्त सीसीच्या दुचाकींची सध्या तरुणांमध्ये क्रेझ आहे. शहरात शेकडो तरुण या अत्याधुनिक दुचाकींवरून 'रॅश ड्रायव्हिंग' करतात. भरधाव वेगात फिरणाऱ्या या तरुणांमुळे लहान मुले, वृद्ध, पादचारी, दुचाकीस्वार यांना धोका निर्माण झाला आहे. आकाशवाणी चौक ते महाबळ या दरम्यान, सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. या मार्गावर दररोज तरुण भरधाव दुचाकी चालवत स्टंट करतात. त्यामुळे अनेकदा किरकोळ अपघातही घडतात. याच मार्गावर पोलिस अधीक्षकांसह न्यायाधीश व अनेक महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत. त्यांचा धाक न बाळगता तरुण दररोज स्टंट करतात. त्यामुळे पादचाऱ्यांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन चालावे लागते. 


दुचाकीचा इन्शुरन्स नाही 
तुषार व विजय हे दोघे तिसऱ्याच एका मित्राची दुचाकी घेऊन निघाले होते. विजयचे आई-वडील रेल्वेने जळगावात येत असल्यामुळे त्यांना रिक्षात बसवून देण्यासाठी ते रेल्वेस्थानकाकडे जात असल्याची माहिती तुषार याने पोलिसांना दिली आहे. तुषार चालवत असलेल्या दुचाकीचा इन्शुरन्स संपलेला आहे. तरीही बेकायदेशीरपणे ते दुचाकीने फिरत होते. त्यातच ही अपघाताची घटना घडली. या प्रकरणी तुषावर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

बातम्या आणखी आहेत...