आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळजापुरात मद्यधुंद कारचालकाने भाविकांना ठोकरले; 5 जण जखमी

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

तुळजापूर : मद्यधुंद कारचालकाने भरधाव कार चालवत भाविकांना ठाेकरले. हा थरार रविवारी (दि.२२) रात्री ९.३० च्या सुमारास महाद्वार परिसरात घडला. या वेळी रस्त्यावरील भाविक नागरिकांनी जीव मुठीत घेऊन रस्ता दिसेल तिकडे जिवाच्या आकांताने पळ काढला. उपस्थितांनी आरडाओरडा करत लोकांना सावध करण्याचा प्रयत्न केला. शेवटी महाद्वारसमोर कारचालकाला ताब्यात घेत जोरदार चोप देण्यात आला तसेच गाडीची तोडफोड करण्यात आली. मात्र या प्रकाराने भाविक आणि तुळजाभवानी मंदिराची सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

शहरातील भवानी रोडवरील बांगडी व्यावसायिक चैतन्य शिवाजी गडदे हा मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगात स्विफ्ट कार (एमएच २५ - एएल २०८८) चालवत भवानी रोडने तुळजाभवानी मंदिराकडे आला. या वेळी मद्यधुंद गडदेला कारवर नियंत्रण ठेवणे अशक्य होत असल्याने रस्त्यावरील ८ ते १० दुचाकींना ठोकरले. भरधाव कारने दुचाकी ठोकर मारताच रस्त्यावर एकच आरडाओरडा सुरू झाला. जो तो जीवाच्या आकांताने पळापळ करू लागला. महाद्वार परिसरात चार ते पाच भाविकांना जखमी केल्यानंतर कार महाद्वारसमोर कमानवेसकडे जाणाऱ्या रस्त्यावर थांबवण्यात यश आले.

मद्यधुंद गडदेला दिला चोप

कार थांबताच उपस्थितांनी कारकडे धाव घेत मद्यधुंद गडदेला ताब्यात घेऊन चोप दिला.यावेळी गडदे सोबत अन्य एक व्यक्ती कारमध्ये होती. जखमी भाविकांच्या नातेवाइकांनीही घटनास्थळी दाखल होत गडदेला चोप दिला व कारची तोडफोड केली. लागलीच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मद्यधुंद गडदेला ताब्यात घेतले. यापैकी एका गंभीर जखमी भाविकाला सोलापूरला हलवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

मोठा अनर्थ टळला

अपघाताची घटना लवकर घडल्याने भाविकांनी तसेच नागरिकांनी पळ काढल्याने मोठी दुर्घटना टळली. शहरातील प्रमुख रस्त्यावर पथदिव्यांअभावी असलेल्या अंधारामुळे भाविकांचा जीव धोक्यात आला आहे. शहरात २५ वर्षांपूर्वी ब्रेक फेल झालेल्या ट्रॅव्हल्सच्या दुर्घटनेची आठवण जागी झाली.

तुळजाभवानी मंदिरसह भाविकांची सुरक्षा रामभरोसे

भवानी रोडसह कमानवेस, शुक्रवार पेठ आदी मार्गावरून चारचाकी वाहने विना अडथळा, विना चौकशी थेट महाद्वारपर्यंत येत असल्याने भाविकांसह तुळजाभवानी मंदिराची सुरक्षा धोक्यात आली आहे. मात्र याकडे पोलिसांचे साफ दुर्लक्ष आहे. तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरांसाठी मंजूर वाहतूक शाखा कागदावरच आहे.गेल्या काही दिवसांपासून होमगार्डची शहरात नेमणूक करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
 

बातम्या आणखी आहेत...