आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीएसपी देवींदर सिंग प्रकरणी तपास एनआयएला सोपवला, पथक रवाना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देवींदर पाच वर्षांपासून नातेवाइकांकडे भाड्याने राहत होता, तेही बेपत्ता
  • गृह मंत्रालयाने देवींदरला शौर्यपदक दिले नाही : पोलिस

नवी दिल्ली - दहशतवाद्यांसह अटकेतील जम्मू-काश्मीरचा पोलिस उपअधीक्षक देवींदर सिंगच्या प्रकरणाचा तपास केंद्रीय गृहमंत्रालयाने मंगळवारी एनआयएला सोपवला. दिल्लीहून एनआयएची ६ सदस्यीय टीम काश्मीरकडे रवाना झाली आहे. देवींदर काजीगुंडमध्ये आहे. हा भाग जम्मू व श्रीनगर यादरम्यान येतो. सलग होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे टीमला काजीकुंड पोहोचण्यास विलंब होऊ शकतो. तेथून देवींदरला दिल्लीस आणले जाईल. त्यानंतर आयबी व लष्करी गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी पहिल्यांदा चौकशी करतील. देवींदरला राष्ट्रपती पदक देण्यासंबंधी जम्मू-काश्मीर पोलिसांनी मंगळवारी ट्विट केले. देवींदर सिंगला गृह मंत्रालयाने शौर्यपदक दिलेले नाही, असे ट्विटद्वारे स्पष्ट करण्यात आले. देवींदरला २०१८ मध्ये जम्मू-काश्मीर राज्य सरकारने शौर्यपदक प्रदान केले होते. पुलवामात २५-२६ ऑगस्ट २०१७ मध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्याच्या विरोधातील मोहिमेत सहभागी झाल्याबद्दलही गौरवण्यात आले होते. भूतकाळ : तस्करांची मदत, हप्तेही घेत होता


सूत्रांच्या मते देवींदर १९९० मध्ये उपनिरीक्षक पदावर जम्मू-काश्मीर पोलिसांत भरती झाला होता. तो श्रीनगरच्या अमरसिंह महाविद्यालयात पदवीधर झाला. तो दहा वर्षे विशेष ऑपरेशन ग्रुपमध्ये सहभागी होता. देवींदरवर अमली पदार्थ तस्करांना मदत करणे, हप्ते वसुलीचेही आरोप आहेत. तो जम्मू-काश्मीर पोलिसांच्या अँटिहायजॅकिंग युनिटसोबतही कार्यरत होता. देवींदरसोबत दोन दहशतवाद्यांची देखील चौकशी करण्यात आली. दोन्ही दहशतवाद्यांनी देवींदरच्या इंदिरा नगर येथील घरात उतरलो होतो, अशी कबुली दिली . 
 

आश्रय : देवींदर पाच वर्षांपासून नातेवाइकांकडे भाड्याने राहत होता, तेही बेपत्ता 

देवींदर श्रीनगरमध्ये आपल्या नातेवाइकांकडे पाच वर्षांपासून भाड्याने राहत होता. आता हे घर कुलूपबंद आहे. नातेवाइकही बेपत्ता आहेत. स्थानिकांच्या मते ते सगळे घर सोडून निघून गेले. देवींदरला दोन मुले आहेत. त्याची मुलगी बांगलादेशमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. मुलगा काश्मीरच्या बर्न हॉल स्कूलमध्ये शिक्षण घेतो. देवींदर श्रीनगरच्या इंदिरा नगरमध्ये लष्करी तळाजवळ २०१७ पासून आलिशान घर बनवत होता. हा भाग श्रीनगरमध्ये अतिशय सुरक्षित असा मानला जात होता. या घराची भिंत १५ कॉर्प्सच्या मुख्यालयास लागून आहे. 

बातम्या आणखी आहेत...