आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड जिल्ह्यात बिबट्याचा धुमाकूळ, पारनेरला केली 8 शेळ्यांची शिकार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महेश बेदरे, संदीपान तोंडे 
पाटोदा / धारूर - बीड जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ  सुरू आहे. धारूर तालुक्यातील काटेवाडीत  दोन बोकडांचा फडशा पाडणाऱ्या बिबट्याने याच तालुक्यातील कारी शिवारातही आठ शेळ्यांवर हल्ला करत ठार केले आहे.  दुसरीकडे पाटोदा तालुक्यातील पारनेर येथील शेत वस्तीवर बिबट्याने  गाईची शिकार केली.  जिल्ह्यात बिबट्याचा धुमाकुळ सुरू असतानाही  वन विभागाने  बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावले नाहीत. 

धारूर तालुक्यातील काटेवाडीत दोन बोकडांचा  फडशा  पाडणाऱ्या बिबट्याने शनीवारी  रात्री पाच किलोमीटर अंतरावरील  कारी येथील शेतकऱ्याच्या आठ शेळ्यांचा फडशा पाडल्याचे शनिवारी समोर आले आहे. 

कारी येथील शेतकरी दत्ता इंगोले यांच्या शेतात शनिवारी मध्यरात्री  बिबट्याने शेळ्या मारल्याची तक्रार शेतकऱ्याने  वन विभागास दिली.  वनपाल लांडगे यांनी पहाणी करून पंचनामा केला आहे. दुसरीकडे पाटोदा तालुक्यातही बिबट्याचा संचार असल्याचे आठ दिवसांपूर्वीच्या एका व्हिडीओ क्लिपमुळे उघडकीस आले आहे. २६ जानेवारीला पहाटे ३ वाजता  पारनेर येथील शेख वस्तीवरील बाबू बापूजी शेख ( ४७ ) यांच्या गोठ्यातील गायीचा हंबरण्याचा आवाज आल्याने  निजाम शेख बॅटरी घेऊन धावले. तेव्हा गायीवर हल्ला करून बिबट्या  पळताना दिसला.या  घटनेचा पंचनामा पाटोदा येथील वनरक्षक साहेबराव राऊत , पारनेरचे पशुवैद्यकीय डॉक्टर शेख यांनी केला. सध्या तालुक्यात शेतकरी  रात्री ज्वारीच्या पिकांना पाणी देतात. मात्र या घटनेने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.    

बिबट्याचा  बंदोबस्त करून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.  या घटनेचा पंचनामा केला असून अहवाल वरिष्ठांना पाठवला आहे.  परिसरातील शेतकऱ्यांनी जागरूक राहून काही माहिती मिळताच वन विभागाशी संपर्क करावा असे वन परिक्षेत्र अधिकारी पठाण यांनी सांगितले.

मिशीचे केस सापडले
२६ जानेवारी रोजी झालेल्या घटनेत एकच बिबट्या दिसला मात्र दुसऱ्याही दिवशी याच ठिकाणी दोन बिबटे आल्याचे शेतकऱ्यांनी पहिले. विशेष म्हणजे हल्ला झालेल्या ठिकाणी बिबट्याचे मिशीचे केस पडलेले दिसले . तरीही वन विभागाने मात्र गस्त घालण्याचे धाडस केले नाही.

पकडण्यासाठी पिंजरे लावू 
जिल्ह्यात ज्या ठिकाणी हानी झाली आहे त्या ठिकाणी पथक नेमले जाणार  असून वन विभाग व वन्यजीव विभाग मिळून  नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान  भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्याच बरोबर  बिबट्याला पकडण्यासाठी  पिंजरे लावण्यात येणार आहे. - आर. आर. काळे, विभागीय अधिकारी, वन्यजीव विभाग, औरंगाबाद 

बातम्या आणखी आहेत...