आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थकीत भाडे मागल्याने डाॅक्टरला बाथरूममध्ये काेंडून जिवंत जाळले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - डॉक्टरला घरातील शौचालयात जाळून मारल्याच्या आरोपावरून अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. खरात यांनी दत्ता व्यंकट कल्याणे (वय ३८) याला जन्मठेप व चार हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या खटल्यात दत्ता कल्याणे याची पत्नी भूमिता कल्याणे हिची मात्र सबळ पुराव्यांअभावी सुटका केली. 


देगलूर तालुक्यातील सुगाव येथील मूळ रहिवासी असलेले डॉ. गणेश व्यंकटराव बामणे मुदखेड तालुक्यातील मुगट गावात  इमारत बांधून त्या इमारतीमध्ये विवेक निसर्ग नावाचा दवाखाना चालवत हाेते.  इमारतीमध्ये दत्ता व्यंकट कल्याणे आणि त्याची पत्नी भूमिता कल्याणे किरायाने राहत होते.  कल्याणे दांपत्याकडे भाडे थकत गेले. डॉ.गणेश बामणे यांनी घरभाडे देण्यासाठी कल्याणे पती-पत्नीकडे तगादा लावला. त्यातून वाद वाढत गेला.   ६ ऑक्टोबर २०१७ रोजी दुपारी डॉ. गणेश बामणे इमारतीतील शौचालयात गेले असताना दत्ता कल्याणे याने दार बाहेरुन बंद केले.   शौचालयाच्या बाहेरून डाॅ. बामणे यांच्या अंगावर रॉकेल टाकण्यात आले. डॉ. गणेश बामणे यांनी खिडकीतून पाहिले तेव्हा दत्ता  कल्याणे हा त्यांच्या अंगावर रॉकेल शिंपडत  होता. त्याने काडीपेटी ओढून आत फेकली. त्यानंतर भडका उडून डॉ. गणेश बामणे भाजले. त्या अवस्थेतही त्यांनी मित्र प्रफुल्ल यास बोलावले. डॉक्टरच्या गाडीमध्ये नांदेडच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणले. उपचार सुरू असताना १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता डॉ. गणेश  बामणे (३८) यांचा मृत्यू झाला.  त्यांनी मृत्यूपूर्व दिलेल्या जबाबाप्रमाणे दत्ता व्यंकट कल्याणे (३८) आणि त्याची पत्नी भूमिता  (२५) या दोघांनी त्यांना जाळून टाकल्याचे सांगितले. मुदखेड पोलिसांनी या प्रकरणी भादंविच्या कलम ३०२ आणि ३४ नुसार दत्ता आणि त्याची पत्नी भूमिता या दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला होता.

 

लाख रुपये भाडे थकीत
न्यायालयात डॉ.गणेश बामणेचे जवळपास एक लाख रुपये घरभाडे देणे शिल्लक असताना दत्ता व्यंकट कल्याणेने त्यांचा जाळून खून केल्याची बाब सिद्ध झाली. या खटल्यात १४ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. न्यायाधीश एस. एस. खरात यांनी दत्ता व्यंकट कल्याणेला जन्मठेप आणि चार हजार रुपये रोख दंडाची शिक्षा ठोठावली.  सरकार पक्षाची बाजू अॅड. यदुपद अर्धापूरकर  तर आरोपीच्या वतीने अॅड.रमेश परळकर यांनी मांडली.