MahaElection / MahaElection: वंचित, जातीय समीकरणांमुळे आ. प्रशांत बंब यांची हॅट‌्ट्रिकसाठी शर्थ

लाेकसभेला युतीची मते वंचित आघाडी, मराठा उमेदवाराला  
 

राजेंद्र सरोवर

Aug 07,2019 01:20:38 PM IST

गंगापूर (जि. औरंगाबाद) - दोन महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ अंतर्गत गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित आघाडी आणि हर्षवर्धन जाधव यांना पडलेल्या अनपेक्षित मतांमुळे तालुक्यातील प्रस्थापित पक्षांवर जातीय समीकरणे वरचढ ठरली होती. यामुळे भाजपचे विद्यमान आमदार प्रशांत बंब यांना या वेळेस विजयाची ह‌ॅट््ट्रिक साधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतील, असे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.


मतदारसंघात सद्य:स्थितीत भाजप-शिवसेना युती, विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित आघाडी अशा तिरंगी लढत होण्याचे चित्र दिसत आहे. तथापि, राष्ट्रीय व राज्य पातळीवर घडत असलेल्या घटनांचा मतदारांवर राजकीय प्रभाव पडू शकतो. २०१४ प्रमाणे भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढल्यास मतदारसंघात चौरंगी लढत दिसू शकते. आमदार प्रशांत बंब हे सलग तिसऱ्या टर्मची तयारी करत आहेत. तथापि, शिवसेनेची आमदारकी सोडून स्वत:चा शिवस्वराज्य पक्ष स्थापन केलेले हर्षवर्धन जाधव यांना लोकसभा निवडणुकीत ६४,३८३ तर, एमएमआय-वंचित आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांना ५६,०२३ इतकी मते मिळाली होती. यामुळे आमदार बंब यांच्या अडचणीत भर पडली आहे. कारण एमआयएम-वंचित आघाडीने आमदार बंब यांच्या व्होट बँकेतील अनेक मते आपल्याकडे वळवली. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत आपली व्होटबँक राखण्यासाठी बंब यांना कसरत करावी लागणार आहे. मात्र युतीच्या निर्णयाचा त्यांना फायदाही होऊ शकतो. काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडीने प्रभावी मराठा उमेदवार दिला तर बंब यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहू शकते.

हे असू शकतात संभाव्य उमेदवार
भाजपकडून पुन्हा आमदार प्रशांत बंब मैदानात उतरू शकतात. युती न झाल्यास शिवसेनेकडून जि. प. अध्यक्षा अॅड. देवयानी कृष्णा पाटील डोणगावकर, संतोष माने, राष्ट्रवादीकडून डाॅ. ज्ञानेश्वर नीळ, विलास चव्हाण, काँग्रेसकडून किरण पाटील डोणगावकर, संजय जाधव वंचित आघाडीकडून जितेंद्र सिरसाठ, अरुण रोडगे हे इच्छुक आहेत. शिवसेना व वंचितमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्याने बंडखोरीची शक्यता असल्याने एखादा अपक्ष उमेदवारही ऐनवेळी आव्हान उभे करू शकतो.

या आहेत मतदारसंघातील समस्या
गंगापूर व खुलताबाद तालुक्यात रस्ते, पाणी, विजेची मोठी समस्या आहे. ग्रामीण भागातील बहुतांश रस्त्यांची दूरावस्था झाली आहे. पाणीटंचाई गतवर्षी जिल्ह्यात सर्वाधिक १८३ टँकर होते. गोदाकाठच्या परिसरात वीज पुरवठ्याची अडचण आहे. प्रमुख रस्ते व शहरी भागातील विकास कामांसाठी निधी मंजूर असूनही कामे न होणे, वा अर्धवट असल्यामुळे लोकांना सहन कराव्या लागत असलेल्या त्रासाचा परिणाम होऊ शकतो.

२०१४ मधील विधानसभेची स्थिती
प्रशांत बंब भाजप ५५,४८३
अंबादास दानवे शिवसेना ३८,२०५
कृष्णा डोणगावकर राष्ट्रवादी ३३,२१६
शोभाताई खोसरे काँग्रेस १६,८२६

X
COMMENT