आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूच्या नशेत छेड काढल्याने मुलीच्या बापाने चाेपले:वाद घातल्याने जमावाने खुपसला चॉपर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - दारूच्या नशेत असलेल्या दोन तरुणांनी शनिवारी दुपारी २.१५ वाजता बेंडाळे महाविद्यालयासमोर एका मुलीची छेड काढली. या मुलीच्या वडिलांनी एका तरुणास मारहाण करून ते तेथून निघून गेले. यानंतर तरुणांनी एका चहा विक्रेत्यासोबत वाद घालुन हाणामारी केली. या वेळी झालेल्या गर्दीत कोणीतरी एकाने तरुणाच्या मांडीत चॉपर खुपसला. दरम्यान, जखमी अवस्थेत रुग्णालयात गेलेल्या तरुणांनी पोलिसांची दिशाभूल करीत दुचाकी अपघातातून हा वाद झाल्याचे सांगितले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर खरा प्रकार उघडकीस आला.

 

रात्री पोलिसांनी मुलीची छेड काढणाऱ्या तरुणास ताब्यात घेतले होते. सागर रामदास ठोंबरे (वय २१) व गणेश विक्रम पाटील (वय २२, दोघे रा.आझाद चौक, शाहुनगर) असे मद्यपी तरुणांची नावे आहेत. यातील सागरच्या मांडीत कुणीतरी चॉपर खुपसल्याने तो रुग्णालयात उपचार घेत आहे. तर गणेश याला जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. 

 

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर व गणेश दोघे शनिवारी दुपारी १२ वाजता दारू प्यायले होते. दुपारी २ वाजेच्या सुमारास ते दुचाकीने बेंडाळे महिला महाविद्यालयाजवळ आले. तेथे गणेशने एका मुलीची छेड काढत तीला 'किती वाजले?' असा प्रश्न विचारला. सुदैवाने त्या मुलीचे वडील शेजारीच असल्यामुळे मुलीने त्यांना ही बाब सांगितली. मुलीच्या वडिलांनी गणेशच्या कानशिलात लगावल्यानंतर हा वाद मिटला. यानंतर मुलगी व तीचे वडील तेथून निघून गेले होते. त्यानंतर गणेश व सागर हे दोघे शेजारीच असलेल्या चहाच्या दुकानात गेले. तेथे त्यांनी दुकानदाराशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.

 

 त्यामुळे दुकानदाराने त्यांना हटकले. 'त्या माणसाने तुला बरोबर मारले' असा टोमणा दुकानादाराने गणेशला मारला. त्यामुळे दोघांना राग आल्यामुळे त्यांनी दुकानमालकास मारहाण केली. या वेळी दुकानमालकाने ही दोघांना मारहाण केली. हा प्रकार सुरू असताना परिसरात गर्दी झाली होती. याच गर्दीतील कोणीतरी सागरच्या मांडीत चॉपर खूपसून पळ काढला. वेदना झाल्यामुळे सागरने आरडा-आेरड करताच गर्दी पांगली. त्याच्या मांडितून रक्ताची धार निघत होती. नागरिकांनी त्याला दुचाकीवरून शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. चॉपरचा हल्ला होताच चौकातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करण्याची तयारी केली होती.

 

सागरच्या मांडीतून जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे प्राथमिक उपचार करून त्याला दाखल केले आहे. जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील गायकवाड, डीबी पथकातील राजेंद्र मेढेे, नाना तायडे, रवी नरवाडे आदींनी घटनास्थळी धाव घेत गर्दी पांगवली. सागर याच्यावर उपचार सुरू असताना रुग्णालयातही गर्दी झाली होती. दरम्यान, यावेळी पोलिसांनी सागर व त्याच्या मित्रास घडलेल्या प्रकाराची माहिती विचारली असता त्यांनी पोलिसांनी दिशाभुल केली होती. दुचाकीचा कट लागल्यामुळे झालेल्या वादात एका तरुणाने चॉपर माल्याचे दोघांनी सांगीतले होते. पोलिसांनी घटनेची चौकशी करण्यासाठी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना अपघात झाल्याचे दिसून आले नाही. तर गणेश याने मुलीची छेड काढली, त्यानंतर भांडण झाल्याचा उलगडा फुटेजमधून झाला. त्यानंतर पोलिसांनी सायंकाळी ६ वाजता पुन्हा एकदा रुग्णालय गाठुन दोघांना माहिती विचारली. गणेश याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने मुलीची छेड काढली, चहा दुकानादारासोबत वाद घातल्याची कबुली दिली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


हाणामारीच्या घटनांमध्ये सर्रासपणे शस्त्रांचा वापर 
शहरात किरकोळ कारणांवरून हाणामारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यात सर्रासपणे शस्त्रांचा वापर हाेत असल्याचेही समोर आले आहे. गुरुवारी (२५ ऑक्टोबर) आकाशवाणी चौकात दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली होती. या वेळी एका तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केले आहेत. तर इतरांच्या हातात लाठ्या-काठ्या, क्रिकेटचे स्टंप होते. भरचौकात गँगवॉर झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. याच दिवशी सकाळी ९ वाजता वाघनगर स्टॉपवर एका मजुराने मालकाच्या पोटात चाकू खुपसला होता. या घटनांमुळे सामान्य नागरिक भयभीत झाले आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लाेक लोखंडी रॉड, अासारी, चाकू, चाॅपर या सारखी हत्यारे घेऊन सर्रासपणे फिरत आहेत. घटनेनंतर पोलिसांनी नाकाबंदी केली होती; परंतु त्यात काहीच आढळून आले नाही. पोलिसांनी अचानक नाकाबंदी करून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची कसून तपासणी केली पाहिजे, अशी मागणी होत आहे. जखमी झालेला सागर ठाेंबरे अाणि पाेलिसांनी घटनास्थळी जप्त केलेला धारदार चाॅपर. 


'त्या' घटनेचाही गुन्हा केला दाखल 
आकाशवाणी चौकात गुरुवारी दुपारी १.३० वाजता दोन गटात हाणामारी झाली. यात राहुल रोहन ठाकरे (वय २८, रा.वाल्मीकनगर) याच्यावर लोखंडी रॉड व लाकडी दांड्याने हल्ला चढवला होता. यात राहुल गंभीर जखमी झाला. मारेकऱ्यांनी राहुल याच्या हातातील तीन सोन्याच्या अंगठ्या व सोन्याची चेन असा ३५ हजारांचा ऐवज काढून पोबारा केला आहे. राहुल याने दिलेल्या फिर्यादीवरून बापू कोळी, दिनेश कोळी, अतुल कोळी व दत्तू कोळी (पूर्ण नाव माहित नाही) यांच्याविरुद्ध रामानंदनगर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पोलिसांनी चॉपर केला जप्त 
या घटनेनंतर जिल्हापेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठले होते. सागर याला चॉपर मारणाऱ्या तरुणाने घटनास्थळावरून पळ काढला होता; परंतु त्याने चॉपर तेथेच फेकला होता. सागरच्या मांडीतून चॉपर बाहेर काढताना मूठ वेगळी झाली होती. घटनास्थळी गर्दी झाल्यानंतर चॉपरची मूठ हरवली आहे. तर चॉपर पोलिसांनी जप्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...