आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिवृष्टी : हतनूर परिसरात दणादाण, तीन तासांत धुवाधार, आठ शेतकऱ्यांना ग्रामस्थांनी वाचवले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हतनूर - कन्नड तालुक्यातील हतनूर परिसरात मंगळवारी दुपारी दोन वाजेपासून पाच वाजेदरम्यान धुवाधार पाऊस झाला असून परिसरात सर्व जलमय चित्र निर्माण झाले होते. अनेक वर्षांपासून सुखवलेली शिवना नदी, गांधारी नदी खळखळली. यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला. तरी, या एकत्रित पडलेल्या पावसाने खरीप पेरणी मात्र धोक्यात आली आहे. शिवराई व हतनूर परिसरात झालेल्या अति पावसाने ९० टक्के झालेल्या खरीप पेरणीचे बियाणे वाहून गेल्यात जमा झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर पाऊस नव्हता तेव्हा दुष्काळाचे संकट होते तर आता पाऊस अति झाल्याने बियाणे वाहून गेल्याने दुबार पेरणीचे संकट समोर ठाकले आहे.


शिवना परिसरामध्ये मुसळधार पाऊस, अख्खे कुटुंब अडकले पुरात
शिवना | मुसळधार पावसामुळे  येथील जनजीवन विस्कळीत झाले. अजिंठा-बुलडाणा मार्गावरील शेतवस्तीवर राहणारे शेणफड नाथा जगताप यांचे अख्खे कुटुंब पाण्यात अडकले आहे. रात्री ८ वाजेपर्यंत बचाव कार्य सुरू होते. मात्र त्यात यश आले नाही. चाेहोबाजूंच्या पुरात एका भिंतीवर ते कुटुंब स्थिरावले आहे. तहसीलदार रामेश्वर गोरे यांना फोनवरून माहिती देण्यात आलेली आहे.


अनाडमध्ये नदी ओव्हरफ्लो, आठ जणांना ग्रामस्थांनीच काढले बाहेर
अजिंठा |  अनाड, ता. सिल्लोड येथे मंगळवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. तब्बल दोन, तीन तास झालेल्या या पावसामुळे अनाड येथील नदी ओव्हरफ्लो  झाली होती. नदीचे पाणी  नाला वाहतो तसे शेतातून पाणी वाहत होते. याच दरम्यान शेतात काम करताना माजी सरपंच आत्माराम मुके, सुपडा साकडेसह तब्बल आठ जण अडकले होते. नदीतून पाणी शेतात शिरून जोराने वाहत होते. ही बाब समजताच विजय मुके, हृतिक पवारसह ग्रामस्थांनी शेतात धाव घेत वरील आठ जणांना दोरी फेकत रिसकू ऑपरेशन करत वाहणाऱ्या पाण्यातून बाहेर काढले. ग्रामस्थांनी दाखवलेली समयसूचकता यामुळे तब्बल आठ जणांचे प्राण वाचले. पाण्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले.


गोळेगावात धो धो पावसामुळे भरवस्तीतील विहीर ढासळली
गोळेगाव | सिल्लोड तालुक्यातील गोळेगावसह परिसरात सलग चार दिवसांपासून धोधो सुरू असलेल्या पावसामुळे लोकवस्तीत असलेली सार्वजनिक विहीर ढासळली. आजूबाजूला घरे असल्याने या घरांना मोठा धोका निर्माण झाला आहे.


प्रशासनाने त्वरित काहीतरी उपाययोजना करून ही विहीर एकतर बुजावी नाहीतर बांधावी अशी मागणी नागरिकांनी केली. पाच दिवसांपासून हळूहळू  विहीर ढासळत आहे, तरीही प्रशासन काहीही उपयोजना करत नसल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण अाहे. मंगळवारी पुन्हा मुसळधार  झाल्याने विहरीलगतच्या नागरिकांना जीव मुठीत धरून आपल्याच घरात राहावे लागले. विहरीला भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश बनकर यांनी भेट देऊन प्रशासनाला सूचना केल्या. या वेळी  गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे, ग्रामसेवक गणेश सोनवणे, तलाठी सपकाळ यांनी पाहणी केली.

बातम्या आणखी आहेत...